Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यातली शहरं स्मार्ट आणि स्वच्छ
करण्यासाठी विविध अभियानांच्या माध्यमातून शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच, शहरं पर्यावरणस्नेही
बनवण्याच्या दृष्टीनं राज्यात यंत्रणा उभारण्यास, ‘सिमन्स’ आणि ‘हिताची’ या उद्योगसमूहांनी
अनुकूलता दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक
परिषदेत या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी यासंदर्भात चर्चा केल्यानंतर, यासाठी
राज्य शासनासोबत काम करण्याला या कंपनींनी मान्यता दिली आहे.
****
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं
आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक
यांनी मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथ दिली. लातूर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या
वतीनं आज लातूरमध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तसंच, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचं वाटपही करण्यात आलं. तर, राज्यातल्या
पहिल्या मतदार साक्षरता क्लबचं उद्घाटन नंदुरबार शहरात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी
अश्वनीकुमार यांच्या उपस्थितीत झालं. औरंगाबादमध्ये मराठवाडा विभागीय माहिती कार्यालयात
आज या दिनानिमित्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी कार्यालयातल्या अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
****
‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात
आज धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा गावात क्षत्रिय राजपूत समाज आणि अन्य काही संघटनांनी
बंद पुकारला आहे. राजपूत समाजासह विविध संघटना गेल्या चार दिवसांपासून या चित्रपटाविरुध्द
धुळे जिल्ह्यात विविध प्रकारची आंदोलनं करत आहेत. आजच्या बंदला अनेक संघटनांनी पाठिंबा
जाहीर केला असल्यामुळे गावातली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून, पोलिसांनी बंदोबस्त
वाढवला आहे. नंदुरबार शहरातही आज यासाठी बंद पुकारला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयात
येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे आता स्पष्ट झालं आहे,
अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, यांनी केली आहे. मंत्रालयात
आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस आज पाटील
यांनी रुग्णालयात जाऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. सरकार शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला
देत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांना सरकारकडून भीक नाही तर आपल्या जमिनीची योग्य किंमत
हवी आहे, असं प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केलं.
****
परभणी शहरातल्या प्रस्तावित रात्र-निवारा
इमारतीचं भूमीपूजन आज परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
या रात्र निवाऱ्यामुळे शहरातल्या बेघर, अनाथ, वृद्ध आणि अपंग नागरिकांची राहण्याची
आणि जेवण्याची सोय होणार असल्याचं नमूद करत, बांधकाम लौकरात लौकर करून या इमारतीचं
लोकार्पण तात्काळ करण्यात येईल, असं वरपूडकर यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं कोर्ट फी मध्ये वाढ
केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या वकील संघानं आज कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय
घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम होऊन कामकाज
बंद झालं होतं. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करताना वकिलांनी दरवाढीच्या
शासन निर्णयाची होळी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात
शासनानं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल या कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही संघटनेला मान्य
न झाल्यानं, राज्य परिवहन महामंडळाच्या बीड आगारात या अहवालाची होळी करून निषेध नोंदवण्यात
आल्याची माहिती, महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस, अर्थात इंटक, या संघटनेनं दिली
आहे. हा अहवाल तयार करताना या समितीनं कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली
नाही, तसंच कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप इंटकनं केला आहे.
****
भोकरदन तालुक्यातल्या कृषी कार्यालयातला
कृषी सहायक संदीप दळवी याच्यावर पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबद्दल जालन्याच्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचं शेततळ्याचं अनुदान
परत न पाठवण्यासाठी दळवी यानं ही लाच मागितली होती.
****
गुंतवणूकदारांचे पैसे तात्काळ बँक
ऑफ बडोदा मध्ये जमा करावेत आणि येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत आपल्या संपत्तीचा तपशील
द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी
यांना आज दिला. डीएसकेंना येत्या पाच फेब्रुवारीपर्यंत अटक करू नये, असा आदेशही न्यायालयानं
पोलिसांना दिला. ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर
पैसे घेऊन त्यांना घरं बांधून दिली नसल्यामुळे कुलकर्णी यांच्यावर खटला सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment