Saturday, 30 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०  डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****



Ø मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी महापालिकेचे पाच अधिकारी निष्काळजीपणाबद्दल निलंबित; घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Ø दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक २०१७ काल लोकसभेत मंजूर

Ø अटल टिंकरिंग लॅब’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात ११६ शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा उभारणार; मराठवाड्यातल्या दहा शाळांचा समावेश

आणि

Ø वाल्मीच्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक

****

मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणात मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या परिसराची पाहणी करून, आढावा घेतला. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करून, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे, तसंच दोषींवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.



दरम्यान, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी, या इमारतीत हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली, तर मिलच्या कमी जागेत ५० हॉटेल्सना परवानगी कशी दिली, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घटना म्हणजे मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. संबंधित हॉटेलमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं.



गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या या अग्निकांडात १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण होरपळल्याचं वृत्त आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पीडित कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या एक हजार ३१४ शाळा बंद करण्याच्या मुद्यावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं पाठवलेल्या नोटीसीला चार आठवड्यात उत्तर देणार असून, आयोगासमोर आपली बाजू स्पष्ट आणि सविस्तरपणे मांडणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  बहुजन समाजाच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, यादृष्टीने घेतलेला हा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक २०१७ काल लोकसभेत संमत करण्यात आलं. हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं कर्ज परतफेड करण्याच्या योजनेत समाविष्ट न करण्याची, तसंच कर्ज असलेली संपत्ती विकण्यास मनाई करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. या विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, रालोआ सरकारच्या काळात बँकांच्या अनुत्पादीत मालमत्तेत वाढ झाल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.

****

लोकसभेत संमत झालेलं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सहज संमत व्हावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केलं आहे. ते काल संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भात सरकार सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नागरीकांनी आभासी चलनाचा वापर करु नये, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आभासी चलन हे कायदेशीर चलन नाही, तसंच ते सुरक्षित नसल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. बीट कॉईन किंवा अन्य आभासी चलनामुळे आर्थिक नुकसानाचा धोका संभवतो, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात सुरक्षा दलांनी काल १२ नक्षलवाद्यांना अटक केली. सुरक्षा दलांच्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान सुकमा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो येत्या दहा जानेवारीला ३१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये अमेरिका आणि फिनलंडसह इतर देशांच्या २८ नॅनो आणि मायक्रो उपग्रहांसह भारताचा कार्टोसॅट दोन श्रृंखलेतल्या तिसऱ्या उपग्रहाचा समावेश आहे. आंध्रप्रदेशात श्री हरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रातून  पीएसएसलव्ही सी ४० या यानामार्फत हे प्रक्षेपण होणार आहे.

****

नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. नीति आयोगानं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणं हा या योजनेचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजवणं आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत. मराठवाड्यातल्या दहा शाळांमध्ये अशा प्रयोगशाळा उभारल्या जाणार असून, लातूर जिल्ह्यातल्या चार, उस्मानाबाद दोन, तसंच बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा स्वातंत्र्यसैनिक वि वा देसाई देशपांडे पुरस्कार यंदा औरंगाबादच्या वेद प्रतिष्ठान या संस्थेस जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख असं या पुरस्कारचं स्वरूप आहे. येत्या तीन जानेवारीला औरंगाबाद इथं गोविंदभाई ललित कला अकादमीत हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

****

जालना इथल्या फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा ‘वेणुताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातल्या दौंड इथल्या कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे सहावं वर्ष असून, येत्या एक जानेवारीला जालना इथं या पुरस्कारचं वितरण होणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी च्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना काल दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सह संचालक राजेंद्र क्षीरसागर अशी या दोघा अधिकाऱ्यांची नावं असून, त्यांनी एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी लाच मागितली होती. संबंधिताच्या तक्रारीवरून काल वाल्मी इथं संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं झालेल्या बाराव्या राज्यस्तरीय नौकायन स्पर्धेत कोल्हापूर संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. तेरणा मध्यम प्रकल्पात झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात कोल्हापूर संघ, कनिष्ठ गटात सांगली संघ तर बाल गटात नाशिक संघ विजेता ठरला. काल स्पर्धेच्या समारोपानंतर विजेते संघांना तसंच स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.

****

राज्यघटनेसंदर्भात कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निषेधार्थ काल नांदेड इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. पाकिस्तानात अटकेत असलेले नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अपमानकारक वागणूक दिल्याप्रकरणी पाकिस्तानचाही यावेळी निषेध करण्यात आला.

लातूर इथं गांधी चौकात तसंच जालना इथं वतीनं गांधीचमन चौकात आंदोलन करून, काँग्रेस पक्षाच्या वतीनं हेगडे यांचा निषेध करण्यात आला.

****

लातूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्यावतीनं शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता संदेश फेरी काढण्यात आली. प्रत्येक लातूरकरानी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावं तसंच नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वच्छता अँप डाऊनलोड करुन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

राज्याचा महिला आणि बाल विकास विभाग तसंच बीड जिल्हा माहिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीनं आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सव काल बीड इथं पार पडला. राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ. शालिनी कराड यांच्या हस्ते बाल महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या बाल महोत्सवात विविध मैदानी खेळांसह निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात कर्मयोगी शहाजी पाटील विद्यार्थी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवातल्या विविध उपक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले आहेत.

*****

No comments: