आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जानेवारी २०१८ सकाळी
११.००
****
१५ वी मुंबई मॅरेथॉन आज सकाळी पार पडली. छत्रपती
शिवाजी टर्मिनलहून निघालेल्या या स्पर्धेत. विविध श्रेणीत ४४ हजाराहून अधिक लोकांनी
सहभाग नोंदवला. या स्पर्धेत इथियोपियाचे खेळाडू विजयी झाले. थोड्यावेळापूर्वीच दिव्यांगांची
चाकाच्या खुर्चीतून मॅरेथॉन सुरू झाली आहे.
****
त्रिपुरा, मणीपूर आणि मेघालय या ईशान्येकडच्या तीन
राज्यांचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातल्या
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
दिल्लीतल्या बवाना औदयोगिक
क्षेत्रात फटाक्यांच्या गोदामाला काल सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा
होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू
शकलेलं नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या नातेवाईकांना
पाच लाख रुपये मदत जाहीर केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
****
कोणत्याही कंपनीनं स्रोतावर कपात केलेला कर - टीडीएस
जमा केला नाही तर तिच्याविरूद्ध गुन्हा नोंदवून, जबाबदार व्यक्तीला तीन महिने किंवा
सात वर्ष कारावासाची शिक्षा होवू शकते. दिल्लीचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त एस. एस.
राठौर यांनी ही माहिती दिली. टीडीएसची रक्कम सरकारी धन असून ती वेळेवर जमा करणं आवश्यक
असल्याचं ते म्हणाले.
****
हुतात्मा जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी
महामंडळात नोकरी देणाऱ्या तसंच वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करुन देणाऱ्या
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी केली आहे. मुंबईत एसटीच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातल्या आत्मसमर्पण
केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या बिरसा मुंडा
पुनर्वसन प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.
****
आगामी अर्थसंकल्पाविषयी नागरिकांनी आपल्या सूचना
पाठवाव्यात, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी केलं आहे. नागरिकांनी ३१ जानेवारीपर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट माय जी ओ व्ही डॉट इन
या संकेतस्थळावर सूचना नोंदवाव्यात, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment