Wednesday, 24 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २४  जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय

Ø महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ११८ क्ष्रेत्र अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्या मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

Ø पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँगेस पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्याची काँग्रेसची घोषणा

आणि

Ø भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आजपासून आजपासून जोहान्सबर्ग इथं तिसरा क्रिकेट कसोटी सामना

****

 आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका कोणासोबतही युती न करता, स्वबळावर लढवण्याचा ठराव शिवसेनेनं संमत केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत आयोजित मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी मांडलेला हा प्रस्ताव एकमतानं संमत झाला. शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर लोकसभेच्या ४८ पैकी किमान २५ तर विधानसभेच्या २८८ पैकी किमान १२५ जागा जिंकेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, युवानेते आदित्य ठाकरे, आनंद आडसुळ, अनंत गीते, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांची नेते पदी, रघुनाथ कुचि, आणि विठ्ठल गायकवाड यांची उपनेतेपदी, तर पक्ष सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित करताना, केंद्र तसंच राज्य सरकारवर टीका केली.

****

२००९ च्या विधानसभा निवडणुक कार्यक्रमादरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ११८ क्ष्रेत्र अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केल्या आहेत. या निवड प्रक्रियेस आव्हान देणारी जनहित याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली होती. नव्यानं भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, आणि याचिकाकर्त्यास खर्चापोटी एक लाख रूपये द्यावेत असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटल आहे. मंडळानं निवडणूक आयोगाकडं ३० रिक्त जागा भरण्याची परवानगी मागितली होती. प्रत्यक्षात मात्र मंडळाकडून ११८ जागा भरण्यात आल्या होत्या.

*****

 औरंगाबादमधील एका विद्यार्थ्याला मान्यता नसलेल्या परंतु बारावी उत्तीर्णचं प्रमाणपत्र देणाऱ्या पुंडलिकनगर भागातल्या लाईफ टेक्नोलॉजी महाविद्यालय आणि दिल्लीतील काऊंसिल ऑफ हायर एज्युकेशन या मंडळाला दहा लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. त्याचबरोबर या महाविद्यालय आणि मंडळावर फौजदारी कारवाईचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. अब्दुल बाकी अब्दुल जब्बार या विद्यार्थ्यानं याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

****

 पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँगेस पक्षातर्फे येत्या  २९ ते ३१ जानेवारी या काळात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे  अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. काल मुंबईत काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशात आणि राज्यात दररोज पेट्रोल- डिझेलचे दर वाढवले जात असून या दरवाढीमुळं सर्वसामान्यांची लूट सुरु असल्याचं ते म्हणाले. सरकारनं पेट्रोल डिझेलला जीएसटीत अंतर्भूत करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

****

 गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके प्रकरणी सरकारनं तीन महिन्यात निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. कटके यांच्यावर नियमबाह्य जमीन विक्रीला परवानगी दिल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात कटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 राष्ट्रीय रूरबन कार्यक्रमा अंतर्गत जालना जिल्ह्यात होत असलेल्या मिनी एमआयडीसीमुळं या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. परतूर तालुक्यातल्या अकोली, ढोकमळ तांडा आणि सातारा वाहेगाव इथल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते. राष्ट्रीय रुरबन कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेती मालावर प्रक्रिया करून त्यातून नवे उत्पादन तयार करत बाजारात विक्री करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करता येणार असल्याचं पालकमंत्री लोणीकर यावेळी म्हणाले. राष्ट्रीय रुरबन योजनेमधून कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी १४ कोटी आणि मानव विकास अभियानातून १० कोटी रुपये मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 लातूर इथं तातडीनं तूर खरेदी केंद्रं सुरु करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. तुरीची हमीभावानं खरेदी करण्याची घोषणा करत राज्य शासनानं शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहनही केलं होतं. यासाठी हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र अद्यापही सरकारचं तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपली तूर कमी भावात बाजारपेठेत विकावी लागत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

****

 जालना, बीड, परभणी आणि औरंगाबाद प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेंचं आयोजन करण्यात आलं होतं. डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, व्यवहार करत असताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीनं सजगता बाळगण्याचं आवाहन जालन्याचे पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी केलं.

 बीड इथं कार्यशाळेत बोलतांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी सोशल मिडियाचा वापर जबाबदारीनं करण्याची गरज असल्याचं सांगितलं. परभणी इथं ऑनलाईन व्यवहार करतांना जागरूक राहण्याचं आवाहन पोलिस निरीक्षक संजय हिबारे आणि बालाजी रेड्डी यांनी केलं. औरंगाबाद इथं या कार्यशाळेत बोलतांना पोलिस अधिक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी सोशल मिडीया वापर जपून करण्याचं आवाहन केलं.

****

 भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आजपासून दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिले दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

 मराठवाडा विकास सेनेच्या वतीनं मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर काल विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्यात माजी शिवसैनिकांची मोट बांधून सुभाष पाटील यांनी मराठवाडा विकास सेनेची स्थापना केली आहे.

****

 पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३ हजार लोकांना आठ कोटी रूपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून गरिमा रिअल इस्टेट अँड अलाइड लिमिटेड या कंपनीच्या संचालकासह राजस्थानच्या धौलपुर इथले बसपचे माजी आमदार बनवारीलाल कुशवाह यांच्याविरूद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. २०१० पासून लोकांना पैसे दामदुप्पट करण्याचं आमिष ही कंपनी दाखवत होती, २०१६ मध्ये मात्र कंपनीचं कार्यालय अचानक बंद झालं आणि लोकांना गंडवण्याचा हा प्रकार उघडकीस आला.

****

 लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भावी मतदार निवडणूक साक्षर असला पाहिजे असं मत लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केलं. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीनं निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मुलभूत हक्क दिलेला असून प्रत्येकानं आपला हक्क बजावल्यास लोकशाही सुदृढ होण्यास मदत होणार असल्याचं ते म्हणाले.

****

मराठवाड्यात येत्या २६ जानेवारीपासून गाळमुक्त कालवा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं सर्वसाधारण बैठकीत ते काल बोलत होते. गेल्या अडीच महिन्यात मराठवाड्यात कालवा दुरुस्तीचं काम ७० टक्के झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 नाशिक शहरातील एका बेकायदा बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या राजू मधुकर करंडे या कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यास काल नाशिक पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. त्यानं स्वीकारलेली एक लाख २९ हजार रुपयांची रक्कम पोलीस आणि लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागानं ताब्यात घेतली.

*****

***

No comments: