Wednesday, 31 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø अस्मिता योजने अंतर्गत राज्यशासन माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणार

Ø राज्य सरकारनं कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी-खासदार राजू शेट्टी यांची मागणी

Ø कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी बॅँकेशी संपर्क साधण्याचं सरकारचं आवाहन

आणि

Ø १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत भारताची अंतिम सामन्यात धडक.

*****



ग्रामीण भागातल्या महिला तसंच किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव विकसित होण्यासाठी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून, याअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. काल झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. ग्रामविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाणार असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, या योजनेची सुकाणू संस्था म्हणून काम पाहणार आहे.

 सार्वजनिक आरोग्य विभागासह राज्यशासनाच्या सर्व विभागांची औषध तसंच वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेड मार्फतच करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कर्करोग निदान कक्षातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

 महानेट प्रकल्पाच्या गतिमान पूर्णत्वासाठी मार्गाचा हक्क आणि इतर मान्यताही कालच्या बैठकीत देण्यात आल्या. औरंगाबाद तसंच नागपूर इथं या प्रकल्पासाठी रिकव्हरी स्टेट नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर स्थापन करण्यात येईल.

 दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीसाठी निर्मिती धोरण, शासकीय जमिनींवरील इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक व्यवहार्य करण्यासाठी भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनीच्या पुनर्विकास अधिमुल्यामध्ये सुधारणा, राज्यासाठी पाचव्या वित्त आयोगाची स्थापना, प्रशासकीय व्यवहारात मराठी मजकूर इंग्रजी भाषेत अनुवादीत करण्यासाठी १४ भाषा तज्ज्ञांचं पॅनेल स्थापन करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

****



 मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत सुमारे १७ लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी यावेळी बोलताना, खासगी नेत्र शल्य चिकित्सकांनी दरवर्षी किमान ५० शस्त्रक्रिया मोफत करण्याचं, आवाहन केलं.

****



 राज्य सरकारने कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकार कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करतं, मात्र प्रत्यक्षात लाभार्थी सापडत नाहीत, अशी टीका शेट्टी यांनी केली.



 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत, काही शेतकऱ्यांनी दिलेली कर्जाची माहिती, बँकेच्या माहितीशी जुळत नसल्यानं, अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचं, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा यासाठी तालुकास्तरीय समिती गठित केली असून, सर्व जिल्ह्यातल्या संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****



 लिंगायत समाजातल्या सर्व पोटजातींना इतर मागास वर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात, राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल मागवणार असल्याचं, विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते होते.

****



 मंत्रालयात विष प्राशन केल्यानं मृत्यू झालेले वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिव देहावर काल धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिंदखेड्याचे आमदार आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाटील यांच्या परिवाराला आपण न्याय मिळवून देवू, आणि जे दलाल या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करु, असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं.

 दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांना चौकशी करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

****



 पालघरचे खासदार विधीज्ञ चिंतामण वनगा यांचं काल दिल्ली इथं ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. वनगा यांनी पालघर लोकसभा मतदार संघाचं तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. वनगा यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.

 दरम्यान, खासदार वनगा यांच्या निधनामुळे उद्या संसदेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर परिणामाची शक्यता नसल्याचं, संसदीय कामकाज मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले वीरेंद्र तावडे यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. काल, कोल्हापूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी  २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून स्वातंत्र्य संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. या वेळेत आकाशवाणीनंही मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाठ यांचं ‘गैरसमजाच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा’ या विषयावर तर, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत प्राध्यापक जयदेव डोळे यांचं ‘महात्मा गांधी यांना आज कसे समजून घ्यायचे’ या विषयावर व्याख्यान झालं.

****



 न्यूझीलंड मध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात भारतानं पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं पाकिस्तानसमोर २७३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या ६९ धावांतच सर्वबाद झाला. येत्या तीन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल.

****



 नवी मुंबईत काल झालेल्या चौदा वर्षांखालील नवी मुंबई क्रिकेट चषक स्पर्धेत तनिष्क गवते या फलंदाजाने नाबाद एक हजार ४५ धावा केल्या. तनिष्कनं दोन दिवस खेळपट्टीवर टिकून राहत, १४९ चौकार आणि ६७ षटकारांच्या सहाय्यानं ही कामगिरी केली.

****



 पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळलेलं असल्यामुळे, ग्राहकांकडून गाड्या बंद पडण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा निषेध म्हणून उद्या एक तारखेपासून औरंगाबाद शहरातले सगळे पेट्रोल पंप संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत. पेट्रोल विक्रेता संघटनेचे सचिव अकील अब्बास यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या आठवडाभरासाठी असलेलं हे आंदोलन, नंतर जिल्हाभरात वाढवणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे

****



 खेडं हा शेवटचा घटक गृहीत धरुन भौगोलिक सलगता, भाषिक संलग्नता आणि बहुभाषिकता या तत्वांच्या आधारे सीमा प्रश्न सोडवला जावा, अशी मागणी बेळगाव इथले महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य र. वि. पाटील यांनी केली आहे. पाटील यांना काल, उस्मानाबाद इथं उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सीमा भागातली ८६५ गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भात संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कवयित्री प्रा.संध्या रंगारी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरूनगर शाखेचा ‘पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी रंगारी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. रंगारी यांच्या ‘वाताहतीची कैफियत’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****



 गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी बांधकाम साहित्य विक्रेत्याकडून दोन लाख रुपये लाच घेतल्या प्रकरणी नांदेड इथं सहायक पोलिस अधीक्षक विजय यादव आणि अन्य एकाविरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल ही कारवाई केली.

****



 मराठवाडा लेबर युनियन आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं विलीनीकरण करुन एकच राज्यव्यापी मंडळ ठेवण्याचा निर्णय रद्द केल्यास, बेमुदत बंदचा इशारा महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी दिला.

*****

***

No comments: