Sunday, 24 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.12.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४  डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

योग म्हणजे शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक स्वरूपात स्वस्थ राहण्याची समग्र पद्धत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं. मुंबईत योग संस्थानच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. योगाला कुठल्याही धर्माशी जोडण्याची मानसिकता सोडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. योग अभ्यास केल्यानं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनतं त्यामुळे व्यक्तीला समाज आणि देशासाठी योगदान देण्यास मदत मिळते असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

****

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी निर्देश जारी केले आहेत.  देशात काही ठिकाणी समाजकंटकाकडून नाताळ साजरा न करण्याच्या धमक्या दिल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग यांनी हे निर्देश दिले आहेत. देशात कोणत्याही अडथळ्याविना नाताळ, रमजान ईद, होळी तसंच दिवाळी सारखे उत्सव साजरे झाले पाहिजेत असं ते म्हणाले. नवी दिल्ली सशस्त्र सीमा दलाच्या ५४ व्या  वार्षिक संचलनादरम्यान गृहमंत्री बोलत होते.

****

राज्यातील दुर्गम भागातील जनसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सर्व सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य शिबीरामुळे मदत होत असून याप्रकारचे आरोग्य शिबीर हे नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून किनवट इथं आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात बागडे बोलत होते. या आरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इथं घेऊन जाऊन त्यांच्यावर नामांकित रुग्णालयात विनामुल्य उपचार करण्यात येणार असल्याचंही बागडे यावेळी म्हणाले. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून दूर्गम भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यावेळी म्हणाले.

****

साहित्य निर्मितीसाठी भाषेची नव्हे तर अभिव्यक्तिची गरज असल्याचं मत महिला आणि बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. अंबाजोगाई इथं आयोजित ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अंबाजोगाई शहरातील मान्यवर साहित्यिकांनी आजपर्यंत साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अनेक साहित्यांचा नामोल्लेख त्यांनी आपल्या भाषणात करुन त्यांचा सन्मान केला.

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष अमर हबीब यांच्या संकल्पनेतुन राज्यातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ "अन्नदाता सुखी भव" हा संदेश यावेळी काढण्यात आलेल्या जागर दिंडीतुन देण्यात आला. या जागरदिंडीत शहरातील जिल्हा परीषद माध्यमिक आणि प्राथमिक शाळा, यासह शहरातील विविध शाळांमधील हजारोंच्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते.

****

परभणी शहर महापालिकेच्या घंटागाड्या आणि टिप्पर, 407 टेम्पो आदी 100 वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. यामुळं शहरात या वाहनांवर महापालिकेचं संपूर्ण नियंत्रण राहणार असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

****

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात दोन-दोन दिवसाच्या ४० ते ५० विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस उद्यानातील ६ एकर जागेमध्ये आयोजित राज्यात प्रथमच होत असलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल महत्वाचं दालन ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

शीखांचे दहावे गुरू गोविंद सिंगजी यांचा ३५१ वा प्रकाशपर्व देशभरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जात आहे. यानिमित्त गुरूद्वारांमध्ये विशेष शबद-कीर्तन आणि लंगरचं आयोजन केलं जात आहे.

****

राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसंच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून जलसंधारणाचं महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्यावतीनं पुरस्कार दिला जातो. यावर्षी २०१६-१७ च्या पुरस्कारांसाठी पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका विहित नमुन्यात परवा २६ डिसेंबरपर्यंत तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे कार्यालयीन दिवशी सादर करण्याचं आवाहन नांदेड जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी पत्रकाव्दारे केलं आहे. 

****

रायगड जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई-गोवा, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या तीनही महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीं झाल्यानं सुटीसाठी कोकणात किंवा पुण्याला जाणाऱ्या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजिक प्रचंड कोंडी झाली असून वडखळ ते पेण या रस्त्यावर दुतर्फा कोंडी झाली आहे.

*****




No comments: