Wednesday, 31 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 नौदलाच्या, स्कॉर्पियन श्रेणीतल्या आय एन एस करंज या पाणबुडीचं आज मुंबईतल्या माझगाव डॉक इथून जलावतरण करण्यात आलं. अत्याधुनिक शस्त्रं वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी पूर्णपणे भारतीय बनावटीची, असून, या पाणबुडीमुळे नौदलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ झाली आहे. नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

 उत्तर भारतात काही वेळापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू काश्मीरसह दिल्लीतही अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे बसल्याचं, पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खेलो इंडिया या शालेय क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या आवृत्तीचं नवी दिल्लीत उद्घाटन करणार आहेत. या स्पर्धा पुढच्या महिन्याच्या आठ तारखेपर्यंत चालणार आहेत. देशभरातून विविध क्रीडाप्रकारातले प्रतिभावान खेळाडू निवडून त्यांना पुढचं प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

****

 थेट लाभ हस्तांतरण अर्थात, डी.बी.टी. योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तीन हजार दोनशे दहा कोटींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या छप्पन्न मंत्रालयांच्या चारशे दहा योजनांचा निधी वितरित करण्यात येत आहे.

****

 माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागानं जारी केलेल्या लुक आऊट सर्क्युलरला स्थगिती देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. हे प्रकरण पुन्हा मद्रास उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाची गुणवत्तेनुसार सुनावणी करावी, असं सांगत याचा निर्णय दोन महिन्यात घ्यावा, असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत कार्ति चिदंबरम यांना देश सोडता येणार नाही, असंही या सुनावणीत नमूद करण्यात आलं आहे.

****

 राज्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं, जपानमधील वाकायामा प्रांताचे राज्यपाल योशीनोबू निसाका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सामंजस्य कराराचं नुतनीकरण करण्यात आलं. जपानी पर्यटकांना चांगल्या सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्यांजवळ जपानी पद्धतीच्या गावाची उभारणी प्रस्तावित असल्याचं, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलं.

****

 मैला वाहून नेण्याच्या प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी, राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांची सुकाणू अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात काल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यांचे मंत्री आणि मुख्य सचिवांची बैठक घेऊन, मैला वाहून नेणाऱ्या लोकांचं केंद्र सरकार सर्वेक्षण करणार असल्याचं सांगितलं, त्यानंतर कांबळे बोलत होते. जिल्हा तसंच तालुका पातळीवरही सुकाणू अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या भांडगाव-खोर या गावातल्या मीनाक्षी फेरो या कंपनीत आज सकाळी स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दहा ते बारा कामगार जखमी झाल्याचं वृत्त आहे. या कारखान्यामध्ये भंगारातलं लोखंड वितळवणाऱ्या भट्टीपाशी हा स्फोट झाला.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथंही आज सकाळी भंगारच्या पंधरा ते सोळा गोदामांना लागलेली, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अग्निशमन दलाचे आठ ते दहा बंबांमार्फत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.                                           .                            ****

 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी किफायतशीर तसंच उपयुक्त बैलचलित शेती अवजारांवर भर द्यावा लागेल, असं मत, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहसंचालक डॉक्टर बी एस प्रकाश यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध राज्यांमधून अनेक शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.

*****

***


No comments: