Sunday, 31 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.12.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·      ‘पद्मावती’ चित्रपटाचं नाव बदलून, ‘पद्मावत’ करण्याच्या सूचनेसह चित्रपट प्रदर्शनास केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची मंजुरी.

·      मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी तीन जणांविरुद्ध नोटीस.

·      वाल्मीच्या लाचखोर महासंचालक आणि सहसंचालकाला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.

आणि

·      प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं दीर्घ आजारानं निधन.

****

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, अर्थात सेंसॉर बोर्डानं ‘पद्मावती’ चित्रपटाला, काही बदलांसह मान्यता दिली असून 'युए' प्रमाणपत्रं जारी केलं आहे. चित्रपटाचं ‘पद्मावती’ हे नाव बदलून, ते ‘पद्मावत’ करण्याचा एक बदल मंडळानं सुचवला आहे. मलिक मुहम्मद जयसी यानं सोळाव्या शतकात लिहिलेल्या, ‘पद्मावत’ या महाकाव्यावर हा चित्रपट आधारलेला असल्याचा दावा, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केला होता. त्या अनुषंगानं हा बदल, मंडळानं सुचवला आहे. हा चित्रपट सती प्रथेचं उदात्तीकरण करत नाही, अशी टीप चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दाखवावी, घुमर या गाण्यात आवश्यक ते बदल करावेत, असंही मंडळानं सूचवलं आहे. या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेंसॉर बोर्डानं एका विशेष समितीची स्थापना केली होती. त्या समितीनं पाच बदल सूचवले आहेत.

****

मुंबईतल्या लोअर परळ भागात कमला मिल अग्निकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांविरुद्ध नोटीस जारी केली आहे. आग लागलेल्या पबचे मालक हृतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मनका अशी या तिघांची नावं असून, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये ११ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण होरपळून जखमी झाले आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं धडक कारवाई सुरु केली आहे. अंधेरी, जुहू भागातल्या हॉटेलांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू असल्याचं वृत्त आहे.

****

पाण्याची उत्पादकता आणि व्यवस्थापन अमूल्य असल्याचं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.व्यंकटेश्वरलू यांनी केलं आहे. परभणी इथं आयोजित १८ व्या राज्य सिंचन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. पाण्याची उत्पादकता ही नवीन संकल्पना जगभर रूढ झाली असल्याचं ते म्हणाले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले यावेळी उपस्थित होते. कृषी, सिंचन, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. या परिषदेचा आज समारोप होत आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं नांदेड इथं आगमन होईल. कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारा परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीचे महासंचालक, हरीभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीशांनी चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाल्मीच्या एका प्राध्यापकाकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

****

प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं काल काल पहाटे औरंगाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुळच्या विजापूरच्या असलेल्या आशाताई विवाहानंतर औरंगाबाद इथं स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी पंडित भीमसेन जोशी, पंडित सामता प्रसाद यांच्यासह संगीत क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांसह देशविदेशात अनेक कार्यक्रमातून गायन सादर केलं. पंडित नाथराव नेरळकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या गझलांच्या मैफली गानरसिकांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. तेलगू चित्रपटांसाठी त्यांनी उमेदीच्या काळात पार्श्वगायनही केलं आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांच्या गायकीनं प्रभावित होऊन, त्यांना ‘आंध्रलता’ ही पदवी दिली होती. यासह इतरही विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंरी नवरात्रोत्सवात काल जलयात्रा साजरी झाली. डोक्यावर तीर्थातल्या पाण्याने भरलेले जलकुंभ घेऊन शेकडो महिला शिवाजीपुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरपुतळा यामार्गावरून भवानीरोडवरून देवीच्या मंदिराकडे वाजत गाजत ही जलयात्रा गेली. जलकुंभातल्या पाण्यानं गाभाऱ्यासह मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.

****

अमृत अभियानाअंतर्गत लातूर शहरांतल्या हरित पट्ट्यांचा विकास केला जाणार असून, त्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हरित पट्ट्यांच्या विकासासाठी असलेला निधी खर्च करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असल्यानं, मनपा प्रशासनानं अत्यंत घाईने स्थायी समिती सभेत हा विषय मांडला. प्रशासनानं घाई गडबडीत असे ठराव मांडणं योग्य नसल्याचं गोविंदपूरकर यांनी सांगितलं.

****

नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे शम्मीम अब्दुल्ला यांची बिनविरोध निवड झाली आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या संगीता तुपेकर तर उपसभापतीपदी अलका शहाणे यांची निवड झाली आहे. स्थायी समितीत १६ पैकी १५ काँग्रेसचे तर एक भाजपचा सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

****

औरंगाबाद इथं सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं काल आमदार अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. येणारा काळ हा आर्थिक साधनांचा असल्याचं मत उद्योजक डी.बी.सोनी यांनी यावेळी व्यक्त केलं. विमुद्रीकरण, आणि कारखान्यांची जागतिक स्तरावरील गुंतवणूक, यामुळे सनदी लेखापालांच्या व्यवसायाला उभारी येत असून, या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सिल्लोड तालुक्यातले हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रूपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.

****

नववर्षाचं स्वागत व्यसनमुक्त वातावरणात व्हावं, यासाठी काल बीड इथं व्यसनमुक्ती संदेश फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून निघालेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी तसंच इतर सामाजिक संघटनांनी या फेरीत सहभाग घेतला. सामाजिक न्याय भवन परिसरात विसर्जित झालेल्या या संदेश फेरीला आमदार विनायक मेटे यांनी संबोधित केलं.

****

औरंगाबाद इथं येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद ‘महाॲग्रो २०१८’चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये गतिशीलता निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान, नवं वाण, नव्या योजना समजावून सांगण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य समन्वयक विधीज्ञ वसंत देशमुख यांनी वार्ताहर परिषदेत दिली. औरंगाबाद इथल्या स्टेशन रोडवरील अयोध्या नगरीत हे प्रदर्शन भरणार आहे.

****

औरंगाबाद शहराला स्मार्ट शहराच्या दृष्टीकोनातून शहरातल्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा आणि विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचं, खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. ते काल जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत बोलत होते.

****

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक संचाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन, विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं बंद नलिका कालवा वितरण प्रणालीचं भूमीपूजन करताना ते काल बोलत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरखनाथ शेळके आणि हेड कॉन्सटेबल शेख रहीम या दोघांना काल २५ हजार रूपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. गुन्ह्यात जप्त केलेली वाळूची गाडी सोडवण्यासाठी आणि गाडी पुढे नियमित चालू देण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केली होती.

****

No comments: