आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जानेवारी २०१८ दुपारी
१२.००
****
मुस्लीम महिलांचा सन्मान राखणाऱ्या तिहेरी तलाक विधेयकाला
संसद लवकरच कायद्याचं स्वरूप मिळवून देईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं
आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेसमोर केलेल्या अभिभाषणात
ते बोलत होते. नोकरीपेशा महिलांची प्रसुतीरजा, उज्ज्वला गॅस योजना, महिलांसाठी स्वच्छतागृह,
मुद्रा योजना, अन्नाधान्य उत्पादनात वाढ, आदी विषयांवर राष्ट्रपतींनी यावेळी भाष्य
केलं.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं, संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजपासून प्रारंभ झाला. आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर
केलं जाईल. तर, २०१८-१९ चा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी एक फेब्रुवारीला सादर केला जाणार
आहे.
दरम्यान, या अधिवेशनात तिहेरी
तलाक विधेयक पारित होण्याची अपेक्षा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. हे अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी
सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन करत त्यांनी, सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प सामान्य
माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा असल्याचं नमूद केलं.
****
मुंबईत मंत्रालयात
विष प्राशन केलेले धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांचं काल जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान
निधन झालं. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात न्याय न मिळाल्याची भावना बळावल्यामुळे
त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील
यांना हुतात्मा भूमिपुत्र शेतकऱ्याचा दर्जा देण्याचं आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही
तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
****
अहमदनगर
जिल्हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा असून प्रशासकीय दृष्टीनं कामाचा ताण वाढतो आहे,
त्यावर जिल्ह्याच्या विभाजनातून दोन जिल्हे करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं
पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. कोकमठाण इथं आयोजित महावितरण अभियंता संघटनेच्या
अधिवेशनात ते बोलत होते.
****
श्री
गंगा नगर आणि सचखंड या दोन एक्स्प्रेस रेल्वेगाड्या आज नांदेडहून उशीरा सुटणार आहेत.
सचखंड एक्सप्रेस रेल्वे दुपारी पावणे दोन वाजता, तर श्रीगंगा नगर रेल्वे दुपारी अडीच
वाजता सुटेल
*****
***
No comments:
Post a Comment