Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
कालबाह्य असलेली प्रत्येक गोष्ट सोडून देत, आवश्यक तिथे
सुधारणांचा स्वीकार केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन
प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात ते आज बोलत होते. या मालिकेचा आज चाळीसावा
भाग प्रसारित झाला. सुधारणा घडवून आणणं ही भारताची परंपरा असून, कुप्रथांचं समाजातून
समूळ उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी करावी, असं ते म्हणाले.
पद्म पुरस्कारांच्या निवडीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून
बदल केले असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, पद्म पुरस्कार हे फक्त नावावरुन नव्हे तर
कामावरुन दिले पाहिजेत, असं नमूद केलं. सर्वसामान्य वाटत असलेल्या परंतू असामान्य कार्य
केलेल्या लोकांना पद्म पुरस्कार दिले जात असल्याचं सांगून त्यांनी यावर्षीच्या पद्म
पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अशा प्रकारे महान कार्य करणाऱ्या
व्यक्तींना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बोलवून त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांनी ऐकले
पाहिजे, असं ते म्हणाले.
आपल्या देशातल्या महिला देशाचा मान सन्मान वृद्धिंगत करत
असल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्त्री शक्तिसाठी कोणतीही मर्यादा असू शकत नाही, असं सांगतानाच
त्यांनी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अंतराळवीर कल्पना चावला, यांच्यासह अनेक
कर्तृत्ववान महिलांचे दाखले दिले.
स्वच्छ भारत अभियानाबद्दल सांगताना पंतप्रधानांनी अकोल्यातल्या
मोरणा नदी स्वच्छता उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
३० जानेवारी ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी
असून, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरुन पुढे जाण्याचा संकल्प करणं, यापेक्षा मोठी त्यांना
श्रद्धांजली होऊ शकणार नाही, असं ते म्हणाले.
****
संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली
आहे. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्वच पक्षांच्या
नेत्यांनी सहकार्य करावं अशी विनंती त्या या बैठकीत करणार आहेत. अधिवेशनाच्या या
सत्राचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकारनंही आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनाचा
पहिला टप्पा येत्या सोमवारपासून सुरू होणार असून, नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एक फेब्रुवारीला सन २०१८-१९
चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
****
पंजाब केसरी लाला लजपत राय यांची आज १५३वी जयंती. यानिमित्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला लजपत राय यांना आदरांजली
वाहिली आहे. लालाजींनी भारतीय इतिहासात आपली छाप सोडली असून, एक इमानदार आणि धाडसी
नेता म्हणून राष्ट्र त्यांना सदैव स्मरण करेल, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशात
म्हटलं आहे.
****
देशभरात
आज राष्ट्रीय लसीकरण मोहीम
राबवण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात
२०१८ सालच्या पल्स पोलिओ कार्यक्रमाचं उदघाटन केलं. देशातून पोलिओचं उच्चाटन
करण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट असून, पाच वर्षांखालच्या
अंदाजे १७ कोटी बालकांना आज पोलिओचा डोस दिला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ चिलवडी इथं
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपियां जिल्ह्यात हिंसक
आंदोलकांच्या एका गटावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात लष्करानं झाडलेल्या
बंदूकीच्या फैरीनं दोन नागरिकांचा मृत्यू झाला. गनौपुरा गावातून सुरक्षा दलाची
तुकडी जात असताना आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. आंदोलकांनी
एका लष्करी अधिकाऱ्यावर जोरदार दगडफेक करुन त्याला गंभीर जखमी केल्यानं
लष्कराला बंदूकीच्या फैरी झाडणं भाग पडलं असल्याचं सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं
श्रीनगर इथं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. जमावानं
या अधिकाऱ्याच्या हातून शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत वाहनं पेटवून
दिली. यात सैन्यदलाचे सहा जवानही जखमी झाले.
****
जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स
बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सायना नेहवालला
पराभवाचा सामना करावा लागला. आज झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या ताय जू इंग हीनं
सायनाचा नऊ - २१, १३ - २१ असा पराभव केला.
****
मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस
स्पर्धेत आज भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याची जोडीदार हंगेरीची टिमिआ बागोस मिश्र
दुहेरीचा अंतिम सामना खेळणार आहेत. त्यांचा सामना क्रोएशियाचा मेट फेविक आणि
कॅनडाची गॉब्रिएला डाब्रोवस्की यांच्याशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment