Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø आम आदमी पक्षाचे २० आमदार अपात्र ठरवण्याच्या शिफारशीला
राष्ट्रपतींची मंजुरी
Ø कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात १५० डॉलर्स प्रति टननं
कपात
Ø ओम प्रकाश रावत यांची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून
नियुक्ती
आणि
Ø जात व्यक्त न करता साहित्य लेखन करण्याची गरज - महिला
आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे.
*****
आम आदमी पक्षाचे २० आमदार अपात्र ठरवण्याच्या निवडणूक
आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या
मंजुरीनंतर या २० आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचं, सरकारनं अधिसूचनेद्वारे
सांगितलं आहे. लाभाचं पद प्रकरणात, निवडणूक आयोगानं या आमदारांना अपात्र घोषित केलं
होतं.
दरम्यान, हा निर्णय घटनाबाह्य असून, लोकशाहीसाठी
धोकादायक असल्याची टीका आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी केली आहे.
या निर्णयाचा दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल सरकारवर
परिणाम होणार नाही. २० आमदार अपात्र ठरल्यानंतरही आम आदमी पक्षाकडे विधानसभेच्या ७०
जागांपैकी ४६ जागांसह बहुमत कायम आहे.
****
केंद्र सरकारनं
कांद्याचं किमान निर्यात मूल्य
१५० डॉलर नं कमी करून ७०० डॉलर प्रति
टन केलं आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव खाली आल्यानं सरकारनं
हे निर्यात मूल्य कमी केलं आहे. हा
दर पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत लागू
राहणार असल्याचं विदेशी व्यापार महासंचालनालयानं
जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. कांद्याचं किमान निर्यात मूल्य गेल्या
वर्षी नोव्हेंबर महिन्यात लागू करण्यात आलं होतं.
***
स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नियुक्त्या या गुणवत्तेच्या
आधारेच झाल्या पाहिजे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबई महानगरपलिकेतल्या
चतुर्थ श्रेणीच्या १५ कामगारांनी महापालिकेत रिक्त असलेल्या लिपीक पदाच्या जागांवर
सामावून घेण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना
त्यांच्या कामात पारदर्शकता आणि उच्चतम दर्जा राखणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र सरकार लवकरच कागदी लॉटरीऐवजी ऑनलाईन लॉटरी
पद्धत सुरू करण्याचा विचार करत आहे. केरळ सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणाऱ्या
या लॉटरी पद्धतीचा सरकार अभ्यास करत असल्याचं, नियोजन विभागाचे मुख्य सचिव विजयकुमार
गौतम यांनी सांगितलं. दरवर्षी ऑनलाईन लॉटरीतून केरळ राज्याला सुमारे तेराशे कोटी रुपये
महसूल मिळतो, तर महाराष्ट्र सरकारला अवघा १३२ कोटी रुपये महसूल मिळत असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यात ऑनलाईन पद्धतीनं लॉटरी सुरू
होण्याची शक्यता आहे.
****
निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांची देशाचे मुख्य
निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त अचल
कुमार ज्योती आज पदमुक्त होत असून रावत उद्यापासून पदभार स्वीकारतील. रावत यांच्या जागी निवडणूक आयुक्त म्हणून माजी अर्थ
सचिव अशोक लवासा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाचा प्रख्यात दिग्दर्शक विदुर गोपाळकृष्णन यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला.
या महोत्सवात मनोज कदम यांच्या क्षितिज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार क्षितिज साठी वैष्णवी तांगडे हिला देण्यात
आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्युपा
चे दिगदर्शक राहुल बॅनर्जी यांना
प्रदान करण्यात आला.
***
औरंगाबाद इथं आयोजित तीन दिवसीय अखिल भारतीय वैदिक
संमेलनाचाही समारोप काल झाला. सोप्या भाषेत वेद समजून सांगा, असं केल्यास वेदानुसार
सगळेच आचरण करतील असं मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी
व्यक्त केलं. यावेळी मंचावर महापौर नंदकुमार घोडेल, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी,
गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्यासह वेदक्षेत्रातले तसंच राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर
उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राजकारणाखेरीज
साहित्यातही जातीय रंग पहायला मिळतात हे अधिक दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करून जात
व्यक्त न करता साहित्य लेखन करण्याची गरज असल्याचं मत, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा
मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. बीड इथं आयोजित ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या
समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ
यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्कार स्त्रियांना दर्जा देत असतो, हा दर्जा सांभाळता
आला पाहिजे असं सांगत समतेच्या नावाखाली महिलांना संस्काराचा विसर पडता कामा नये, अशी
अपेक्षाही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं विविध योजना यशस्वीरित्या
राबवल्या जात असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. काल
औरंगाबाद इथं स्वयंसेवी संस्थांच्या विकास मेळाव्याचं उद्घाटन करताना, ते बोलत होते.
धर्मादाय सह आयुक्त श्रीकांत भोसले यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, मराठवाड्यात
एक लाख स्वयंसेवी संस्थांपैकी, कायद्याचं पालन न करणाऱ्या १० हजार संस्थांची नोंदणी
रद्द केल्याची माहिती दिली. पुण्याच्या सेवावर्धिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रमोद कुलकर्णी यांनी यावेळी, ‘मी सामाजिक काम का करावं’ या विषयावर मार्गदर्शन केलं.
१२२ स्वयंसेवी संस्था या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत.
*****
जिल्हा परिषदेनं व्यापारी गाळे बांधण्यासाठी दिलेलं
कर्ज थकवल्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातल्या चार सरपंचांना, अपात्र का ठरवू नये अशा
प्रकारच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जेऊर, बोरगाव, खवासपूर आणि औराद या चार ग्रामपंचायतींनी
कर्ज वेळेत न फेडल्यानं जिल्हा परिषदेनं ही नोटीस बजावली आहे.
****
१५ वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा इथिओपियाच्या सोलोमन
डेकसिसानं जिंकली आहे. चार लाख पन्नास हजार
डॉलरचं पारितोषिक असलेल्या या स्पर्धेत ४४ हजारांहून अधिक धावपटुंनी विविध वयोगटात आपला सहभाग नोंदवला. पुरूष
गटात भारताच्या टी गोपीनं पहिलं तर नितेंद्र सिंह रावतन दुसरं स्थान पटकावलं. महिलांच्या
गटात मध्य रेल्वेच्या सुधा सिंहनं प्रथम क्रमांक
पटकावला.
***
घराची झडती घेण्यासाठी आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना
मज्जाव करत शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुका काँग्रेसचे
अध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांना काल अटक करण्यात आली. त्यांना एक दिवसाची
पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या १७ जानेवारीला चव्हाण यांच्या घरी आयकर विभागाचे
अधिकारी तपासणीसाठी गेले असता चव्हाण यांच्यासह सुमारे ४०० जणांच्या जमावानं पथकास
धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला आणि कागदपत्रं, दस्तावेज पळवून नेत पुरावा
नष्ट केला होता. यावेळी पथकातल्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणीही त्यांच्याविरुध्द
गुन्हा दाखल करण्यात आला होता.
*****
सरकारनं कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतीपूरक व्यवसाय
तसंच प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी ठोस कृषी धोरण जाहीर करावं असं आवाहन लातूरचे
माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या धामणगाव इथं
आयोजित ऊस विकास परिषदेत काल ते बोलत होते. सरकारनं कृषी संशोधनावर भर देऊन नवीन तंत्रज्ञानानं
शेतीचा विकास साधण्यासाठी पुढाकार घ्यावा असं ते म्हणाले.
****
७३ आणि ७४ व्या घटना दुरूस्तीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या
पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेवर आधारित ‘लोकशाही निवडणूक आणि सुशासन’
या संदर्भात औरंगाबाद इथं आज एक दिवसीय विभागीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment