Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
बिहाराचे माजी मुख्यमंत्री
लालूप्रसाद यादव आणि इतर १५ जण चारा घोटाळा प्रकरणात दोषी.
· संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र
मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचं नियोजन- स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर.
·
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने
केलेल्या हल्ल्यात भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह तीन जवान शहीद.
·
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कार्याचा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्याकडून
गौरव.
आणि
·
अंबाजोगाई इथं आयोजित दोन
दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाला आज प्रारंभ.
****
झारखंड रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं काल बिहाराचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद
यादव आणि इतर १५ जणांना चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवलं आहे तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ
मिश्रा यांच्यासह इतर सहा जणांना दोषमुक्त केलं आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश
शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला. १९९१ ते १९९४ या काळात देवघर कोषागारातून अवैधरित्या ८९ लाख रुपये
काढल्याचं हे प्रकरण आहे. पुढच्या महिन्याच्या
तीन तारखेला लालूप्रसाद आणि इतर १५ जणांना न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयानं
दोषी ठरवल्यावर राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद आणि इतरांची लगेचच रांचीच्या बिरसा मुंडा
तुरुंगात रवानगी करण्यात आली. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचं
राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, दुसऱ्या एका चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद
यादव यांना याआधीच खासदारकी गमवावी लागली असून यापुढे निवडणूक लढवायला अपात्र ठरवण्यात
आलं आहे.
****
आपल्याकडचं
इतरांना देण्याची आणि वाटून घेण्याची कला हे मानवजातीला लाभलेलं सर्वोच्च मूल्य आहे,
असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल शिर्डी इथं ग्लोबल साई
टेंपल ट्रस्टच्या परिषदेत बोलत होते. शिर्डींच्या साईबाबांनी दाखवलेल्या मार्गाचा सर्वांनी
अवलंब करुन समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.
यावेळी नायडू यांनी टपाल तिकीटाचं अनावरणही केलं. एक ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८
या कालावधीत श्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
संपूर्ण
ग्रामीण महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचं नियोजन
करण्यात आलं असल्याची माहिती,
राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल दिली. नवी दिल्ली
इथल्या विज्ञान भवनात केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं गंगा ग्राम स्वच्छता संमेलनाचं
आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी लोणीकर यांनी ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी केंद्रीय
पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती होत्या. देशामधल्या हागणदारीमुक्त ग्राम पंचायतींमध्ये
महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. राज्यातले ११ जिल्हे, २०४ तालुके आणि २२ हजार ३१०
ग्राम पंचायती हगणदारीमुक्त झाल्याचं लोणीकर यांनी सांगितलं. उर्वरीत राज्य हगणदारीमुक्त
करण्यासाठी राज्याला तीन हजार सहाशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यावेळी केंद्रीय मंत्री
उमा भारती यांनी सकारात्मक आश्वासन दिलं.
****
राज्यातल्या पोलिसांची वाटचाल स्मार्ट पोलिसींगकडे सुरु
असून मागील तीन वर्षात पोलिसींगमध्ये गुणात्मक बदल झाला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं उभारण्यात येणाऱ्या पहिल्या स्मार्ट पोलिस स्टेशन
आणि पोलिस गृहबांधणी प्रकल्पाचं भूमीपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं,
त्यावेळी ते बोलत होते. स्मार्ट पोलिस स्टेशनची सेवा ही लोकाभिमुख आणि पारदर्शी राहणार
असल्याचं सांगून सामान्य माणसाला न्याय मिळेल अशा प्रकारचे हे पोलिस
स्टेशन राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
जम्मू- काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या
नियंत्रण रेषेजवळच्या केरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गस्तीवर असलेल्या सैनिकांवर केलेल्या
गोळीबारात भारतीय सैन्य दलातल्या एका मेजरसह तीन सैनिक शहीद झाले तर एक जण जखमी झाला.
शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे मुळचे महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातले आहेत.
पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असल्याचं संरक्षण
मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
****
कोणत्याही आपत्कालीन परिस्थीतीला हाताळण्याचं
कसब शरद पवार यांच्यात असून त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र असली तरी त्यांची कीर्ती सर्व
दिशांना पसरली आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा गौरव केला. शेषराव चव्हाण लिखित पद्मविभूषण
शरद पवार ‘द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाचं प्रकाशन काल औरंगाबाद इथं डॉ.मनमोहनसिंग यांच्या
हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार कर्मयोगी असून मराठवाडा विद्यापीठाच्या
नामांतराविषयी उद्भवलेली स्फोटक परिस्थिती, लातूर जिल्ह्यामधला भूकंप, मुंबईतली दंगल
हे गंभीर विषय व्यवस्थितपणे हाताळून, त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केल्याचंही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना मराठवाड्यानी आपल्याबद्दल कायम आत्मीयता दाखवली असून मराठवाड्याशी
असलेला आपला ऋणानुबंध सदैव तसाच राहणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं आयोजित दोन दिवसीय ३९व्या
मराठवाडा साहित्य संमेलनाला आज प्रारंभ होत आहे. सकाळी दहा वाजता राज्याच्या महिला
आणि बालविकास मंत्री पकंजा मुंडे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. त्याआधी सकाळी जागर दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. जेष्ठ
साहित्यक प्राध्यापक रंगनाथ तिवारी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत.
जालना इथंही अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेच्या रौप्यमहोत्सवी
वर्षानिमित्त आजपासून दोन दिवसीय बालकुमार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत कालपासून राज्यातल्या
नाशिक, जळगाव आणि नांदेड इथून नव्यानं विमान प्रवास सेवेला प्रारंभ झाला.
नाशिक जवळच्या ओझर विमानतळावरून मुंबई आणि पुण्यासाठी
विमान सेवा सुरु झाली. पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला.
जळगाव इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या
उपस्थितीत ही सेवा सुरू झाली तर नांदेड इथून अमृतसरसाठीच्या विमान सेवेला काल प्रारंभ
झाला. काल दुपारी अमृतसरहून शंभराहून अधिक प्रवासी असलेलं विमान नांदेड विमानतळावर
उतरलं. फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचं स्वागत करण्यात आलं.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी
काँग्रेसचे दिनकरराव दहिफळे यांची काल निवड करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी
काँग्रेस आणि शिवसेना यांनी युती केली होती. बँकेचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील
चिखलीकर यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं. या बँकेत यापूर्वी राष्ट्रवादी
काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती.
****
स्वच्छतेचं महत्व शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनात
बिंबवणं गरजेचं असून देशात सध्या स्वच्छतेविषयी उत्तम कार्य सुरु असल्यानं विद्यार्थ्यांनी
‘स्वच्छता दूत’ बनून महापालिकेस मदत करावी असं आवाहन लातूर महापालिका आयुक्त अच्युत
हांगे यांनी केलं आहे. लातूरच्या रोटरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या
पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. लातूर शहराला स्वच्छ
– सुंदर शहर बनवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथले वेदअभ्यासक निवृत्त
नायब तहसिलदार अशोकराव वेदपाठक यांचं काल निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. महसूल खात्यात
उस्मानाबाद, तुळजापूर आणि उमरगा तहसिलमध्ये नायब तहसिलदार म्हणून ते सेवेत होते. वेद
आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि सुमारे दीड हजार वेदांचा त्यांचा अभ्यास
होता. तुळजापूर इथल्या घाटशीळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.
****
बीड जिल्हा रुग्णालयात काल आयुष विभागातर्फे मोफत
रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. यामध्ये आयुर्वेद, युनानीसह
होमिओपॅथीमधील तज्ञ डॉक्टरांनी साडेपाचशेहून अधिक रुग्णांवर उपचार केले.
****
नांदेड इथं काल जागतिक संगणक सप्ताहानिमित्त संगणक साक्षरतेचा
संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी संगणक साक्षरतेविषयीची
फलकं आणि घोषणांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट इथं आज महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी काल या शिबीराच्या तयारीचा आढावा घेतला.
****
No comments:
Post a Comment