Saturday, 23 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

चारा घोटाळ्याप्रकरणी रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि इतर १५ जणांना दोषी ठरवलं आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. १९९१ ते १९९४ या काळात देवघर कोषागारातून अवैध पद्धतीनं ८९ लाख रुपये काढण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तीन जानेवारीला दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

****

कोणतीही गोष्ट देण्याची आणि वाटून घेण्याची सवय हा मानवजातीचा सर्वोच्च गुण असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. शिर्डी इथं आज जागतिक साई मंदीर परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. साई बाबांप्रमाणेच प्रत्येक नागरिकानं समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. मानव सेवा हीच खरी पुजा असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.

****

डोकलामच्या पार्श्वभूमीवर सिक्कीम आणि भूतान सीमेवर सशस्त्र सीमा दलानं चांगली पकड घेतली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सीमा सुरक्षा दलाच्या ५४व्या प्रदर्शन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गृह मंत्रालयानं सीमा सशस्त्र दलाला त्यांचा स्वतंत्र गुप्तहेर विभाग स्थापन करण्यास परवानगी दिली असल्याचंही सिंह यावेळी म्हणाले.

****

गंगा ग्राम स्वच्छता संमेलनात ‘गंगा ग्राम’ प्रकल्पाचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. गंगा स्वच्छता अभियानासाठी सुरू केलेल्या ‘नमामि गंगे’ या प्रकल्पाअंतर्गत गंगा ग्राम हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून गंगा नदींच्या काठांवरील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोण हा या प्रकल्पाचा हेतू आहे. चोवीस गावांची गंगा ग्राम प्रकल्पा अंतर्गत निवड करण्यात आली असून त्यांना गंगा ग्राम बनवण्यासाठी त्यांचा कायापालट करण्यात येणार आहे.

****

तिरुपती ते निझामाबाद रायलसीमा एक्स्प्रेसचा एक डबा आज निजामाबाद स्थानकाजवळ रुळावरुन घसरल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे नांदेड विभागातून हैदराबादकडे जाणाऱ्या-येणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणारी सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असून, मुंबईहून सिकंदराबादला जाणारी देवगिरी एक्सप्रेस परळी, विकाराबाद मार्गे धावणार आहे. काचिगुडा ते मनमाड पॅसेंजर गाडी कामारेड्डी ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली असून, नांदेड - मेडचल आणि मेडचल - नांदेड पॅसेंजर गाडी निजामाबाद पर्यंतच धावणार आहे. तर संबळपूर ते नांदेड एक्सप्रेस आज विकाराबाद, परभणी, परळीमार्गे नांदेडला जाणार आहे.

****

राजस्थानमधल्या सवाई माधोपूर जिल्ह्यात आज सकाळी बानस नदीत बस कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा वाढून ३२ वर गेला आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर आधारित, शेषराव चव्हाण लिखीत ‘द ग्रेट इनिग्मा’ या पुस्तकाचं प्रकाशन, आज औरंगाबाद इथं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालं. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामध्ये शरद पवारांनी महत्वाची भूमिका पार पाडली असल्याचं सिंग यावेळी म्हणाले. त्यांनी पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या एक लाख २५ हजार ४३७ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रीयकृत बँकांना ७९४ कोटी दोन लाख ८४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्राप्त अर्जांची पडताळणी करून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात असल्याचं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं उद्या महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज या शिबीराच्या तयारीचा आढावा घेतला. या शिबीरात एक ते दीड लाख रुग्णांची तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

प्रिमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून आसाममधल्या गुवाहाटी इथं सुरू होत आहे. पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात आज संध्याकाळी सलामीची लढत होणार आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या जागतिक क्रमवारीतला अव्वल खेळाडू डेन्मार्कचा व्हिक्टर ऐक्सेलसन आणि महिलांमधली अव्वल खेळाडू ताय झू यिंग देखील सहभागी झाले आहेत.

****

No comments: