Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
नाताळ आणि साप्ताहिक सुटीनंतर संसदेच्या सत्राची आजपासून झालेली
सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या कथित वक्तव्यामुळे वादळी ठरली.
लोकसभेत कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हेगडे यांच्याविरोधात घोषणाबाजी
केल्यानं, कामकाज अवघ्या काही मिनिटांतच तासाभरासाठी स्थगित करावं लागलं.
राज्यसभेतही विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद, नरेश अग्रवाल यांच्यासह
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, सभापतींनी कामकाज बारावाजेपर्यंत स्थगित
केलं. दोन्ही सदनांचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं,
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
त्यापूर्वी लोकसभेत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पाकिस्तानात
कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीबद्दल निषेध व्यक्त केला. काँग्रेस
नेते मल्लिकाजुर्न खरगे यांच्यासह अनेक पक्षांच्या खासदारांनी पाकिस्तानच्या या कृतीचा
धिक्कार केला. परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणी उद्या निवेदन
करणार असल्याचं सांगितलं. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जाधव
यांची त्यांच्या पत्नी आणि आईने परवा सोमवारी भेट घेतली, त्यावेळी त्यांना पाकिस्तानकडून
मिळालेल्या वागणुकीबद्दल भारतानं याआधीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच ही भेट
ज्याप्रकारे पार पाडली गेली, त्यातून जाधव यांच्यावरील कथित आरोपांना कृत्रिमरीत्या
बळकटी आणण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला,
असा आरोपही भारतानं केला आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत या वर्षी
देशभरात साडेचार कोटी लोकांना रोजगार मिळाला आणि एक कोटी छपन्न लाख निर्माणकार्य करण्यात
आली. तर, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सतरा हजार तीनशे तेहतीस किलोमीटर्स
लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. येत्या मार्च पर्यंत देशातल्या सगळ्या वस्त्या
रस्त्यांशी जोडण्याची योजना आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत देशभरात यावर्षी एक
हजार दोनशे एक्केचाळीस ग्रामपंचायतींना दत्तक घेण्यात आलं आणि एकोणीस हजार नऊशे एक्कावन्न
परियोजना पूर्ण करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येठ नेते जयराम ठाकूर यांनी आज हिमाचल प्रदेशच्या
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ठाकूर यांच्यासह दहा मंत्र्यांना
पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ठाकूर यांच्या मंत्रिमंडळात अनुभवी सदस्यांसी नव्या चेहऱ्यांचाही
समावेश करण्यात आला आहे. या शपथग्रहण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष
अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा शासित विविध
राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले काही सदस्य उपस्थित होते.
****
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानी
सैन्यानं आज पुन्हा युद्धविरामाचं उल्लंघन केलं. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमाराला नौशेरा
सेक्टरमध्ये पाक सैन्यानं भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य याला चोख
प्रत्युत्तर देत आहे.
****
राष्ट्रीय शेअर बाजारानं, आपल्या दंडविषयक मानकांमध्ये बदल करत
असल्याचं सूचित केलं आहे. यानुसार प्रत्येक बेकायदेशीर व्यवहारासाठी दहा हजार रुपये
दंड होणार असून, एकूण व्यवहाराच्या पंचवीस टक्के व्यवहार बेकायदेशीर ठरल्यास त्या दलालाला
नवीन व्यवहार करण्यास एक महिन्याची बंदी घालण्यात येणार आहे. तसंच सतत तीन तिमाहींमध्ये
असे बेकायदा व्यवहार करणाऱ्या दलालांना नवीन व्यवहार करण्यास तीन महिन्यांची बंदी घालण्यात
येणार आहे. हे बदल येत्या एक जानेवारीपासून अमलात येणार आहेत.
****
नीती आयोगाच्या अटल नवसंशोधन मिशननं विद्यार्थ्यांमधल्या वैज्ञानिक
प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी दीड हजार शाळांची निवड केली आहे. या शाळांमध्ये
स्थापन करण्यात येणार असलेल्या प्रयोगशाळांच्या माध्यमातून देशभरातून दहा लाख प्रतिभाशाली
नवसंशोधक विद्यार्थी निवडता येतील. एक वर्षापासून सुरू असलेल्या या अभियानांतर्गत आत्तापर्यंत
देशात दोन हजार चारशे शाळांची निवड करण्यात येऊन त्यामध्ये प्रयोगशाळा स्थापण्यात आल्या
आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर इथला वीज वितरण कंपनीचा
सहाय्यक अभियंता दिलीप राठोड आणि त्याच्या
एका साथीदाराला वीस हजार रूपयांची लाच घेतांना काल रंगेहात पकडण्यात आलं. नवीन रोहित्र बसवण्यासाठी राठोड यांनं लाचेची मागणी
केली होती.
*****
No comments:
Post a Comment