Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि कंबोडियादरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चार
करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य
वाढवणं आणि मानवी तस्करी रोखण्याबाबतच्या करारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांच्यादरम्यान आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावरील
चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारत
कंबोडियासोबत आर्थिक, सांस्कृतिक, व्यापार क्षेत्रांमध्ये संबंध अधिक बळकट करू इच्छित
असल्याचं सांगितलं. व्यापाराबाबत भारताने अंगीकारलेल्या धोरणामुळे आपल्या देशाला मोठा
फायदा झाला असल्याचं कंबोडियाचे पंतप्रधान सेन यांनी यावेळी सांगितलं.
****
संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोन्ही सभागृहांचं
कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सहकार्य करावं अशी विनंती
त्या या बैठकीत करणार आहेत. अधिवेशनाच्या या सत्राचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी
सरकारनंही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनाचा
पहिला टप्पा येत्या सोमवारपासून सुरू होणार असून, नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एक फेब्रुवारीला सन
२०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा चाळीसावा भाग आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उद्या देशभर राबवण्यात येणार
आहे. शून्य त पाच वर्षे वयोगटातल्या बालकांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
विविध केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे.
****
शासनाकडे कोणत्याही प्रकारच्या
प्रणालीची कमी नसतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमी भाव मिळत नसल्याची टीका,
सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ तथा जय किसान आंदोलन - स्वराज अभियानचे पी.एस.शारदा यांनी
केली आहे. ते आज औरंगाबाद इथं अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या
प्रश्नावर आयोजित खुल्या चर्चेत बोलत होते. दिल्ली इथं पार पडलेल्या “किसान मुक्ती
संसदेत” पारित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती आणि शेती मालाच्या
उत्पादन खर्चावर दीड पट भावाची हमी या दोन प्रस्तावासह अन्य प्रश्नांवर स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पोफळे, प्राचार्य एच.एम देसरडा, सुभाष लोमटे
यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी चर्चा केली.
****
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन
२०१७-१८ मध्ये हमी भावानं तूर खरेदी करण्यासाठी गावपातळीवर ऑनलाईन पद्धतीनं शेतकरी
नोंदणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी येताना सोबत पीक पेऱ्याची नोंद असलेला सात-बाराचा
उतारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पास बुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत सोबत
आणावी, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूजन्य
पदार्थांपासून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जागृती करणं आणि कोटपा कायदा २००३ ची प्रभावी
अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना
तंबाखू मुक्त प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.पी.कदम यांनी
तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन केलं.
****
सामाजिक न्याय विभागाकडून विविध मान्यवरांना दलितमित्र, समाजभूषण
यासह इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तिंना शासनातर्फे दरमहा ७५० रुपये मानधन देण्याची घोषणा
सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केली आहे.
ते हिंगोली इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
इंधन तेलाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना
झळ पोहोचत असल्याची टीका करत शिवसेनेच्या वतीनं आज नाशिक शहरात मुंबई नाका इथं थाळी
नाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे
पोलिसांनी ५०हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जकार्ता इथं सुर असलेल्या
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपान्त्य
फेरीच्या सामन्यात सायनानं थायलंडच्या रॅचॅनोक इंटॅनॉन हिचा २१ - १९, २१ - १९ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment