Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø मुंबई -नाशिक- नागपूर समृद्धी महामार्गाचं काम येत्या फेब्रुवारी महिन्यात
सुरू होणार- मुख्यमंत्री
Ø राज्यातल्या ६७१
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची
आज मतमोजणी
Ø कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तान सरकार आणि
प्रसारमाध्यमांकडून अयोग्य वागणूक दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचा स्पष्टीकरण
आणि
Ø शिक्षकांनी चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्याचं महसूलमंत्री
चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
****
मुंबई -नाशिक- नागपूर
समृद्धी महामार्गाचं काम येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येईल, असं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं बांधकाम व्यावसायिकांच्यावतीनं
आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पासाठी ५० टक्के जमीन ताब्यात आली असल्यानं,
लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथल्या संतश्रेष्ठ
श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धाराचं भूमीपूजन आणि भक्तनिवासाचं लोकार्पण
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
मुंबई उपनगर बोरिवली इथल्या
भूखंडाची स्वस्त दरात विक्री आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले
यांना धमकावणं या दोन्ही आरोपांमुळे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ- एम एस आर डी सीच्या उपाध्यक्ष पदावरून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले
राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा मुद्दा
उपस्थित करून पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरलं
होतं. पदावर नसतानाच्या १४५
दिवसांच्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना आजपासून
त्यांच्या मूळ पदावर रूजू होण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं दिले
आहेत.
****
राज्यातल्या २७
जिल्ह्यांतल्या जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत
संपणाऱ्या ६७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल सरासरी ८२
टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस.
सहारिया यांनी दिली. आज
या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, बीड
१५७, लातूर पाच, नांदेड ३, परभणी- २, बुलडाणा
४२, त्याचबरोबर उस्मानाबाद आणि
जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
****
नरहर
कुरूंदकरांची स्मृती प्रत्येक लेखकाला प्रेरणादायी असून त्यांच्या नावे दिला जाणारा
पुरस्कार हा आपल्या जीवनातला मोठा सन्मान असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे
यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं काल बोराडे यांना नरहर कुरूंदकर पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कुरूंदकरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या
सारखा स्वातंत्र विचारवंत मराठीत असणं
हा मराठीचा सन्मान असल्याचंही बोराडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकत्या
ॲड. पल्लवी रेणके यांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
****
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय
नौदलाचे निवृत्र अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना
पाकिस्तान सरकार तसंच पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी योग्य वागणूक दिली नसल्याचं, परराष्ट
मंत्रालयानं काल सांगितलं. कुलभूषण यांना भेटण्यापूर्वी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र,
बांगड्या आणि टिकली काढायला लावणं तसंच कपडे बदलणं बंधनकारक केलं, कुलभूषण यांच्याशी
मराठीत बोलण्यासही त्यांना मज्जाव करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
रवीशकुमार यांनी काल सांगितलं. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी यांच्यासोबत प्रसारमाध्यमांनी
संवाद साधायचा नाही, असा निर्णय झालेला असूनही, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी
या दोघींना मानसिक त्रास होईल, असे प्रश्न विचारले. जाधव यांच्या एकंदर हावभावावरून
त्यांच्या प्रकृतीबद्दलही शंका उपस्थित होत असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं
आहे. दरम्यान, काल पहाटे पाकिस्तानहून परतलेल्या कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीत
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच चारित्र्य संपन्न
विद्यार्थी घडवण्यासाठी भरीव योगदान द्यावं, असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी केलं आहे. ते काल बीड जिल्ह्यात माजलगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
ग्रामीण भागासह शहरी भागातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी
प्रत्येकी १० लाख रूपयांचं बिन व्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती
त्यांनी दिली. तरुण तरुणींसाठी किमान कौशल्यावर आधारीत विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात
आले असून, त्याद्वारे योग्य प्रशिक्षण घ्यावं आणि स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा
असंही पाटील यावेळी म्हणाले.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश
करण्यासाठी सरकारला भाग पाडू असं, आमदार रामहरी रूपनवर यांनी म्हटलं आहे. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळातर्फे लातूर इथं आयोजित १३ व्या राज्यस्तरीय
धनगर समाज वधु-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य घटनेत
नमूद असलेलं धनगर समाजाचं आरक्षण देण्याचं काम सरकारकडून टाळलं जात असल्याचा आरोप त्यांनी
केला.
****
लातूर इथं काल कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका इमारती समोर स्थानिक सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आंदोलन
केलं. खोटी अश्वासनं देत सत्तेवर आलेल्या भाजपानं
गेल्या सात महिन्यात शहरात विकास कामं केलेली नाहीत असा आरोप करत नगरसेवकांनी
विदुषक, फकीर, पोतराजसह विविध वेषभुषा करुन
जागरण गोंधळ आंदोलन केलं. यावेळी महापालिका प्रशासनाला काँग्रेसतर्फे निवेदनही देण्यात आलं.
****
परभणी शहर महापालिकेच्यावतीनं स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये परभणी शहराच्या संपूर्ण स्वच्छतेबाबत गुणानुक्रमांक ठरवण्यात
येणार आहेत. यासाठी येत्या ३० डिसेंबरपर्यंत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आपल्या शहराचा कायापालट करण्यासाठी आपल्या घराप्रमाणे शहराची स्वच्छता करावी आणि परभणीचा
नावलैकिक वाढवावा, असं आवाहन महापौर मीना वरपुडकर आणि आयुक्त राहुल रेखावार यांनी केलं
आहे.
****
लातूर शहराच्या स्वच्छतेसाठी लातूरकरांच्या मानसिकतेत
बदल करण्याची गरज, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे. आदर्श
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात निलंगेकर बोलत होते. शहराच्या
स्वच्छतेसाठी महापालिका कटीबद्ध आहे. त्यासाठी जनतेच्याही सहकार्याची गरज असल्याचं
ते म्हणाले.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी
नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. पौष पौर्णिमेला दोन जानेवारी रोजी, पूर्णाहुतीनं
या नवरात्रोत्सवाची सांगता होईल. या दरम्यान, ३० डिसेंबर रोजी देवीची जलयात्रा, छबीना,
तीन जानेवारीला महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यासह
कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून असंख्य भाविक या काळात देवीच्या दर्शनाला येतात.
****
परभणी
जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या नैकोटा इथं नारायण दत्तानंद यांच्या पुण्यतिथी
सोहळ्याला कालपासून सुरुवात झाली. येत्या एक जानेवारीला या सोहळ्याची समाप्ती होणार
आहे. यानिमित्त नैकोटा इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद इथं अन्नपूर्णा अन्नछत्राच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्तानं
बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देणारी जनजागृती फेरी काढण्यात आली. नगराध्यक्ष मकरंद
राजे निंबाळकर यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी
झाले.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भीमराव बोढारे यांचं काल
त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. हैद्राबाद मुक्ती संग्रामात
त्यांचा सक्रीय सहभाग होता. तसंच ते स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे कळमनुरी तालुकाध्यक्ष
होते.
****
परभणी
जिल्ह्याच्या गंगाखेड इथं जिल्हास्तरीय दिव्यांग मुकबधीर क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन
जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. अशा स्पर्धांमुळे दिव्यांग
खेळाडूमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असं मत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त
केलं.
****
पोलीस ठाण्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना परभणी जिल्ह्यातल्या
जिंतूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पांचाळ यांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
पकडलं. बामणी परिसरात तोडलेल्या झाडांचे लाकडं घेऊन जाणारा ट्रक सोडून देण्यासाठी पांचाळ
यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी सात हजार रूपये घेतांना काल
त्यांना अटक करण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment