Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
पालघरचे खासदार विधिज्ञ चिंतामण वनगा यांच्या निधनानं
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित
शहा आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शोक व्यक्त केला आहे. आदिवासींच्या सर्वांगीण
विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा
शब्दात मुख्यमंत्र्यांनी, तर वनगा यांच्या निधनानं पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत
कार्यकर्ता गमावला आहे, अशा शब्दात दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, वनगा यांच्या निधनामुळे परवा अर्थसंकल्पाच्या
सादरीकरणावर परिणामाची शक्यता नसल्याचं, संसदीय कामकाज मंत्रालयाकडून सांगण्यात आलं
आहे. उद्या सदनाची बैठक होणार नसल्यानं, एक फेब्रुवारीला सदनाच्या कामकाजाला प्रारंभ
होताच, अध्यक्षांकडून शोकसंदेश वाचून दाखवला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या
वर्षीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुस्लीम लीगचे खासदार ई अहमद यांचं
निधन झालं होतं.मात्र अर्थसंकल्प नियोजित तारखेला सादर करण्यात आला होता, आणि दुसऱ्या
दिवशी सदनाचं कामकाज स्थगित ठेवण्यात आलं होतं.
****
ग्रामीण भागातल्या महिला तसंच किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक
स्वच्छतेसंदर्भात जाणीव विकसित होण्यासाठी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला असून, याअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्रामविकास
विभागामार्फत ही योजना राबवली जाणार असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,
या योजनेची सुकाणू संस्था म्हणून काम पाहणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागासह राज्यशासनाच्या सर्व विभागांची
औषध तसंच वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेड
मार्फतच करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं
या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कर्करोग
निदान कक्षातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं
घेतला आहे.
महानेट प्रकल्पाच्या गतिमान पूर्णत्वासाठी मार्गाचा हक्क
(ROW) आणि इतर मान्यताही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत दिल्या. औरंगाबाद तसंच नागपूर
इथं यासाठी रिकव्हरी स्टेट नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर स्थापन करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी
दिली. दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीसाठी निर्मिती धोरणही मंत्रिमंडळानं मंजूर केलं.
****
पेट्रोल आणि डिझेलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळलेलं असल्यामुळे, ग्राहकांकडून
गाड्या बंद पडण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा निषेध म्हणून येत्या
एक तारखेपासून औरंगाबाद जिल्ह्यातले सगळे पेट्रोल पंप संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत
बंद राहणार आहेत. पेट्रोल विक्रेता संघटनेचे सचिव अकील अब्बास यांनी आज औरंगाबाद इथं
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ
स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या
वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. धुळे बाजार समितीतल्या सर्व हमाल मापाडी कामगारांनी
कामबंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.
****
खेडं हा शेवटचा घटक गृहीत धरुन भौगोलिक सलगता, भाषिक संलग्नता
आणि बहुभाषीकता या तत्वांच्या आधारे सीमा प्रश्न सोडवावा, अशी मागणी बेळगाव इथले महाराष्ट्र
एकीकरण समितीचे सदस्य र.वि.पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. उस्मानाबाद
इथं शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार र.वि.पाटील यांना
आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातली ८६५
गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भात संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी
केली.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र
अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर
लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती
ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्यानं अशा शेतकऱ्यांना
लाभ मिळू शकला नाही, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. अर्जदार शेतकऱ्यांनी
दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा
म्हणून तालुकास्तरीय समिती गठित केली असल्याचं ते म्हणाले. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन
त्यांनी केलं आहे.
जालना जिल्ह्यातही अशा ५४ हजार ५९९ शेतकऱ्यांची माहिती
बँकेनं ऑनलाइन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत नसल्यानं, या शेतकऱ्यांना अद्याप
कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच
फेब्रुवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी
जोंधळे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment