Monday, 25 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २५   डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभुषण जाघव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आई आणि पत्नी आज सकाळी इस्लामाबाद इथं दाखल झाल्या आहेत. आज दुपारी त्या कुलभुषण जाधव यांना भेटतील, सुमारे १५ मिनिटांची ही भेट असेल. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे, मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

****

आयकर चुकवेगारांचा शोध घेण्यासाठी आयकर विभाग आता बँक, टपाल खाते, विमा कंपन्या तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या माहितीचा वापर करू शकणार आहे. केंद्र सरकारनं यासंबंधीच्या नियमात सुधारणा करून, आयकर विभागाला ही माहिती वापरण्याची परवागनी दिली. कर चुकवेगिरीच्या उद्देशानं चुकीचा पत्ता दिलेल्या किंवा पत्ता बदललेल्या करबुडव्यांचा शोध घेणं, तसंच नियमानुसार दंड आकारणं, यामुळे शक्य होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बँकिंग क्षेत्रावर शैक्षणिक कर्जाचा बोजा वाढत असल्याचं भारतीय बँक संघानं म्हटलं आहे. बँक संघाच्या आकडेवारीनसार या वर्षात मार्च अखेरपर्यंत शैक्षणिक कर्जाची परतफेड न करण्याचा दर सात पूर्णांक ६७ टक्के झाला आहे जो दोन वर्षांआधी पाच पूर्णांक ७ टक्के होता. भारतीय बँक संघाच्या आकडेवारीनूसार एकूण कर्जाच्या टक्केवारीत नॉन परफॉर्मिंग असेट्स अर्थात अनुत्पादित संत्तींचा वाटा वाढत आहे.

****

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन केलं जात आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, राज्यसभेतले विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी आज संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. लोकसभा सचिवालयाकडून मालवीय यांच्या जीवनावर आधारीत पुस्तिकेचं यावेळी वितरण करण्यात आलं.

****

गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य सदस्यांची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

हिमाचल प्रदेशमध्ये  नव्या सरकारचा शपथविधी परवा बुधवारी होणार असून, जयराम ठाकूर यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.

****

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात नाशिक इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी इथं सुमारे साडे दहा अंश तर नांदेड इथं बारा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. पुढचे काही दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

मुंबईतली पहिली बहुप्रतिक्षित वातानुकूलित उपनगरीय रेल्वे गाडी आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू झाली. बोरिवली स्थानकाआज सकाळी साडे दहा वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या गाडीनं चर्चगेटकडे प्रस्‍थान केलं. येत्या एक जानेवारीपासून ही वातानुकूलित रेल्वेसेवा विरारपर्यंत वाढवण्यात येणार असून तिच्या दररोज बारा फेऱ्या होणार आहेत. प्रथम श्रेणीचे प्रवासी या रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या बिगरवातानुकूलित डब्यातून प्रवास करु शकतील.

****

नांदेड जिल्ह्यात येत्या २ आणि ३ जानेवारी रोजी तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग वाढण्यासाठी राज्यात स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. नांदेड, अर्धापूर, माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, भोकर आणि मुदखेड तालुक्यात २ जानेवारी रोजी तर लोहा, कंधार, नायगाव, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद आणि उमरी तालुक्यात ३ जानेवारी रोजी पंचायत समितीमध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

****

नाताळचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चेसवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबाद इथं छावणी परिसरातल्या चर्चेसमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. चर्च परिसरात येशू जन्माचा देखावा उभारण्यात आला आहे. विशेष प्रार्थना सभांसह पारंपरिक गाणी गाऊन हा सण साजरा केला जात आहे.

*****


No comments: