Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिकार विधेयक’ लोकसभेत
बहुमतानं मंजूर
Ø
मुंबईत
लोअर परेल भागात इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ जण ठार
तर १२ जण जखमी
Ø राज्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्याचा निर्णय, ५० लाख
रूपयांपर्यंतची बक्षिसे जाहीर
आणि
Ø सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड आणि त्यांच्या
टंकलेखकाला कार्यालयातच दहा हजार रूपयांची लाच घेतांना अटक
****
‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिकार
विधेयक २०१७’ काल लोकसभेत बहुमतानं मंजूर झालं. महिलांच्या दृष्टीनं अन्यायकारक असणारी
मुस्लीम समाजातील तिहेरी तलाक पद्धत हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरूंगात
पाठवण्याची तरतूद या विधेयकात आहे. तोंडी, लिखित, पत्र, ई-मेल, एसएमएस आणि व्हॉटस्ॲपसारख्या
ई-माध्यमांद्वारे पाठवलेला तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवण्यात आला असून अशा पद्धतीनं
तलाक देणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कैद आणि दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
याशिवाय अशाप्रकारे तलाख दिलेल्या पत्नीला पतीकडून स्वत साठी आणि मुलांसाठी पोटगी मिळण्याबाबतची
तरतूदही यात आहे. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे
****
हेरगिरीच्या कथित आरोपाखाली
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची आई आणि पत्नी भेटायला
गेल्या असताना पाकिस्ताननं अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार
मंत्री सुषमा स्वराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात काल राज्यसभेत
निवेदन देताना त्या बोलत होत्या. पाकिस्ताननं
मुलाखतीच्या अटींचं उल्लंघन केल्याचं, तसंच मानवता आणि सद्भावना दाखवली नसल्याचं त्या
म्हणाल्या. लोकसभेतही स्वराज यांनी यासंदर्भात निवेदन दिलं.
****
लोकसभेत काल कामकाज सुरु होताच राज्यमंत्री
अनंत कुमार हेगडे यांनी आपल्या कथित वक्तव्याबद्दल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या
सूचनेनुसार दिलगिरी व्यक्त केली. देशाची राज्यघटना आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्याप्रती आपली निष्ठा कायम असल्याचं हेगडे यांनी नमूद केलं. परवा या मुद्यावरुन
दोन्ही सदनांचं कामकाज अनेक वेळा स्थगित झालं होतं.
राज्यसभेत मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा मुद्दा
लावून धरल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं होतं.
****
मुंबईच्या लोअर परेल भागातल्या
कमला मिल्स परिसरातल्या एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ जण ठार तर १२ जण जखमी
झाले आहेत. सेनापती बापट मार्गावरील काही हॉटेल आणि व्यापारी संस्था असलेल्या या चार
मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री ही आग लागली. जखमींना जवळच्या रूग्णालयांमध्ये
दाखल करण्यात आलं असल्याचं बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून
सांगण्यात आलं. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर्स आणि रूग्णवाहिका
घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागण्याचं
कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं.
****
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण
अभियानात राज्याचा क्रमांक अग्रस्थानी येण्यासाठी येत्या १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी
या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण
२०१८ च्या आढावा बैठकीत ते काल मंत्रालयात बोलत होते. राज्यातल्या शहरांमध्ये स्वच्छ
वॉर्ड स्पर्धा आणि स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम प्राप्त करणाऱ्या महानगरपालिका,
नगरपालिका यांना त्यांच्या विविध वर्गीकरणानुसार पहिल्या तीन वॉर्डांना ५० ते पाच लाख
रूपयां पर्यंतचे बक्षिस दिले जाणार आहे.
प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येणार
असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, ही भावना सर्वांमध्ये
जागृत करणं आवश्यक असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये
सक्रिय सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे उपविभागीय
अधिकारी अनिल माचेवाड आणि त्यांचे टंकलेखक रत्नाकर साखरे यांना कार्यालयातच दहा हजार
रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. जमिनीच्या दाव्याबाबत
तहसिलदाराच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी माचेवाड यांनी टंकलेखक साखरे याच्यामार्फत
५० हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत विभागानं सापळा रचून दोघांना
रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन नगरपरिषदेत
कार्यरत सहायक मिळकत पर्यवेक्षक शामराव दांडगे यांना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे
यांनी काल निलंबित केलं. नगरपरिषदेस प्राप्त पाच लाख १६ हजार रुपयांचा निधी नगरपरिषदेत भरणा न केल्यामुळं आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत,
ही कारवाई करण्यात आली.
****
औरंगाबाद विभागातल्या सर्व शाळांमधून
येत्या १ ते ७ जानेवारी दरम्यान पाढे दृढीकरण सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याचं
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
या सप्ताहादरम्यान इयत्तानिहाय अपेक्षित क्षमतांनुसार विद्यार्थ्यांकडून पाढे
दृढीकरण करून घेण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावरुन या उपक्रमाची
पाहणी करण्यात येणार असल्यानं विभागीय आयुक्तांनी कळवलं आहे.
****
तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य पातळीवर
अन्न महामंडळ शासनानं स्थापन करावं अशी मागणी जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार आणि
केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात महासंघाचे जिल्हाध्यक्ष
गोविंदराव पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची जिल्हास्तरीय बैठक काल पार पडली.
****
तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना
सुधारण्यासह त्यांचं मानसिक परिवर्तन करण्यासाठी कीर्तन, प्रवचन यासारखे उपक्रम राज्यभरातल्या
तुरुंगांमध्ये राबवण्यात येत असल्याचं विशेष कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी
सांगितलं. जालना जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ते काल बोलत
होते. राज्यातल्या तुरुंगांमध्ये सध्या २५ हजार कैदी असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून
ही संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना तालुक्यातल्या सेवली इथल्या चार
हजार २१५ शेतकऱ्यांना २०१४ या वर्षात भरलेल्या रबी पीक विम्यापोटी ६६ लाख तीन हजार
रुपयांचा लाभ मिळणार आहे. विमा कंपनीच्या चुकीमुळे सेवली गावाचं नाव शेताली झाल्यानं
शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नव्हता. याबाबत खासदार रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय
कृषि विभागामार्फत विमा कंपनीकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत विमा कंपनीनं गावाच्या
नावात दुरुस्ती करत पीक विमा रक्कम मंजूर केल्याचं लेखी कळवल्याची माहिती दानवे यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
****
औरंगाबाद इथल्या सनदी लेखापाल संस्था डब्ल्यू आय सी ए एस एच्या वतीनं आजपासून
दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. तापडिया नाट्यमंदीरात सकाळी नऊ वाजता विधानपरिषदेचे
विरोधी पक्षनेते धनंजय
मुंडे आणि डी. बी. सोनी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होणार आहे. ही परिषद ‘मूल्य आणि सचोटीचं संगोपन
आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्याची सूत्रे’ या संकल्पनेवर आधारित असल्याची माहिती,
संस्थेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली.
****
जालना इथल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे
समर्थ सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा साखर संशोधन संस्थेनं 'सर्वोत्कृष्ट आर्थिक
व्यवस्थापन' आणि 'सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता' पुरस्कार देऊन सन्मानित केलं
आहे. पुणे इथं आयोजित एका कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राष्ट्रीय
सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या अध्यक्षा शारदा टोपे आणि आमदार राजेश टोपे यांनी हे
पुरस्कार स्वीकारले.
****
औरंगाबाद शहर हे कलावंतांचं शहर असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ
नाट्यकर्मी विजया शिरोळे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित कामगार कल्याण मंडळाच्या
प्राथमिक फेरीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. औरंगाबादच्या
या नाट्य स्पर्धांनी मराठी रंगभूमीला दिग्गज कलावंत दिले असल्याचं त्यांनी म्हटलं.
****
युवकांनी मैदानी खेळांमध्ये विशेष प्राविण्य
सिद्ध करुन जिल्ह्यात, आणि देशात नावलौकीक मिळवावा असं आवाहन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री
बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या
जन्मदिनानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन लोणीकर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी
ते बोलत होते.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाच्या अधिसभा, अभ्यासमंडळ आणि
प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील जागांसाठी काल सुमारे ४९ टक्के मतदान झालं. राज्यातील
३२ केंद्रांवर हे मतदान शांततेत मतदान पडलं.
*****
No comments:
Post a Comment