Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त
राजपथावरील पथ संचलनात महाराष्ट्राच्या 'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा'
या संकल्पनेवर आधारित चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या
समारंभात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते, महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे
संचालक संजय पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि चषक असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. आसाम राज्याच्या चित्ररथानं दुसरा तर छत्तीसगड़ राज्याने तिसरा क्रमांक
पटकावला.
यावेळी पथ संचलनात विविध
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते, यामध्ये नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला
प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय रंग शाळेत झालेल्या
आंतरराज्यीय नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या पथकानं प्रथम क्रमांक मिळवला.
****
केंद्रीय गृह मंत्रालयानं
राज्यसरकार तसंच केंद्र शासीत प्रदेशांच्या समन्वयानं सायबर विश्व तसंच सामाजिक प्रसार
माध्यमांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व राज्यात पोलिसांना प्रशिक्षण
देण्यासाठी सायबर अपराध विज्ञान परीक्षण प्रयोगशाळा तसंच प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी
८३ कोटी रुपये निधी जारी करण्यात आला आहे.
****
माहिती आणि प्रसारण
मंत्रालयानं,
चालू
घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि विकास कामांसंबंधी लोकांची मत जाणून घेण्यासाठी सोशल
मीडिया कम्युनिकेशन हब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक
जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीनुसार माध्यम प्रतिनिधी नियुक्त केले
जाणार
आहेत
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
उद्यापासून सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांना
संबोधित करणार आहेत. अधिवेशनाचं हे पहिलं सत्र नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. येत्या
गुरुवारी एक फेब्रुवारीला सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
****
पोलिओ लसीकरण मोहीम आज सर्वत्र
राबवण्यात आली. या अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात दोन लाख १५ हजार बालकांना दीड हजारावर
केंद्राद्वारे पोलिओ लस पुरवली जात असल्याची माहिती, लातूर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष
रामचंद्र तिरूके यांनी दिली. जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पोलिओ
लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. पुढील पाच दिवस शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी
जाऊन बालकांना डोस देवून मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन लोणीकर यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्र टंचाई मुक्ती
तसंच दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचं, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी
म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित ११व्या गुणीजन साहित्य संमेलनात ते आज बोलत होते.
ज्येष्ठ कवी फ.मु शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी प्रसिद्ध
गायक पंडित नाथराव नेरळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महेश लोंढे,
लक्ष्मी चव्हाण, एकनाथ पांडवे तसंच इंद्रजित घुले यांना यावेळी धोंडिराम माने साहित्य
पुरस्कार, संजय झट्टू, वंदना मुळे तसंच सुभेदार बाबुराव पेठकर यांना गंगाबाई माने सामाजिक
कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
मातंग समाजानं लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे महामंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करून स्वाभिमानानं जगण्याचं
आवाहन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे. क्रांतीगुरू लहुजी साळवे
परिषदेच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित राज्यस्तरीय मातंग समाज मेळाव्यात ते आज बोलत
होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या
सह मान्यवर यावेळी उपस्थित होते. क्रांतीगुरू लहुजी साळवे समाज गौरव पुरस्कार यावेळी
प्रदान करण्यात आले.
****
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या
मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याची जोडीदार टेमिया बाबोस जोडीला उपविजेतेपदावर
समाधान मानावं लागलं. आज झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मॅट पॅविच
आणि कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोव्हस्की जोडीनं बोपन्ना बाबोस जोडीचा २-६, ६-४, ११-९
असा पराभव केला.
****
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या
आगामी तीन ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला
आहे. या संघात सुरेश रैनानं पुनरागमन केलं आहे, तर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात
आलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातल्या या संघात महेंद्र सिंह धोनी, शिखर धवन, रोहित
शर्मा, दिनेश कार्तिक, के एल राहुल, हार्दिक पांड्या, मनिष पांडे, अक्षर पटेल, यजुवेंद्र
चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाटकटचा समावेश आहे.
//********//
No comments:
Post a Comment