Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय
कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुस्लिम महिला विधेयक २०१७ आज लोकसभेत
सादर केलं. तिहेरी तलाक पध्दतीला विरोधी करणाऱ्या या
विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली.
****
हेरगिरीच्या कथित आरोपाखाली पाकिस्तानच्या
तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची आई आणि पत्नी भेटायला गेल्या असताना
पाकिस्ताननं अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज
यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्या आज राज्यसभेत निवेदन देताना बोलत
होत्या. पाकिस्ताननं मुलाखतीच्या अटींचं उल्लंघन
केल्याचं, तसंच मानवता आणि सद्भावना दाखवली नसल्याचं त्या म्हणाल्या.
कुलभूषण
जाधव पाकिस्तानात सुरक्षित असल्याचं आश्वासन पाकिस्तान सरकारनं भारताला द्यावं, असं
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले. समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव,
तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, शिवसेनेचे संजय राऊत, रिपब्लिकन पक्षाचे रामदास
आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी स्वराज यांनी दिलेल्या निवेदनाचं समर्थन केलं.
लोकसभेतही स्वराज यांनी यासंदर्भात निवेदन दिलं.
****
लोकसभेत
आज कामकाज सुरु होताच राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी आपल्या कथित वक्तव्याबद्दल
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या सूचनेनुसार दिलगिरी व्यक्त केली. देशाची राज्यघटना
आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपली निष्ठा कायम असल्याचं हेगडे
यांनी नमूद केलं. काल या मुद्यावरुन दोन्ही सदनांचं कामकाज अनेक वेळा स्थगित झालं होतं.
राज्यसभेत मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा मुद्दा
लावून धरल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.
****
मार्च २०१९
पर्यंत वीज भारनियमन केल्यास संबंधित वीज पुरवठा कंपनीस दंड केला जाणार असल्याचं ऊर्जा
राज्यमंत्री राजकुमार सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. जानेवारी २०१९ नंतर वीज कंपन्यांना
कोणत्याही प्रकारचं नुकसान ग्राहकांकडून वसूल करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
२०१९ नंतर देशभरात अखंड वीज पुरवठा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या दहा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा
परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या, तसंच विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये पाठवण्याच्या
शिक्षण विभागाच्या निर्णयावरुन राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं राज्य सरकारला नोटिस पाठवली
आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी सविस्तर अहवाल सादर करावा, असे
निर्देशही आयोगानं दिले आहेत.
****
राज्यात
आज दोन वेगवेगळ्या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात सटाणा-मालेगाव
रस्त्यावर शेमळी शिवारात रिक्षाला अज्ञात ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सात
जण जागीच ठार झाले. आज पहाटे हा अपघात झाला. मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटली नसल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
तर दुसरा
अपघात नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात झाला. दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन
पाच जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
****
ग्रामीण भागातलं पहिलं बाल-कुमार साहित्य संमेलन, पंढरपूर
तालुक्यात भोसे इथं, येत्या १२
आणि १३ जानेवारीला होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले आणि राजुबापू पाटील यांनी काल वार्ताहरांना ही
माहिती दिली. पाठ्यपुस्तकातले लेखक आणि कवी यांना प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांना
त्यांच्याशी संवाद साधता यावा, ग्रामीण भागातल्या मुलांना साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा
मिळावी, याकरता बाल-कुमार साहित्य संमेलन ग्रामीण भागात घेत असल्याचं ते म्हणाले.
****
जालना इथल्या
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा साखर संशोधन संस्थेनं
'सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन' आणि 'सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता' पुरस्कार
देऊन सन्मानित केलं आहे. पुणे इथं आयोजित एका कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषी मंत्री
शरद पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या अध्यक्षा शारदा टोपे, आमदार राजेश टोपे
यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
****
सौरऊर्जेचा
वापर वाढावा या उद्देशानं सूर्यप्रकाशात १५० अंश सेल्सिअस तापमानात तीस मिनिटांमध्ये
सहा व्यक्तींचा स्वयंपाक करता येईल, असं सौर कूकर जालन्यातल्या विवेक काबरा आणि हितेश
रायठठ्ठा या तरुण अभियंत्यांनी तयार केलं आहे. सूर्यप्रकाश नसतानाही कुठल्याही इंधनाविना
रात्रीच्या वेळी अन्न शिजवण्याची सुविधा या कूकरमध्ये आहे. काल जालना इथं एका वार्ताहर
परिषदेत या सौर कूकरचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
*****
No comments:
Post a Comment