आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ डिसेंबर
२०१७ सकाळी ११.०० वाजता
****
मुंबईच्या लोअर परेल भागातल्या कमला मिल्स परिसरातल्या एका इमारतीला लागलेली
आग आटोक्यात आली आहे. सेनापती बापट मार्गावरील काही हॉटेल आणि व्यापारी संस्था असलेल्या
या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री ही आग लागली होती. यात १५ जणांचा
मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याप्रकरणी मोजोस बिस्ट्रो पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीनंतर या परिसरात असलेल्या
काही वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावरही परिणाम झाला आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल
दु:ख व्यक्त केलं आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आगीच्या
चौकशीचे आदेश दिले आहेत.
****
जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर
ए तय्यबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यांच्याजवळ शस्त्रास्त्र
तसंच स्फोटकं सापडली आहेत. कुंझार भागात ते तिघे प्रवास करत असलेलं वाहन थांबवलं
असता त्यात ए.के.४७
रायफल्स, ग्रेनेड्स
तसंच इतर अन्य स्फोटकं सापडली असल्याचं
लष्करी सूत्रांनी सांगितलं.
****
राज्य शासनाचा क्रीडा आणि युवक कल्याण
विभाग, राज्य कबड्डी असोसिएशन, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत
इथं काल प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी
१६ संघांचे साडेतीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. राज्याचे जलसंधारण
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
****
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण
अभियानात राज्याचा क्रमांक अग्रस्थानी येण्यासाठी येत्या एक जानेवारी ते २८ फेब्रुवारी
या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण
२०१८ च्या आढावा बैठकीत ते काल मंत्रालयात बोलत होते. राज्यातल्या शहरांमध्ये स्वच्छ
वॉर्ड स्पर्धा आणि स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम प्राप्त करणाऱ्या महानगरपालिका,
नगरपालिका यांना त्यांच्या विविध वर्गीकरणानुसार पहिल्या तीन वॉर्डांना बक्षिस दिलं
जाणार आहे.
*****
No comments:
Post a Comment