Saturday, 27 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २७  जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा

Ø मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह सांस्कृतिक तसंच देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन

Ø ोल्हापूर जिल्ह्यात काल दोन अपघातात दहा जण ठार

Ø ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपन्ना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत

आणि

Ø १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक

****



एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केल्यानंतर सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. भारतीय वायू सेनेचे गरुड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. या समारंभाला सर्व, दहा आशियान देशांचे प्रमुख विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सैन्य दलं, अनेक राज्यं, तसंच विविध विभागांसह आकाशवाणीचा चित्ररथ प्रथमच संचलनात सहभागी झाला. शिवराज्याभिषेक संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला.

 प्रजासत्ताक दिनानिमित्त काल राज्यभरात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शिवाजी पार्क इथं मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. विधानभवनात विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 औरंगाबाद इथं पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं, यावेळी केलेल्या भाषणात सावंत यांनी, औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासात दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं,

ते म्हणाले ..



 देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्व क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. जिल्ह्याच्या आणि पर्यायाने राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समृध्दी महामार्गामुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासात आज भर पडणार आहे.  औद्योगिक, आर्थिक  दळणवळण विकासाला गतिमान करणारा आणि मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जिह्यातील ६२ गावातून जाणाऱ्या प्रकल्पातील एक हजार ८४ खरेदी खते पूर्ण झालेली असून . सातशे चौदा हेक्टर जमिनीचे भूसंपादन देखील  झालेले आहे.



 यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना राष्ट्रपती पदक देऊन, तर पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना विशेष सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं. चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात औरंगाबाद जिल्ह्यास प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.

 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्य ्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या हस्ते तर िभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं.



 जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी वंदे मातरम या गीतावर एक हजार विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्य सादर केलं. नांदेड इथं जिल्हा पोलिस कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सर्व जाती, धर्म एक असून भारत देश एक आहे हे आपण वेळोवेळी सिध्द केल्याचं पालकमंत्री कदम म्हणाले.



 परभणी इथं क्रीडा संकुलावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, भारतीय जनता पक्षाच्या तिरंगा फेरीला पालकमंत्री निलंगेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.



 नीती आयोगानं जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते, यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.



 बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं, जिल्ह्यात मुलींच्या जन्माचं दर हजारी आठशे अट्ठ्याण्णव, इतकं खाली गेलेलं प्रमाण, आता नऊशे सत्तावीस पर्यंत पोचल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत पालकमंत्रीही सहभागी झाल्या.

 मराठवाड्यात विविध शैक्षणिक संस्था, ाजकीय पक्ष संघटना, औद्योगिक आस्थापनांमधूनही ध्वजारोहणासह सांस्कृतिक तसंच देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 ोल्हापूर जिल्ह्यात काल दोन अपघातात दहा जण ठार झाले. काल सकाळी पुण्याहून गणपती पुळ्याला जाणारी ही कार शाहुवाडी इथं झाडावर धडकून झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

 ुसरा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला. गणपती पुळ्याहून पुण्याकडे जाणारी मिनी बस पंचगंगा नदीत कोसळली. या अपघातात चार जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले असून, वाचवण्यात आलेल्या सात जणांपैकी चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बसमधले सहा जण अद्याप बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

****



 जालना इथं ध्वजवंदना नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी, प्रशासनाला निवेदन दिल होतं. मात्र याबाबत निर्णय न झाल्यानं, शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी ११ शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

****

 विरोधी पक्षांच्या वतीनं काल मुंबई संविधान बचाव फेरी काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी खासदार शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पाटीदार नेता हार्दिक पटेल, यांच्यासह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते.

 दरम्यान, भारतीय जनता पक्षानंही काल मुंबईत तिरंगा यात्रा काढली. या यात्रेमध्ये भाजपचे मंत्री, आमदार आणि खासदार सहभागी झाले.

****

 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोचला आहे. बोपन्ना-बाबोस जोडीनं डिमोलिनर-सांचेझ जोडीचा ७-५, ५-७, १०-६, असा पराभव केला.

 इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सायना नेहवालनं पी. वी. सिंधूचा २१-१३, २१-१९ असा सरळ सेट्स मध्ये पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

 न्युझीलंड इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल बांगलादेशचा १३१ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना येत्या मंगळवारी पारंपारि प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

****

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत काल तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एक बाद १७ धावा झाल्या. त्यापूर्वी भारतानं, दुसऱ्या डावात २४७ धावा केल्या. भारतानं सामन्यात २२३ धावांची आघाडी घेतली आहे.

****

 सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाची सुरवात हे औरंगाबाद महानगर पालिकेचं स्मार्ट सिटीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद महापालिका इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे मनपाच्या वीजखर्चात बचत होऊन, हा पैसा इतर विकास कामांसाठी उपयोगात आणणं शक्य होणार असल्याचं, डॉ सावंत म्हणाले.

****



 नांदेड जिल्ह्याच्या २०१८-१९ साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६९ कोटी १ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

*****

***








No comments: