Monday, 1 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



आमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

****

Ø देशभरात नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत

Ø शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरुच राहणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø मुस्लीम महिलांना हज यात्रेला जाण्याकरता बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद

आणि

Ø लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलांखाली बंधारे बांधण्यासाठी ६२४ कोटी रुपयांच्या योजनेला केंद्र सरकारची तत्वतः मंजुरी

****

देशभरात नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष साजरं करण्यासाठी ठिकठिकाणी विविध प्रकारच्या मनोरंजनपर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

विविध पर्यटन स्थळं, जागोजागीची हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वत्र नववर्षाचं जोमानं स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आगामी वर्ष नागरिकांना सुख, समाधान आणि भरभराटीचं जावो, तसंच आपलं राज्य प्रगतीच्या वाटेवर सातत्यानं अग्रेसर राहो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

बीड इथं विविध लोककला, नृत्य- गाणी, विनोद यांचा समावेश  असलेल्या व्यसनमुक्ती रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नववर्षाचं स्वागत आणि तरुण पिढीत व्यसनाधीनता रोखण्याबाबत जनजागृतीसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला असून, शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

सेवा हमी कायद्यानं जनतेला मालक बनवलं आहे. जनतेची कामं विहित मुदतीत झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...



तुमच्या कामाचा निपटारा जर झाला नाही.तर तुम्ही एक तक्रार करायची तुमची पहिली तक्रार केल्या बरोबर जो अधिकारी आहे त्याला पाचशे रूपयांचा दंड.दुसरी तक्रार केली तर पाच हजार रूपयांचा दंड. आणि वारंवार एखादा अधिकारी अशा प्रकारे लोकांच्या कामाला वेळेमध्ये निपटारा करत नसेल तर अशा अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्याची देखील व्यवस्था या कायद्याच्या माध्यमातून झाली. त्यामुळे या कायद्याने जनतेला मालक बनवलं आहे. आणि प्रशासनाला उत्तरदायित्व देऊन खऱ्या अर्थानं तुमचं नोकर बनवलं आहे.



भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

गुरू गोविंदसिंह यांच्या ३५१ व्या जयंती उत्सव प्रकाशपर्वची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सांगता झाली. गुरु ता गद्दी कार्यक्रमाच्या वेळेस गुरुद्वारा मंडळाला कर्जस्वरुपात दिलेला ६१ कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल, तसंच गुरुद्वारा मंडळाच्या निवासी भुखंडावर असलेलं आरक्षण रद्द करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. २२ डिसेंबर या गुरू गोविंदसिंह यांच्या जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान, काळे झेंडे दाखवून, निषेध नोंदवणाऱ्या  राष्ट्रवादी कांग्रेसच्या ५० कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

मुस्लीम महिलांना हज यात्रेला जाण्याकरता बंधनकारक असलेली ‘मेहरम’ म्हणजेच पुरूष संरक्षक प्रथा बंद करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतांना त्यांनी ही घोषणा केली. अल्पसंख्याक विकास मंत्रालयानं हे निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे आता कोणतीही मुस्लीम महिला पुरुष संरक्षकाशिवाय हज यात्रा सहज करु शकते, असं त्यांनी सांगितलं. यानुसार आतापर्यंत १३०० महिलांनी विना मेहरम हज यात्रा करण्यासाठी अर्ज केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या महिलांना लॉटरीपद्धत वगळून हजयात्रेची परवानगी द्यावी, असंही पंतप्रधान म्हणाले.

 आगामी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं दिल्लीत युवकांच्या अभिरूप संसदेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. या अभिरूप संसदेत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातला एक युवक सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. २१ व्या शतकात जन्मलेल्या आणि नव्या वर्षात मतदानास पात्र होणाऱ्या तरुणांचं अभिनंदन करताना, पंतप्रधानांनी, सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतहे सर्वात प्रभावी साधन असल्याचं म्हटलं. उत्साह, सकारात्मकता, नवभारत, स्वच्छता, आदी मुद्यांवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भर दिला.

 सूर्याच्या उत्तरायणात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देशभरात साजऱ्या होणाऱ्या संक्रांत, लोहडी, बिहू, पोंगल आदी सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलांखाली बंधारे बांधण्यासाठीच्या ६२४ कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. सध्या जिल्हयात ९ पूर्णांक ६२ टक्के पाणी साठा असून सिंचन क्षेत्र १ पूर्णांक १६ लक्ष हेक्टर आहे. पुल वजा बंधारे बांधले गेल्यास ३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होवून पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 शेतकऱ्यांनी मागणी पुरवठ्याचा नियम लक्षात घेवून उत्तम शेती करावी असं आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ. दि.मा. मोरे यांनी केलं आहे. परभणी इथं आयोजित दोन दिवसीय सिंचन परिषदेच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. शेतीतून प्रगती साधण्यासाठी पूरक व्यवसाय, उद्योगाची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

 पैठण इथं आयोजित शतकोत्तर चतुर्वेद पारायण आणि यजुर्वेद स्वाहाकार यज्ञ सोहळ्याची काल सांगता झाली. औरंगाबाद इथलं वेद प्रतिष्ठान आणि पैठणच्या वेदाचार्य समितीतर्फे आयोजित या तीन दिवसीय सोहळ्यात देशभरातून वैदिक अभ्यासक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या अनुषंगानं वेदपठण, शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.

****

 औरंगाबाद इथं काल विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या आठ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली. यावेळी विदेशी मद्यासह काही साहित्य ताब्यात घेण्यात आलं. सिडको एन ३ परिसरातल्या एका हॉटेलमध्ये अवैध मद्य विक्री करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर संबंधित हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

****

      हिंगोली इथले सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा मराठवाडा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष भास्करराव तालखेडकर यांचं काल पहाटे निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते.

****

 परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवत असून तापमान ७ पूर्णांक ५ अंश सेल्सिअसच्या खाली आलं आहे. या थंडीमुळे ज्वारी पिकाची वाढ खुंटली जावून चिकटा, मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव होवून ज्वारीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

 नांदेड इथून निघणाऱ्या सचखंड आणि श्री गंगानगर या दोन एक्स्प्रेस-जलदगती  रेल्वेगाड्या आज त्यांच्या नियमित वेळे ऐवजी उशीरानं सुटणार असल्याचं नांदेड इथल्या रेल्वेच्या कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.

नांदेड -अमृतसर सचखंड रेल्वे आज दुपारी सव्वादोन वाजता नांदेडहून निघणार आहे. तर, नांदेड- श्री गंगा नगर रेल्वे आज रात्री अकरा वाजता नांदेडहून निघेल.

उत्तर भारतात पडणाऱ्या धुक्यामुळे नांदेडकडे येणाऱ्या सचखंड तसंच श्रीगंगानगर या दोन्ही गाड्या अनुक्रमे बारा आणि सोळा तास उशीरा धावत असल्यानं, हा बदल झाला आहे.

*****

No comments: