Saturday, 23 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २३  डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

सार्वजनिक क्षेत्रातली कोणतीही बँक बंद केली जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना दोन लाख कोटी रुपये भांडवल देऊन त्यांना मजबूत करण्याचा विचार करत असल्याचं वित्तसेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. बँक ऑफ इंडियासारख्या बँकांविरोधात तत्पर सुधारणा कृती कार्यक्रम राबवला जात असल्याचंही कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हटलं असल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली आहे. तत्पर सुधारणा कृती कार्यक्रमामध्ये बँकांच्या काही बाबतीतल्या कामगिरीच्या निर्देशांकावर लक्ष ठेवलं जात असून, त्यामधून बँकांना कामगिरी सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत संबंधित बँकेला सूचवलं जातं.

****

अमेरिकेचे नाविक दलाचे मंत्री रिचर्ड स्पेंसर यांनी काल नवी दिल्लीमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि नाविक दलाचे प्रमुख सुनिल लांबा यांच्याशी अनेक मुद्दयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी इंडो-पॅसिफिक या सामुहिक हिताच्या मुद्दयावर दोन्ही देशांदरम्यान सहकार्य बळकट करण्यावर जोर देण्यात आला. स्पेंसर हे प्रथमच भारताच्या भेटीवर आले आहेत. इंडो-पॅसिफिक सागरी भागात चीनच्या विस्तारवादी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, भारतानं विशेष अशी भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज चेन्नईमध्ये ३२व्या भारतीय अभियांत्रिकी काँग्रेसला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते रामेश्वर मंदिराला भेट देणार असून, रामेश्वरमधल्या वास्तू म्हणून जपवणूक करण्यात येत असलेल्या, दिवंगत माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वडिलोपार्जित घराला भेट देणार आहे.

****

शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे एक्कावनाव्या प्रकाश पर्व समारोप कार्यक्रमाला, आजपासून पाटना इथं सुरुवात होणार आहे. तीन दिवसीय कार्यक्रमासाठी बिहार सरकार आणि गुरुद्वारा प्रबंधक समितीनं व्यवस्था केली आहे. या समारोप कार्यक्रमासाठी देशभरातून शीख बांधव पाटन्यात दाखल झाले असून, रेल्वे विभागानं प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. शुकराना असं या समारोप सत्राला नाव देण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे.

****

केंद्र सरकारनं कांद्याची साठवण मर्यादा ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली आहे. कांद्याच्या साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं. बाजारातल्या कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठीही हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. यापूर्वी कांद्याची साठवण करण्याची मर्यादा ३१ डिसेंबर पर्यंतच होती.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. सिंह यांनी संपूर्ण समर्पणभावानं देशाची सेवा केल्याचं पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. गावांचा विकास आणि शेतकऱ्यांचं हित यासाठी चौधरी चरणसिंह यांनी अथक प्रयत्न केल्याचंही पंतप्रधान म्हणाले. 

****

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत आजपासून नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशी विमान सेवा सुरू होणार आहे. नाशिक जवळच्या ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू होणार असून, संध्याकाळी या सेवेचा शुभारंभ पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. जळगाव मुंबई विमानसेवाही आजपासून सुरु होणार आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्या महापौर मीना वरपुडकर यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रहाटी इथल्या बंधाऱ्यास आणि जल शुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तांत्रिक कारणामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या रुंज इथल्या देशी दारुच्या दुकानाचं पूर्णा इथं स्थलांतर करण्यास महिला आणि नागरिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात पोलिस स्थानकात निवेदन देण्यात आलं आहे.

****

चेन्नई इथं सुरु असलेल्या सातव्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत पंकज अडवाणी उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. पंकजनं दिल्लीच्या संदीप गुलाटीचा पराभव केला. उपांन्त्य फेरीत त्याचा सामना सौरभ कोठारीसोबत होणार आहे. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार आणि कमल चावला यांच्यात होणार आहे. उपान्त्य फेरी गाठणाऱ्या या चारही खेळाडुंनी पुढच्या वर्षी होणाऱ्या आशियाई स्नूकर स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. 

*****


No comments: