Tuesday, 30 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना देशभर अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि नौदल, हवाई दल आणि वायु दलाच्या प्रमुखांनी दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात सकाळी ११ ते ११ वाजून दोन मिनिटांपर्यंत मौन पाळण्यात आलं. या वेळेत आकाशवाणीनंही मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली.

 दरम्यान, गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर कुष्ठरोग निवारण दिनही पाळण्यात येत आहे. गांधीजींनी या रोगाच्या निर्मुलनासाठी प्रयत्न केले होते. यानिमित्त आज देशभरातल्या ग्रामपंचायतींमध्ये कुष्ठरोग जागरुकता अभियान - ‘स्पर्श’चं आयोजन करण्यात आलं आहे. 

 औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अधिकारी तसंच मान्यवरांनी मौन पाळुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

 पालघरचे खासदार विधीज्ञ चिंतामण वनगा यांचं थोड्या वेळापूर्वीच दिल्ली इथं ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वनगा यांनी पालघर लोकसभा मतदार संघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं.

****

 मंत्रालयात विष प्राशन केल्यानं मृत्यू झालेल्या वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी न्याय न मिळाल्याची तक्रार करत त्यांनी मंत्रालयात विष घेतलं होतं, त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिंदखेड्याचे आमदार आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पाटील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. धर्मा पाटील यांचा लढा कदापी वाया जाणार नाही, त्यांच्या परिवाराला आपण न्याय मिळवून देवू, आणि जे दलाल या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करु, असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं.

 दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे, त्यांच्याविरोधात दोंडाईचा न्यायालयात आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं.

****

 राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचही बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. या बंदमुळे बाजारातले जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 वस्तू आणि सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. देशाच्या एकूण वस्तू आणि सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा २२ पूर्णांक तीन टक्के इतका आहे. काल प्रकाशित करण्यात आलेल्या देशाच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालात, वस्तू आणि सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा ही पाच राज्य अग्रेसर ठरली आहेत. राज्यांतर्गत व्यापारात आणि वस्तू सेवा कर नोंदणीमध्येही महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे.  

****

 इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून दिल्लीत सुरु झाली. आज पात्रता फेरीचे सामने होत आहेत, तर उद्यापासून मुख्य सामने सुरु होणार आहेत. पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, के श्रीकांत या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  

 दरम्यान, या स्पर्धेचं उद्घाटन काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. मुलांना आणि तरुणांना क्रिडा क्षेत्र व्यवसाय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी नायडू यांनी ज्येष्ठ बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.

****

 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. गांधीगिरी पद्धतीनं केलेल्या या आंदोलनात, शहरातल्या पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना चॉकलेट वाटप करण्यात आलं.

****

 परभणी जिल्ह्यात सोनपेठ इथं काल तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनासाठी खंबीर मनोधैर्य आवश्यक असल्याचं मत तहसीलदार जिवराज डापकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

 जालना इथं काल पहिल्या नवोदित  साहित्य संमेलनाचा समारोप झाला. नवोदित साहित्य संमेलनाचा वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. ललित अधाने यांनी यावेळी केलं. गझल, काव्यवाचन, परिसंवाद आणि लोकसाहित्याचे दर्जेदार कार्यक्रम या संमेलनात अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडले असल्याचं ते म्हणाले.

*****

***

No comments: