आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जानेवारी २०१८ सकाळी ११.००
****
कंम्बोडियाचे पंतप्रधान हुन
सेन भारत दौऱ्यावर
आले असून, आज राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुन सेन यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत.
उभय देशांदरम्यान विविध क्षेत्रातल्या
करारांवर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचं
परराष्ट्र व्यवहार सचिव प्रीती सरण यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं काल झालेल्या
भारत-आसियान शिखर परिषदेत सेन सहभागी झाले होते. तसंच
त्यांनी काल इतर आसियान सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांसोबत राजपथावरचं
संचलनही पाहिलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन
की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा चाळीसावा
भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाची सुरुवात हे औरंगाबाद
महानगरपालिकेचं स्मार्ट सिटीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं, सार्वजनिक आरोग्य
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद महापालिका
इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते काल
करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे मनपाच्या वीजखर्चात बचत होऊन,
हा पैसा इतर विकास कामांसाठी उपयोगात आणणं शक्य होणार असल्याचं, ते म्हणाले.
****
तिरुपती-नगरसोल-तिरुपती या विशेष रेल्वेगाडीच्या
मार्च ते जून या कालावधीत एकूण ३६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तिरुपतीहून ही गाडी
दर शुक्रवारी निघेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी दर शनिवारी नगरसोल इथून निघेल.
नांदेड-तिरुपती-नांदेड ह्या विशेष रेल्वेगाडीच्या
याच कालावधीत एकूण ३४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी दर मंगळवारी नांदेड इथून
तर दर बुधवारी तिरुपती इथून सुटेल.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या
पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातून प्राचार्य दीपा क्षीरसागर
आणि नाट्य शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर यांची निवड झाली आहे. त्यांचा
कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
*****
***
No comments:
Post a Comment