Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
‘बाल शौर्य पुरस्कार’ नवी दिल्लीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सध्या प्रदान करण्यात येत आहेत. या वीर बालकांमध्ये
नांदेडच्या नदाफ एजाज अब्दुल रऊफचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जुलै महिन्यात
अमरनाथ यात्रेकरूंना दहशतवादी हल्ल्यातून वाचवणारा बसचालक शेख सलीम याला ‘उत्तम जीवन
रक्षक पदक’ हा अतुलनीय शौर्यासाठी दिला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान
जाहीर झाला आहे. गेल्या १० जुलैला काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यात सात यात्रेकरू
ठार तर १४ यात्रेकरू जखमी झाले होते, मात्र सलीमच्या प्रसंगावधानामुळे ५२ यात्रेकरुंचे
प्राण वाचले होते.
****
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख, बिहारचे
माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा आणि लोकलेखा
समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शर्मा यांना, चारा घोटाळ्याअंतर्गत चाईबासा कोषागार अपहार
प्रकरणी, रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं पाच वर्षं कैद आणि पाच लाख रुपये दंडाची
शिक्षा ठोठावली आहे. लालूप्रसाद यादव हे सध्या चारा घोटाळ्याच्या अन्य एका प्रकरणात
कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
****
संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात
निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटीश कंपनी उत्सुक असल्याची माहिती, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या कंपनीचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस इथं
झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली. पुढच्या महिन्यात
मुंबईत होणाऱ्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या जागतिक उद्योग परिषदेत सहभागी होण्याचं
निमंत्रणही ह्या कंपनीनं स्वीकारलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
अन्न औषध प्रशासनानं राज्यात सुगंधी
सुपारीवर बंदीची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. आता ही बंदी येत्या जुलै महिन्यापर्यंत
लागू असेल. तंबाखूच्या दुकानांवर चॉकलेट तसंच लहान मुलांसाठीचे खाद्यपदार्थ विक्री
करण्यासही राज्यात बंदी घातली असल्याचं, अन्न औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयं,
तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीसांसह, संबंधित सर्व यंत्रणांनी विशेष मोहीम राबवावी, असे
निर्देश गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज एका आढावा
बैठकीत ते बोलत होते. येत्या जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्यानं सहा फेब्रुवारीपासून
राज्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
उद्या प्रदर्शित होत असलेल्या ‘पद्मावत’
या चित्रपटाविरुध्द, धुळ्यात आज राजपूत समाजासह विविध संघटनांनी, मुंबई-आग्रा महामार्गावर
रास्ता रोको आंदोलन केलं. शिरपूर तालुक्यातल्या आमोदे गावाजवळ काल रात्री एस.टी. बस
जाळण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आठ आंदोलकांना अटक केली आहे. नाशिकमध्ये या चित्रपटाविरुद्ध
निदर्शनं करताना जलसमाधीची धमकी देणाऱ्या, करणी सेनेच्या वीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी
आज ताब्यात घेतलं.
****
राज्यात थंडीचा कडाका गेल्या काही
दिवसांत वाढला असून, आज नाशिक इथं सर्वात कमी आठ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं साडे तेरा तर नांदेड आणि औरंगाबाद इथं सुमारे साडे
चौदा अंश किमान तापमान नोंदवलं गेलं.
****
हैद्राबाद - जयपूर या साप्ताहिक
रेल्वे गाडीच्या फेऱ्या जूनपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी दर शुक्रवारी हैदराबादहून,
तर परतीच्या प्रवासात दर रविवारी जयपूरहून निघेल.
निझामाबाद - पुणे पॅसेंजर गाडी आजपासून
सव्वीस तारखेपर्यंत फक्त मनमाडपर्यंतच धावणार आहे, या कालावधीत मनमाड ते पुणे दरम्यान
रद्द करण्यात आली आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात
सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा तिसरा सामना, आजपासून जोहान्सबर्ग इथं
सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती
आलं तेव्हा भारताच्या तीन बाद ९७ धावा झाल्या होत्या.
****
महिला भारोत्तोलक राखी हलधर हिनं
तेहतिसाव्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासोबतच नवा
विक्रमही केला आहे. मंगळूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत काल राखीनं एकशे अट्ठावीस किलो
वजन उचलून, कर्णम मल्लेश्वरीचा एकशे सत्तावीस किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडला.
****
विविध क्षेत्रांमध्ये मुलींनी केलेल्या
लक्षणीय कामगिरींचा देशाला अभिमान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आजच्या राष्ट्रीय बालिका दिनाच्या औचित्यानं केलेल्या एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी
मुलींचं कौशल्य, मनोधैर्य आणि ताकदीला देश नमन करतो, असंही म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment