Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø आर्थिक असमानता कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नरत - राष्ट्रपतींचं
प्रतिपादन
Ø संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ; येत्या आर्थिक
वर्षात वृद्धीचा दर सात ते साडे सात टक्क्यांपर्यंत राहण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा
अंदाज
Ø राज्यभरातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आज
लाक्षणिक बंद
आणि
Ø १९
वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान दरम्यान उपान्त्य सामन्याला प्रारंभ
****
आर्थिक असमानता कमी करण्यासाठी सरकार
प्रयत्नरत असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. काल संसदेच्या मध्यवर्ती
सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं, त्यावेळी राष्ट्रपतींनी
मुस्लीम महिलांचा सन्मान राखणाऱ्या तिहेरी तलाक विधेयकाला संसद लवकरच कायद्याचं स्वरूप
मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकसभा तसंच विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी
घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचं एकमत व्हावं, असंही ते म्हणाले. संरक्षण, आरोग्य,
शिक्षण, कृषी, ऊर्जा, पेयजल, महिला सन्मान, कामगार कल्याण, युवाकल्याण, दिव्यांगांसाठी
शिक्षण तसंच नोकरीत आरक्षण, नोकरीपेशा महिलांची प्रसुतीरजा, उज्ज्वला गॅस योजना, महिलांसाठी
स्वच्छतागृह, अंतराळ विज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नक्षलवाद बिमोड, आपत्ती व्यवस्थापन,
आदी क्षेत्रात सरकारकडून केल्या जात असलेल्या कार्याचा आढावा घेतला. सरकार राबवत असलेल्या
विविध योजनांचीही राष्ट्रपतींनी यावेळी माहिती दिली. रोखरहित व्यवहारांमुळे ५७ हजार
कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचा अपहार टाळता आल्याचं, राष्ट्रपती म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत
काल सायंकाळी ‘बिटींग द रिट्रीट’ अर्थात प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप झाला. तिन्ही सैन्य दल तसंच पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान या सोहळ्यात सहभागी झाले.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ
झाला. आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल संसदेत सादर करण्यात आला. २०१८-१९ या आर्थिक वर्षात
वृद्धीचा दर सात ते साडे सात टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज, आर्थिक सर्वेक्षणातून
व्यक्त करण्यात आला असून, चालू आर्थिक वर्षात विकासाचा दर सहा पूर्णांक ७५ शतांश टक्के
असल्याचं, नमूद करण्यात आलं आहे. वस्तू सेवा कराच्या नोंदीनुसार, अप्रत्यक्ष कर दात्यांच्या
संख्येत सुमारे ५० टक्के वाढ झाल्याचं निदर्शनास आलं असून, सेवा क्षेत्रात आठ पूर्णांक
तीन दशांश तर उद्योग क्षेत्रात चार पूर्णांक चार दशांश टक्के वाढ झाल्याचं, या सर्वेक्षणात
म्हटलं आहे.
दरम्यान, आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यावर संसदेचं
कामकाज परवा एक फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आलं. २०१८-१९ चा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला
सादर केला जाणार आहे. अधिवेशनाचं हे पहिलं सत्र नऊ फेब्रुवारीपर्यंत, तर सुमारे महिनाभराच्या
सुटीनंतर पाच मार्चपासून सहा एप्रिलपर्यंत अधिवेशनाचं दुसरं सत्र चालणार आहे.
काल सकाळी नवी दिल्लीत पत्रकारांशी
बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी अर्थसंकल्प हा सामान्य
माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा असल्याचं म्हटलं आहे, या अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयक पारित होण्याची अपेक्षा व्यक्त
करत, पंतप्रधानांनी हे अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं
आवाहन केलं.
****
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी
न्याय न मिळाल्याची तक्रार करत, मंत्रालयात विष घेतलेले वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील
यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर संबंधित जमिनीचं पुनर्मूल्यांकन होईल, असं ऊर्जा
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ही प्रक्रिया ३० दिवसात पूर्ण केली
जाईल, असं आश्वासन त्यांनी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना लिहिलेल्या
पत्रात दिलं आहे.
दरम्यान, या घटनेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली. पाटील यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं
आहे. धर्मा पाटील यांचा मृत्यू म्हणजे सरकारनं केलेली हत्या असल्याचा आरोप काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी
अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी सरकारविरोधात
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम
गोऱ्हे यांनी या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारचा ९० टक्के दोष असून, विद्यमान
सरकारचा दहा टक्के दोष असल्याचं म्हटलं आहे.
रोजगार
हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी सर्व आरोप फेटाळून लावत विरोधकांनी केलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित
असल्याचं, म्हटलं आहे. २००९ पासून सुरू असलेल्या प्रकरणात तत्कालीन सरकारातले
संबंधित घटक तसंच तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे
केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाटील यांच्या मृत्यूनंतर धुळे जिल्ह्यात संतप्त
शेतकऱ्यांनी धुळे दोंडाईचा मार्ग रोखून धरला होता, यामुळे या मार्गावरची वाहतुक काही
काळ विस्कळीत झाली होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांना आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी सर्वत्र अभिवादन
करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या
हुतात्म्यांना आज देशभर दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात येतं. सकाळी अकरा वाजता
सर्वांनी मौन पाळून हुतात्म्यांना
आदरांजली वाहण्याचं आवाहन प्रशासनानं
केलं आहे.
****
राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ
स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या
वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. नवी मुंबई इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज राज्यभरातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार
समित्याही बंद राहणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, माथाडी कामगारांच्या सध्याच्या वेतनात तसंच
कल्याणकारी योजनांमधे कोणताही प्रतिकूल बदल केला जाणार नसल्यानं, आज पुकारलेला लाक्षणिक
संप मागे घ्यावा, असं आवाहन, शासनानं केलं आहे.
****
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान उपान्त्य फेरीचा सामना
सध्या सुरू आहे. भारतानं प्रथम फलंदाजी
करत, पाकिस्तान संघाला २७३ धावांचं लक्ष्य दिलं आहे. या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या उपान्त्य
फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या
अंतिम सामन्यात धडक मारली. आजच्या सामन्यात जिंकणारा संघ तीन
फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम
सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळेल.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली इथं झालेल्या पथसंचलनादरम्यान,
एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट - वायुदलातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून, बीड
जिल्ह्यातल्या परळीमधल्या परचुंडी इथला रहिवासी १९ वर्षीय सर्वेश नावंदे याला, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या अडीच हजार स्पर्धक विद्यार्थ्यांमधून
सर्वेशची निवड झाली आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करूनही लाभ न मिळालेल्या
शेतकऱ्यांनी, तत्काळ संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी केलं आहे. तसंच दीड लाख रुपयापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी
३१ मार्चपूर्वी आपल्या हिश्शाची रक्कम जमा केल्यावर, कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं,
सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या दोन लाख ६६ हजार १३५ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज
केला असून, त्यापैकी एक लाख २४ हजार सहाशे एकोणचाळीस पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा
लाभ देण्यात आला आहे.
****
सर्वसामान्य व्यक्ती तसंच शेतकरी केंद्रबिंदू मानून
राज्य शासनामार्फत विकासकामं करण्यात येत असल्याचं
जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. समाधान शिबीराच्या पूर्वतयारीबाबत
घनसावंगी इथं घेण्यात आलेल्या बैठकीत काल ते बोलत होते. समाधान शिबीराच्या माध्यमातून
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment