Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद
यादव हे चारा घोटाळ्याशी संबंधित तिसऱ्या प्रकरणातही दोषी असल्याचं सिद्ध झालं आहे.
१९९० मध्ये चाईबासा कोषागारातून ३७ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी रांचीच्या
विशेष सीबीआय न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत यादव यांच्यासह, बिहारचे माजी मुख्यमंत्री
जगन्नाथ मिश्रा आणि इतर ५० जण दोषी ठरले, तर सहा जणांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता
केली. चारा घोटाळ्याच्या यापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा झालेले लालुप्रसाद यादव सध्या
रांचीच्या बिरसा मुंडा कारागृहात आहेत.
दरम्यान, या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात
आव्हान देणार असल्याचं, माजी उपमुख्यमंत्री आणि लालुप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव
यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाच्या राज्यभरातल्या रिसॉर्ट्समधल्या विजेच्या खर्चात ब चत करण्याच्या
आणि रिसॉर्ट्स पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं त्यामध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात
येणार आहेत. पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी याबाबतचे निर्देश काल झालेल्या बैठकीत
दिले असून, अशा यंत्रणा सुरुवातीला माळशेज घाट, गणपतीपुळे, ताडोबा आणि नागपूर शहरातल्या
रिसॉर्ट्स मध्ये प्रायोगिक तत्वावर बसवण्यात येणार आहेत. यासाठी ‘रिन्युएबल एनर्जी
सेव्हींग कंपनी’, म्हणजेच रेस्को, मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे.
****
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आज राष्ट्रीय
सूर्यनमस्कार दिनानिमित्त एक कोटी सूर्यनमस्काराची संकल्प पूर्ती करून, जागतिक विक्रम
नोंदवण्यात आला. आज सकाळी नाशिक शहरात पंचवटी परिसरात माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडा
संकुलावर नऊ शाळांच्या आठ हजार मुलांनी सूर्यनमस्कार घालून हा विक्रम पूर्ण केला. सूर्यनमस्कार
घालण्याचा उपक्रम गेले वर्षभर सुरू होता. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश
महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
प्लस्टिक विरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशानं गोंदिया
इथं पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोंदिया शहरात संदेश फेरी काढली, तसंच यासंदर्भात
एक पथनाट्य सादर केलं. या विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्या तयार करून त्यांचं वाटपही
केलं.
****
मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यां मधल्या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे दीडशे कोटी रूपयांच्या खर्चाला ग्रामविकास
विभागानं मान्यता दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातल्या सुमारे दोनशे पस्तीस किलोमीटर्सच्या
रस्त्यांसाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रूपयांच्या अंदाजित रकमेला मान्यता देण्यात आली
असून, या रस्त्यांच्या नियमित आणि देखभाल दुरूस्तीसाठी पाच वर्षांसाठी सुमारे दहा कोटी रूपयांच्या
अंदाजित रकमेलाही मान्यता देण्यात आली आहे.
****
पाळीव प्राण्यांच्या
मृतदेहांचं दहन करण्यासाठी मुंबई शहरात तीन दाहगृहं उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं
घेतला आहे. शहरातली पाळीव प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेत हा निर्णय घेतल्याची
माहिती पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. दक्षिण मुंबईत महालक्ष्मी इथे, पूर्व
मुंबईत देवनार इथे आणि पश्चिम मुंबईत मालाडमध्ये ही दाहगृहं उभारण्यात येणार आहेत.
****
जालना इथल्या
मराठवाडा युवा साहित्य मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेलं पहिलं राज्यस्तरीय मराठी नवोदित
साहित्य संमेलन येत्या अट्ठावीस तारखेला जालन्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात
होणार आहे. या साहित्य संमेलनात लोकसाहित्यालाही संधी दिलेली असल्यामुळे रसिकांना पोवाडा,
गवळण, भारुड यासारख्या कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येणार असल्याची माहिती शाहीर अप्पासाहेब
उगले यांनी दिली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर ललित अधाने यांची निवड झाली आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान
करण्यात येणार आहे.
****
इंडोनेशिया
मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवालसहित आठ भारतीय खेळाडू
आज आपले पहिले सामने खेळणार आहेत. पी.व्ही. सिंधूला या स्पर्धेसाठी द्वितीय मानांकन
मिळालं आहे. आज तिचा सामना इंडोनेशियाच्या हन्ना रामादिनीशी होणार असून, सायना नेहवालचा
सामना चीनच्या युफेई चेन हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये पी.कश्यप आणि समीर वर्मा
तर पुरुष दुहेरीमध्ये एस.रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तसंच मनु अत्री आणि बी.सुमित
रेड्डी, या जोड्या, आपले या स्पर्धेतले पहिले सामने आज खेळतील.
*****
***
No comments:
Post a Comment