आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ जानेवारी २०१८ सकाळी
११.००
****
थोर स्वातंत्रसैनिक आणि आझाद
हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम
व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींना आदरांजली अर्पण केली.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात नेताजी महत्वाचे सेनापती होते, असं राष्ट्रपतींनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. जय हिंदचा नारा देणारे नेताजी राष्ट्रीय प्रतिक आणि एक
अद्भुत नेते होते, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर नेताजींची धाडसी वृत्ती आणि
पराक्रमाचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वित्झर्लंडमधल्या दावोस
इथं ४८व्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेला संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान
जगातले प्रमुख व्यापारी आणि भारतीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
दरम्यान, काल दावोस इथं पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी फेडरेशन
ऑफ स्वित्झर्लंडचे अध्यक्ष एलन बर्सेट यांची भेट घेतली. यावेळी उभय देशांमधले संबंध
अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली.
****
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं ऑक्टोबर-२०१७
पासूनचं प्रस्तावित वाढीव मानधन आगामी मार्च
महिन्यातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिन्यांच्या फरकाच्या रकमेसह त्यांच्या खात्यात
जमा होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. काल
सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात नायगाव इथं माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या
जाणीव अभियानांतर्गत भाग्यश्री मेळाव्यात त्या बोलत होत्या. दहा महिन्यांच्या थकित
पोषण आहाराचं देयकही तातडीनं देण्यात येणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृषी
पत पुरवठयाचं उद्दिष्ट येत्या अर्थसंकल्पात अकरा लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवलं जाण्याची
शक्यता असल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. या आर्थिक वर्षातल्या दहा लाख कोटी
रुपयांच्या नियोजित पत पुरवठ्यातलं सुमारे सव्वा सहा लाख कोटी रुपयांचं कर्ज गेल्या
सप्टेंबर पर्यंत वितरित झालं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment