आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ जानेवारी
२०१८ सकाळी ११.००
****
निवडणूक आयोगाच्या
वतीनं आज देशभरात आठवा राष्ट्रीय मतदार दिन
साजरा केला जात आहे. निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग असावा, या
हेतूनं हा दिवस साजरा केला जातो.नागरिकांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा करून हा दिवस
साजरा करावा, असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना
या दिनाच्या शुभेच्छा देताना, प्रत्येक पात्र मतदारानं मतदारयादीत आपलं नाव नोंदवून
लोकशाही बळकट करण्यात सहभाग घ्यावा, असं म्हटलं आहे.
****
पोलिओचं समूळ
उच्चाटन करण्याच्या योजनेचा भाग म्हणून राज्यात यावर्षी २८ जानेवारी आणि ११ मार्च या दोन दिवशी पोलिओ लसीकरणाची
विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या एक कोटी एकवीस
लाख एकोणतीस हजार बालकांना डोस देण्याचं शासनाचं
उद्दिष्ट असून, त्यासाठी राज्यभरात ८५ हजार
केंद्रं उभारण्यात येणार आहेत. पालकांनी येत्या रविवारी या वयोगटातल्या बालकांना पोलिओचा
डोस द्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं आहे.
****
केंद्र सरकारच्याया
उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आता नाशिकहून
सात ठिकाणी विमानसेवा सुरू होणार आहे. या योजनेच्या
पहिल्या टप्प्यात नाशिकहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा याआधीच सुरू झाली आहे. आता
नाशिक शहर, दिल्ली आणि गोव्यासह अहमदाबाद,
बंगळूरू, भोपाळ, गाझियाबाद आणि हैदराबाद या सात ठिकाणी जोडलं जाणार असल्याची माहिती
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल पत्रकारांना दिली.
****
राज्यात थंडीचा
जोर वाढला असून काल नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात चार पूर्णांक आठ अंश सेल्सियस
तापमानाची नोंद झाली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुका येत्या 25 फेब्रुवारीला
होणार आहेत. एकूण दोनशे अट्ठ्याहत्तर ग्राम पंचायतींच्या चारशे त्र्याण्णव जागांसाठी
या निवडणुका होणार असून त्यासाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे.
****
जकार्ता इथे
सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताच्या पी.वी.
सिंधू आणि सायना नेहवालनं आपापले पहिल्या फेरीचे सामने जिंकून दुस-या फेरीत प्रवेश
केला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment