Wednesday, 31 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जानेवारी २०१८ सकाळी ११.००

****



मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची अधिसूचना आज जारी होणार आहे. त्यानंतर, आजपासून येत्या सात फेब्रुवारीपर्यंत नामांकनपत्रं दाखल करता येणार आहेत. दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी साठ जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची मुदत आज संपत आहे.

****

 भक्ती चळवळीचे संस्थापक आणि संत, गुरू रविदासजी यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांना आदरांजली वाहिली आहे.

****

 नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज नांदेडहून उशिरा सुटणार आहे. आज ही गाडी  सकाळी साडेनऊच्या नियमित वेळेऐवजी सकाळी पावणेबारा वाजता सुटणार असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.

****

 ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे गायत्री नगरच्या सरदार कंपाऊंड मधल्या भंगार मालाच्या पंधरा ते सोळा गोदामांना, तसंच जवळच्या झोपडपट्टीला आज सकाळी पावणेसातच्या सुमाराला आग लागल्याचं वृत्त आहे. अग्नीशमन विभागाची तीन वाहनं आणि पाण्याचे दोन टँकर्स घटनास्थळी पोहचेले असून अग्निशमन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

****

 आज आकाशात खगोलशास्त्राच्या दृष्टीनं एक दुर्मिळ घटना बघायला मिळणार आहे.  एका इंग्रजी महिन्यातली दुसरी पौर्णिमा असल्यामुळे नीलचंद्र म्हणजे ब्ल्यू  मून, पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर चंद्र असल्यामुळे  बृहद्चंद्र म्हणजे सुपर मून आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र लालसर दिसणार असल्यामुळे रक्तचंद्र म्हणजे ब्लड मून, अशी वैशिष्ट्यं आज अनुभवता येणार आहेत. आजचा चंद्र नेहमीपेक्षा चौदा टक्के मोठ्या आकाराचा आणि तीस टक्के जास्त प्रकाशमान दिसणार असून, खग्रास ग्रहणामुळे तो काही वेळ पूर्ण काळाही दिसणार आहे. असा योग दीडशे वर्षांतून एकदा येतो,असं खगोलतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

*****

 नांदेड जिल्ह्यात बारड गावच्या ग्रामसभेनं गावातल्या सर्व धार्मिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.



*****

***


No comments: