Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
२०१८-१९ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या संसदेत
सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प सर्वसामान्य अर्थसंकल्पात समाविष्ट केल्यामुळे,
या वर्षीही रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
अर्ज करण्याची मुदत आता येत्या अट्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज
सादर करण्याच्या ठिकाणातही बदल झालेला आहे. यापूर्वी विद्यार्थ्याच्या मूळ रहिवासाच्या
जिल्ह्यात हे अर्ज करावे लागत, आता विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेणार आहे, त्या
जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे यासाठीचे अर्ज करायचे आहेत.
****
येत्या ९ फेब्रुवारीपासून “स्वच्छ मराठवाडा” अभियान हाती
घेण्यात येणार असून, देवगिरी किल्ल्यापासून त्याची सुरूवात होईल, अशी माहिती विभागीय
आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. आज औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यात जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर या पाच
जिल्ह्यांतली वैयक्तिक शौचालयांची बांधकामं १०० टक्के पूर्ण झाली असून शहरी भाग उघड्यावर
शौचापासून मुक्त झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या काचीवाडा भागातल्या न्यू उर्दू प्राथमिक
शाळेच्या, जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात झालेल्या स्थलांतराला शासनानं मान्यता
दिली आहे. या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचं, स्थलांतरित किंवा जवळच्या शाळांमध्ये
समायोजन केल्याची खात्री जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी करून घ्यावी, शाळेतल्या
सगळ्या पात्र कर्मचारी आणि शिक्षकांना स्थलांतरित ठिकाणी सामावून घ्यावं, आणि त्याबाबत
त्यांचा आक्षेप नसल्याचं शपथपत्र संस्थेच्या अध्यक्षांकडून घेण्यात यावं, असे निर्देश
शासनानं दिले आहेत.
****
औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
वसतिगृहात, वाचनालयात आणि ह्यूमिनिटीज विभागात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा
होत नसल्यानं, विद्यार्थ्यांनी आज कुलगुरुंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध
केला. प्रशासनानं ही समस्या एका दिवसात सोडवण्याचं
आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पुढच्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरू
न झाल्यास, कुलगुरुंच्या घरावर घागर मोर्चाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
****
येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यशवंतपूर-लातूर
रेल्वेला उदगीर तसंच भालकी इथं थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वेच्या या निर्णयाचं
स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पूर्वी यशवंतपूर ते बिदर दरम्यान धावणाऱ्या
या रेल्वेचा आता लातूरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
****
धनगर साहित्य परिषदेच्या वतीनं येत्या नऊ ते अकरा फेब्रुवारीदरम्यान
लातूर इथे ‘धनगर साहित्य संमेलना’चं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ
कवी पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगिता
धायगुडे असणार आहेत. या तीन दिवसीय संमेलनात धनगर संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांसह
परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात
आज सुमारे ५०० रुपयांनी घसरण होऊन, सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल
भाव मिळाला. कांद्याची आवक वाढल्यानं, दरावर परिणाम झाल्याचं, सांगितलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथला कृषी सहाय्यक सुनील
सातपुते याला आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. म्हैस खरेदीसाठी
२० हजार रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून नुकतेच शिवसेनेत गेलेले
मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे. कदम यांच्याकडे उत्पन्नाच्या चौसष्ट टक्के जास्त
रक्कम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर विभागानं आज हा एफ आय आर दाखल केला.
****
नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या इंडिया सुपरसीरिज बॅडमिंटन
स्पर्धेच्या महिला एकेरीत सायना नेहवाल आणि आकर्षी कश्यप यांनी तर पुरुष एकेरीमध्ये
बी.साईप्रणितनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेची अग्रमानांकित खेळाडू पी.व्ही.
सिंधूचा पहिल्या फेरीचा सामना आज होणार आहे.
दरम्यान, भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात सहा एकदिवसीय सामन्यांच्या
मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मालिकेतला पहिला सामना उद्या डर्बन इथं खेळवला
जाईल.
****
No comments:
Post a Comment