Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
आर्थिक असमानता कमी करण्यासाठी
सरकार प्रयत्नरत असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. आज संसदेच्या
संयुक्त सभेसमोर केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी संरक्षण, आरोग्य, शिक्षण, कृषी,
ऊर्जा, पेयजल, महिला सन्मान, कामगार कल्याण, युवाकल्याण, दिव्यांगांसाठी नोकरी तसंच
शिक्षणात आरक्षण, अंतराळ विज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन, मेट्रो योजना,
नक्षलवाद बिमोड, आपत्ती व्यवस्थापन, आदी क्षेत्रात सरकारकडून केल्या जात असलेल्या कार्याचा
आढावा घेतला. सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचीही राष्ट्रपतींनी यावेळी माहिती दिली.
सामाजिक न्याय आणि आर्थिक लोकशाहीसाठी हे सरकार कार्यरत असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद
केलं. लोकसभा तसंच विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचं
एकमत व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आधुनिक परिवहन यंत्रणेत सुधार करून,
२०१९ पर्यंत देशातली सर्व गावं रस्त्यानं जोडण्याची योजना असल्याचं, त्यांनी सांगितलं.
रोखरहित व्यवहारांमुळे ५७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचा अपहार टाळता आल्याचं,
राष्ट्रपती म्हणाले.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ
झाला. संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल करण्यात आला. २०१८-१९ या आर्थिक वर्षात वृद्धीचा
दर सात ते साडे सात टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज, आर्थिक सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात
आला आहे. २०१८-१९ चा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी एक फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.
अधिवेशनाचं हे पहिलं सत्र नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर सुमारे महिनाभराच्या
सुटीनंतर पाच मार्चपासून सहा एप्रिलपर्यंत अधिवेशनाचं दुसरं सत्र चालणार आहे.
****
देशाचे परराष्ट्र सचिव म्हणून विजय केशव गोखले यांनी आज
पदभार स्वीकारला. १९८१ च्या विदेश सेवा अधिकाऱ्यांच्या तुकडीतले असलेले गोखले परराष्ट्र खात्यात आर्थिक विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांनी
चीन तसंच जर्मनीमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं आहे.
****
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी
न्याय न मिळाल्याची तक्रार करत, मंत्रालयात विष घेतलेले वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील
यांच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त नागरिकांनी धुळे दोंडाईचा मार्गावर दोन तास रास्ता
रोको आंदोलन केलं. शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण गावातले अनेक शेतकरी, तरुण यांनी रस्त्यावर
उतरत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. सरकारने प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा
योग्य मोबदला दिलाच पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनामुळे सुमारे दोन
तास वाहतुक ठप्प झाली होती, अखेर पोलिसांनी आंदोलकांना शांत केल्यानंतर रस्ता वाहतुकीस
मोकळा झाला.
दरम्यान, पाटील यांच्या उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या
कुटुंबीयांनी पार्थिव देह ताब्यात घेण्यास नकार देत, जेजे रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं.
****
राज्यात
थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून आत्तापर्यंत सात हजार ३०० सरपंच
जनतेतून निवडण्यात आले असल्याची माहिती आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार
यांनी दिली आहे. अहमदनगर तालुका पत्रकार संघ आणि अहमदनगर तालुका बाजार समितीतर्फे आयोजित
गाव कारभारी परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना शासन प्रशिक्षण
देणार असून प्रशिक्षणानंतर परीक्षा
घेतली जाणार असून, या परीक्षेत
उत्तीर्ण होणाऱ्या सरपंचांनाच स्वाक्षरीचे अधिकार
दिले जाणार आहेत, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
वेंगुर्ल्यात होत असलेल्या कवी मंगेश पाडगावकरांच्या स्मारकासाठी शासन ३० लाख रुपयांची
तरतूद करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. कुडाळ
इथं काल कोकण मराठी साहित्य परिषदेचा स्नेहमेळावा आणि वाड.मय पुरस्कार वितरण सोहळा
पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा
तालुक्यातल्या पान चिंचोली इथं दोन समाजाच्या स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या
दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपण हिरवळीचं लोकार्पण खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या
हस्ते झालं. या गावातल्या रस्त्यांच्या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा
त्यांनी यावेळी केली.
****
नवी दिल्ली इथं काल सुरु
झालेल्या भारतीय खुल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत एम सी मेरी कोम आणि मनोज कुमार यांनी आपापल्या गटात उपान्त्य
फेरीत प्रवेश केला आहे. मेरी कोमनं
वर्षा चौधरीचा तर मनोज कुमारनं किमाथी जायाकोबाचा पराभव केला.
****
न्यूझीलंडमध्ये
सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघानं अंतिम
सामन्यात धडक मारली आहे. आज झालेल्या उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा
सहा गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतला दुसरा उपान्त्य सामना उद्या भारत आणि पाकिस्तान
संघादरम्यान होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध
खेळेल.
*****
***
No comments:
Post a Comment