Tuesday, 23 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.01.2018 - 17.25

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 January 2018
Time 17.25 to 17.30 
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
वातावरण बदल, दहशतवाद आणि देशांचं आत्मकेंद्रीत होणं ही जगापुढची सर्वात मोठी आव्हानं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं ४८व्या जागतिक आर्थिक मंचाच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगळी दिशा मिळाल्याचं सांगून पंतप्रधानांनी, १९९७ पासून भारताच्या अर्थव्यवस्थेत सहा पट वाढ झाली असल्याचं नमूद केलं. भारत आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये अमुलाग्र परिवर्तन करत असून, यासाठी देशानं सुधारणा, कृती आणि परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला असल्याचं ते म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था गुंतवणुकीसाठी सुलभ बनवली जात असून, यामुळे भारतात येणं, काम करणं, उत्पादन करणं आणि आपली उत्पादनं आणि सेवांची जगभरात निर्यात करणं सोपं होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.   
****
आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका कोणासोबतही युती न करता, स्वबळावर लढवण्याचा ठराव शिवसेनेनं आज संमत केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत आयोजित मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी मांडलेला हा प्रस्ताव एकमतानं संमत झाला. शिवसेना स्वबळावर लोकसभेच्या ४८ पैकी किमान २५ तर विधानसभेच्या २८८ पैकी किमान १२५ जागा जिंकेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, युवानेते आदित्य ठाकरे, आनंद आडसुळ, अनंत गिते, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांची नेते पदी, तर रघुनाथ कुचीक, आणि विठ्ठल गायकवाड यांची उपनेतेपदी, आणि पक्ष सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित करताना, केंद्र तसंच राज्य सरकारवर टीका केली. जातीपातीचं तसंच प्रांतवादाचं राजकारण कदापीही चालवून घेणार नसल्याचा इशारा देतानाच, ठाकरे यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी जातीय वाद थांबवावेत, असं आवाहन केलं. 
****
येत्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात आकाशवाणीचा चित्ररथ सहभागी होणार आहे. आठ दशकांपासून लोकसेवा, सामाजिक - सांस्कृतिक वारसा, त्याचं संवर्धन आणि संरक्षणात आकाशवाणीचं योगदान या चित्ररथात दाखवण्यात येणार आहे. पथसंचलनात सादर होणाऱ्या २३ चित्ररथांमध्ये आकाशवाणीचा चित्ररथ सर्वात पुढे असून, यात पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे.
दरम्यान, राजपथवर आज या पथसंचलनाची रंगीत तालिम घेण्यात आली. 
****
ओमप्रकाश रावत यांनी आज देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ यावर्षी डिसेंबर पर्यंत राहणार आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी अर्थ सचिव अशोक लवासा यांनीही आज रावत यांच्या जागी निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला.
****
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या विक्रन गावचे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या परिसरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काल रात्री ही घटना घडली. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला अल्प मोबदला मिळाल्यानं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
मराठवाड्यात येत्या २६ जानेवारीपासून गाळमुक्त कालवा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं सर्वसाधारण बैठकीत ते आज बोलत होते. गेल्या अडीच महिन्यात मराठवाड्यात कालवा दुरुस्तीचं काम ७० टक्के झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पद्मावत चित्रपटाविरोधात देशभरात आंदोलनाचा भडका उडालेला असतानाच आज धुळे जिल्ह्यातही राजपुत समाजानं या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावं म्हणून आंदोलन सुरु केलं आहे. शिंदखेडा तालुक्यातल्या जुने कोळदे इथं तापी नदीच्या पाण्यात उतरुन अनेक राजपुत तरुणांसह महिलांनी जलआंदोलन सुरु केलं आहे. राजपुत समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे यांची राज्यपालांना निवेदन पाठवून हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली. 
****
जालना इथं आज ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, व्यवहार करत असताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीनं सजगता बाळगण्याचं आवाहन जालन्याचे पोलिस अधिक्षक रामानथ पोफळे यांनी यावेळी केलं. 
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना उद्यापासून दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****

No comments: