Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र सरकार लवकरच कागदी लॉटरीऐवजी ऑनलाईन लॉटरी
पद्धत सुरू करण्याचा विचार करत आहे. केरळ सरकारला मोठ्याप्रमाणावर महसूल मिळवून देणाऱ्या
या लॉटरी पद्धतीचा सरकार अभ्यास करत असल्याचं, नियोजन विभागाचे मुख्य सचिव विजयकुमार
गौतम यांनी सांगितल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. केरळ राज्याला दरवर्षी ऑनलाईन लॉटरीतून
सुमारे तेराशे कोटी रुपये महसूल मिळतो, तर महाराष्ट्र सरकारला अवघा १३२ कोटी रुपये
महसूल मिळत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यात
ऑनलाईन पद्धतीनं लॉटरी सुरू होण्याची शक्यता आहे.
****
कोरेगाव
भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनानं कोणतीही समिती स्थापन केलेली नाही, त्यामुळे या संबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे येण्याचा
प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण गृह विभागानं दिलं आहे. विविध माध्यमात यासंदर्भात प्रसारित
होणारी बातमी दिशाभूल करणारी असल्याचंही गृह विभागानं स्पष्ट केलं आहे. कोरेगाव भीमा
प्रकरणी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या
नेतृत्वाखाली समन्वय समिती स्थापन करून त्यांनी अहवाल दिल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांवर
आणि सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. त्यावर गृह विभागानं हे स्पष्टीकरण दिलं.
*****
सायबर
गुन्हे हा राष्ट्रीय सुरक्षेसाठीचा चौथा धोका म्हणून उदयाला आला असल्याचं केंद्रीय
गुहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. हरियाणाच्या मानेसर मध्ये आयोजित आठव्या
अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेच्या समारोपावेळी ते बोलत होते. भूदल, हवाई
दल आणि नौदल क्षेत्रांच्या अतिरिक्त आता सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्याचंही प्रशिक्षण
देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वेबसाईट आणि माहिती हॅक करण्यांसारख्या गुन्ह्याचा तपासं
हे एक प्रकारचं आव्हान आहे, कुठल्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी आपले कमांडो सक्षम आहेत, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
देशात ग्रामीण भागातलं ७६ टक्के क्षेत्र स्वच्छता
अभियानाखाली आलं आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी हरियाणा
मधल्या गुरूग्राम इथं आयोजित एका कार्यशाळेत ही माहिती दिली. आतापर्यंत १० राज्ये आणि
केंद्रशासित प्रदेश, ३०० जिल्हे तसंच तीन लाख गावं उघड्यावर शौचापासून मुक्त घोषित
झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
केंद्रीय
उत्पादन शुल्क महामंडळानं जीएसटी आर तीन-ब अर्ज भरण्याची मुदत २२ जानेवारीपर्यंत
वाढवली आहे. वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यानंतर महामंडळानं एक जुलैपासून
हा अर्ज जारी केला असून, देवाण
घेवाण प्रक्रियेचा हिशोब ठेवण्यासाठी हा अर्ज
भरावा लागतो.
****
चित्रपट सृष्टीतले मानाचे फिल्मफेअर पुरस्कार काल
प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार इरफान खानला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
पुरस्कार विद्या बालन यांनी पटकावला. हिंदी मिडीयम हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. अरिजित
सिंग आणि मेघना मिश्रा या दोघांना पार्श्वगायनाचे पुरस्कार मिळाले. या ६३ व्या फिल्मफेअर
सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव
पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं
****
राज्यातल्या
रस्ते विकासासाठी आवश्यक ते भू-संपादन जलदगतीनं करावं, असे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. केंद्र
शासनाच्या भारतमाला या राज्यातल्या रस्ते विकासाच्या योजनेचा मुंबई इथं झालेल्या बैठकीत
आढावा घेताना ते बोलत होते. या वर्षी दोन हजार किलोमीटर रस्ते
विकासाचं लक्ष्य असून, ते गाठण्यासाठी मार्चपर्यंत भू-संपादन करून त्याचा
मोबदला संबंधितांना देण्यात यावा, असं त्यांनी सांगितलं.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन
मार्चअखेर होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे
यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी
ते काल बोलत होते. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मदत
दिली जाणार असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं.
****
न्यूझीलंडमधल्या
तौरंगा इथं झालेल्या चार निमंत्रित देशांच्या हॉकी स्पर्धेत बेल्जीयमनं भारताचा एक - दोन असा पराभव केला. भारतानं त्या आधीच्या सामन्यात न्यूझीलंडला तीन - एकनं
मात दिली होती. बेल्जीयमनं जपानचा चार - एकनं
पराभव करुन अंतिम फेरी गाठली
होती.
****
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीतल्या
उपान्त्य पूर्व फेरीत भारताचा लिएंडर पेस आणि पुरव राजा या जोडीचा पराभव झाला. आज झालेल्या
सामन्यात युआन सेबेस्तियन आणि रॉबर्ट फराह यांनी पेस - राजा जोडीचा एक - सहा, दोन
- सहा असा पराभव केला. या स्पर्धेतले दुसरे भारतीय खेळाडू रोहन बोपन्ना तसंच दिविज शरण सोळा स्पर्धांच्या फेरीत
खेळणार आहेत. रोहन बोपन्ना आज हंगेरीच्या तिमिया बाबोससह मिश्र दुहेरीचा सामना
खेळणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment