आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ डिसेंबर
२०१७ सकाळी ११.०० वाजता
****
गुजरातमध्ये
नवनिर्वाचित भाजपा सरकारचा आज शपथविधी होणार आहे. राज्यपाल ओ.पी. कोहली हे मुख्यमंत्री
विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि अन्य मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ
देतील. सुमारे नऊ कॅबिनेट मंत्री आणि १५ राज्यमंत्र्यांना यावेळी शपथ दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपा शासीत राज्यांचे काही मुख्यमंत्री
या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
****
जम्मू
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर
नूर मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्राली हा दहशतवादी ठार झाला. पुलवामा जिल्ह्याच्या संबुरा
भागात झालेल्या या चकमकीत दहशतवाद्याजवळील
हत्यारं जप्त करण्यात आली असून आणखी तपास सुरू असल्याचं सेनेच्या अधिकाऱ्यांनी
सांगितलं.
दरम्यान,
जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेपलिकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या
तीन पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सेनेच्या जवानांनी ठार मारलं. यात अन्य एक पाकिस्तानी
सैनिक जखमी झाला.
****
राज्यातील
गरीब आणि गरजू विद्यार्थी परदेशी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी शंभर कोटी
रूपयांचा निधी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी राज्यातल्या शिक्षण
संस्थांबरोबर नुकतीच बैठक घेतली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांनी दिली. ते काल अलिबाग इथं एका कार्यक्रमात बोलत होते. काही शिक्षण संस्थांनी
या निधीसाठी मदतीचं आश्वासन दिल्याचंही पवार यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भीमरावजी
बोढारे पाटील यांचं आज पहाटे आखाडा बाळापूर इथं निधन झालं. स्वातंत्र्य सैनिक गौरव
समितीच्या कळमनुरी तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बोढारे पाटील विविध सामाजिक
तसंच शैक्षणिक उपक्रमात सक्रीय सहभागी होते.
*****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला
आजपासून प्रारंभ होत आहे. पौष पौर्णिमेला दोन जानेवारी रोजी, पूर्णाहुतीनं नवरात्रोत्सवाची
सांगता होईल. या दरम्यान, ३० डिसेंबर रोजी देवीची जलयात्रा, छबीना, तीन जानेवारीला महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
******
No comments:
Post a Comment