Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद एकोणसत्तराव्या गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला, आज राष्ट्राला संबोधित
करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सगळ्या केंद्रांवरून
आधी हिंदीमध्ये आणि नंतर इंग्रजीमध्ये संध्याकाळी सात वाजल्या पासून प्रसारित केलं
जाणार आहे. तर, गणराज्य दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या परेडचं उद्या दूरदर्शनवर होणारं
प्रसारण प्रथमच राष्ट्रपती भवन ते लाल किल्ला, असं पूर्ण मार्गावरचं होणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली मध्ये भारत- आशियान स्मारक शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्राला
संबोधित करणार आहेत. हे संमेलन, दहशतवादाशी सामना, सुरक्षा, व्यापार आणि संपर्क, या
मुद्द्यांवर केंद्रित असणार आहे. आशियान देशांचे सर्व, दहा नेते या संमेलनात भाग घेत
आहेत.हे संमेलन भारत आशियान संबंधांना पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याच्या औचित्यानं होत
आहे. आशियान देशांचे सर्व नेते प्रथमच गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राहणार
आहेत.
****
आज प्रदर्शित
होत असलेल्या पद्मावत या चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी मुंबईसह राज्यभरातल्या चित्रपटगृहांच्या
बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. करणी सेनेच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना
सावधगिरीचा उपाय म्हणून काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना शहरातल्या दोन चित्रपटगृहांवर
दगडफेक करणाऱ्या सहा जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. विरोधाचं वातावरण आणि तिकिटांची
जास्त किंमत असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला गर्दी केल्याचं, तसंच राजस्थान मधल्या
चित्रपटगृह चालकांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला असूनही जयपूरमध्ये
करणी सेनेच्या वतीनं निदर्शनं सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं
पद्मावत चित्रपताला देशभरात प्रदर्शित करण्याची अनुमती दिल्यानंतरही राजस्थान, हरयाणा,
गुजरात आणि मध्य प्रदेश, या चार राज्यांनी तो चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल
त्या चार राज्यांच्या आणि कथितपणे हिंसक निदर्शनं केल्याबद्दल राजपूत करणी सेनेच्या
विरोधात, न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांची
येत्या सोमवारी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे.
****
केंद्र सरकारच्या
रामायण सर्किट योजनेमध्ये नाशिक शहराचा समावेश करण्यात आला असल्यामुळे केंद्र सरकारच्या
पर्यटन विभागाच्या एका पथकानं नाशिक शहराला भेट देऊन धार्मिक स्थळांची माहिती संकलित
करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक मधली रामायण काळातली विविध मंदिरं, सीता गुंफा, सीता
सरोवर तसंच अन्य काही स्थानांना भेट देऊन त्याबद्दलची पौराणिक माहिती या पथकानं घेतली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
शब्दगंध साहित्यिक
परिषदेच्या वतीनं येत्या २७ आणि २८ तारखेला तेरावं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात
आलं आहे. अहमदनगर इथल्या कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी
ज्येष्ठ कथाकार भारत सासणे हे आहेत. दोन दिवस
चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन, परिसंवाद, प्रकट मुलाखत इत्यादी कार्यक्रम
होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष
राजेंद्र उदागे यांनी दिली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या
मोखाडा पंचायत समिती मधले सहाय्यक लेखाधिकारी जे एस गुरव यांना १५ हजारांची लाच घेताना
रंगेहाथ अटक करण्यात आली आहे .पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे . दलित वस्ती सुधार योजनेतर्गत
करण्यात आलेल्या कामांची बिलं पारित करण्यासाठी गुरवनं लाच मागितली होती.
****
लातूर जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ठ व्यवसाय वृद्धी साठीचा बँको पुरस्कार जाहीर झाला
आहे. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद अली यांच्या हस्ते हैदराबाद इथे हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला. बँकेनं व्यवसाय वृद्धीत तीन हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट गाठलं
आहे.
****
पुस्तकांचं
गाव भिलार इथे गावची जत्रा असल्यानं आजपासून शनिवारपर्यंत ‘पुस्तकांचं गाव‘ हा प्रकल्प
बंद राहणार आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी काल मुंबईत ही माहिती दिली.
या कालावधीत गावातली घरं पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांच्या सहलींना वाचनाची आणि पर्यटनाची
सुविधा देऊ शकणार नाहीत, या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावं, अशी विनंती भिलार
वासीयांनी केली आहे.
****
जकार्ता इथे
सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज दुसऱ्या फेरीत सायना नेहवालचा
सामना चीनच्या चेन शाओ शिन शी आणि पी.व्ही.सिंधूचा सामना मलेशियाच्या गो जिन वेईशी
होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment