Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी यांची पुन्हा
एकदा निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी
राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी टाटा मूलभूत संस्था करत असलेलं संशोधन अंतिम
टप्प्यात असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.
काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य
मंत्रिमंडळानं घेतला असून, पुढच्या कार्यवाहीसाठी
उपसमिती नेमली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र सावरांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. धनगर समाजाचा
अनुसूचित जमातीत समावेश झालेला आहेच, त्यामुळे सरकारनं वेळकाढूपणाचं धोरण न अवलंबता फक्त
अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात, असं रूपनवर म्हणाले.
****
बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस
उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत विरोधकांनी
हौद्यात येऊन केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज दोनदा स्थगित करावं लागलं. यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव
मांडला होता. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर
यांनी तो फेटाळून लावत सरकारला याबाबत निवेदन करण्याचे आदेश दिले.
****
वीज निर्मिती केंद्रांना आवश्यक
कोळशाचा साठा उपलब्ध असल्यानं राज्यात भारनियमन होणार नाही, असं उर्जा मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं. भविष्यात विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलर
ऊर्जा तसंच पवन ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असून, राज्यातल्या ४० हजार
शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचं ते म्हणाले.
****
कोणत्याही विद्यार्थ्याचा जात प्रमाणपत्र
अभावी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश रद्द केला जाणार नाही, असं समाजकल्याण
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य हेमंत टकले यांनी याबाबतचा
प्रश्न उपस्थित केला होता.
****
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातल्या ८९ हजार किलोमीटर रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आल्याचं सार्वजनिक
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य गोवर्धन शर्मा
यांनी अकोला-वाशिम-हिंगोली राज्य मार्गाची आणि पारस फाटा-बाळापूर-पातूर रस्त्याची दुरवस्था
झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी वॉररुम तयार केली असून,
मोबाईल ॲप विकसित करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत राज्यांना
भरपाई देण्यासंदर्भातलं वस्तू आणि सेवा कर संशोधन विधेयक सादर केलं. या विधेयकात केंद्र
सरकारला पान मसाला, कोळसा, शीतपेय आणि तंबाखूसारख्या काही वस्तुंवर जीएसटीचे दर निश्चित
करण्याच्या बदल्यात राज्यांना भरपाई देण्याची तरतूद आहे.
****
निरिक्षणात्मक खगोल विज्ञानात देश तांत्रिक दृष्टीनं कुठेही
कमी नसल्याचं भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.अरविंद रानडे यांनी
म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या एमजीएम
संस्थेत उभारण्यात आलेल्या ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल विज्ञान केंद्रा’चं उद्घाटन
आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात खगोल विज्ञानासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात काम होत असून येणाऱ्या काळात अभियंता आणि इतर विविध पदांसाठी
भारत सरकारतर्फे नोकरीच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादचं हे खगोल विज्ञान केंद्र मराठवाड्यातल्या भावी वैज्ञानिकांसाठी मोलाचं योगदान
देईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त
केली.
****
जालना नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातले
अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. धार्मिक स्थळांचं चुकीचं सर्वेक्षण
करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना निलंबित करावं, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी
सभागृहात ठिय्या आंदोलन करत कामकाज बंद पाडलं. त्यामुळे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल
यांनी सहा स्वच्छता निरीक्षकांचं तात्पुरतं निलंबन करत असल्याचं सभागृहात जाहीर केल्यानंतर
कामकाजास सुरुवात झाली. सभेचं कामकाज संपल्यानंतर नगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन धार्मिक स्थळांचं पुन:सर्वेक्षण करण्याची
मागणी केली.
****
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी
काँग्रेसच्या स्वाती येवलुजे यांची आज निवड झाली. स्वाती येवलुजे यांना ४८, तर विरोधी भाजपा आघाडीच्या उमेदवार
मनीषा कुंभार यांना ३३ मतं मिळाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील पाटील
विजयी झाले. त्यांनी भाजपा आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांचा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment