आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जानेवारी २०१८ सकाळी
११.००
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस
इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या ४८ व्या
वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दावोसला रवाना
झाले. या बैठकीत जगभरातून दोन
हजाराहून अधिक प्रतिनिधी आणि उद्योगपती
सहभागी होणार आहेत. पंतप्रधान भारतात गुंतवणूक करणाऱ्या
कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी आणि गुंतवणूकदारांशीही चर्चा
करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या
परिषदेत सहभागी होणार असून, ते दावोस इथं पोहोचले आहेत. या
दौऱ्यात मुख्यमंत्री अनेक उद्योजकांशी चर्चा करतील.
****
देशाच्या
विविध भागात आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक
पद्धतीनं साजरी होत आहे. विद्या आणि ज्ञानाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या सरस्वतीची लोक, विशेषतः
विद्यार्थी, आज पूजा करतात. उत्तर प्रदेशात, आज
अलाहाबाद इथं माघ मेळ्याच्या चौथ्या स्नानाचा उत्सव होत आहे. यानिमित्त गंगा, यमुना
आणि सरस्वतीच्या संगमात आज सुमारे ७० लाख भाविक पवित्र स्नान करतील असा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
समुद्री प्रदुषणावर नजर ठेवण्यासाठी देशाची स्वदेशी
स्वयंचालित प्रणाली येत्या एप्रिल महिन्यापासून काम सुरू करणार आहे. भारतीय समुद्र
सुचना केंद्राचे संचालक एस.एस.सी शेणाय यांनी ही प्रणाली एक अब्ज रूपये खर्चाची असून,
ती एकदम बिनचूक असल्याचं सांगितलं. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर समुद्रातल्या पाण्याचा
नमुना घेवून प्रदुषणाच्या स्तराचा अभ्यास करण्याची सध्याची पद्धत बाद केली जाईल असंही
त्यांनी सांगितलं.
****
पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत समाविष्ट
करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते काल उज्जैन इथं
वार्ताहरांशी बोलत होते. याबद्दल वस्तू आणि सेवा कर परिषद लवकरच संमती देईल, अशी
आशा त्यांनी व्यक्त केली.
****
निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांची देशाचे मुख्य
निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त अचल
कुमार ज्योती आज पदमुक्त होत असून रावत उद्यापासून पदभार स्वीकारतील. रावत यांच्या जागी निवडणूक आयुक्त म्हणून माजी अर्थ
सचिव अशोक लवासा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment