Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक.
·
देशभर
आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.
·
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या प्रस्तावित स्मारकाचं काम लवकर सुरू करण्याचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
आणि
·
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण
अफ्रिकेवर ६३ धावांनी विजय तर इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालनं
अंतिम फेरीत.
****
संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज
सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे
चालावं यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांचं
सहकार्य मिळावं, यासाठी ही बैठक बोलावण्यात
आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या या सत्राचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकारनंही आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनाचा
पहिला टप्पा उद्यापासून सुरू होणार असून, नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. येत्या एक फेब्रुवारीला
आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
****
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज देशभर राबवण्यात येत आहे.
शून्य ते पाच वर्षे वयोगटातल्या बालकांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विविध
केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे.
****
आकाशवाणीचे श्रोते आता व्हॉईस कमांडनं जगाच्या कोणत्याही
भागातून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकणार आहेत. यासाठी ॲमेझॉनच्या इको सेवेचं सहाय्य
घेण्यात आलंय. आकाशवाणीचे महासंचालक एफ.शहरयार यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती
दिली. यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशवाणी जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत
पोहोचणार आहे. दहा दिवसांपूर्वीच ॲमेझॉनशी केलेल्या भागीदारीमुळे आकाशवाणीला कोणताही
वेगळा खर्च करावा लागणार नाही असंही शहरयार यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा चाळीसावा भाग आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
दरम्यान, आपल्या भोवताली होणारे बदल अंगिकारणं महत्त्वाचं असल्याचं,
पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात सहभागी झालेल्या
राष्ट्रीय कॅडेट कोरच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते काल बोलत होते. त्यांनी
पुढं नमूद केलं. परस्परांकडून शिकण्यासारख्या अनेक बाबी असतात, तरुण मुलं देशात मोठा
बदल घडवून आणू शकतात, असं ते यावेळी म्हणाले.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या प्रस्तावित
स्मारकाची प्रक्रिया पूर्ण करून, स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या स्मारकासाठी स्थापन करण्यात आलेल्या
उच्चाधिकार समितीची आढावा बैठक काल झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उद्योग मंत्री
सुभाष देसाई, आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्यासह अनेक मान्यवर या
बैठकीला उपस्थित होते.
****
मुंबई पोलिसांकडून आपली हेरगिरी केली जात असल्याचा आरोप
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी
राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे पत्र देऊन, लेखी तक्रार केली आहे. गेल्या गुरुवारी
आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला साध्या वेशातले पोलिस हजर असल्याचं सांगत
विखे पाटील यांनी या प्रकरणी गृहविभागाची चौकशी करून, योग्य कारवाई करण्याची मागणी
या पत्रात केली आहे. पोलिसांचं हे कृत्य म्हणजे लोकशाहीला कलंक असल्याचं, विखे पाटील
यांनी म्हटलं आहे
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात
आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी
केलं आहे. काल औरंगाबाद इथं या महाविद्यालय आणि रूग्णातल्या सुविधांविषयी आढावा त्यांनी
घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या रूग्णालयाचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
जोहान्सबर्ग
इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेचा ६३
धावांनी पराभव केला. विजयासाठी २४१ धावांचा पाठलाग करताना अफ्रिकेचा दुसरा डाव १७७
धावांत संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक पाच बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर दक्षिण
अफ्रिकेचा गोलंदाज व्हर्नान फिलेंडर याला मालिकावीराचा
पुरस्कार मिळाला. तीन
कसोटी सामन्यांच्या मालिकेतले सुरुवातीचे दोन सामने जिंकत अफ्रिकेनं मालिका दोन - एक अशी जिंकली
आहे.
दरम्यान, या दोन्ही संघात येत्या
एक फेब्रुवारीपासून सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून, पहिला सामना
डर्बन इथं होणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जकार्ता इथं सुर असलेल्या
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य
फेरीच्या सामन्यात सायनानं थायलंडच्या रॅचॅनोक इंटॅनॉन हिचा २१ - १९, २१ - १९ असा पराभव केला. अंतिम
सामना आज होणार आहे.
****
सामाजिक न्याय विभागाचे दलितमित्र, समाजभूषण
आदी पुरस्कारप्राप्त व्यक्तींना शासनातर्फे दरमहा ७५० रुपये मानधन दिलं जाणार आहे.
सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती
दिली. ते हिंगोली इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या
वतीनं आयोजित दोन दिवसीय ‘डॉ ना.गो नांदापूरकर व्याख्यानमाले’स काल सुरूवात झाली. येणाऱ्या
काळातल्या भारतीय राष्ट्रवादात पुर्वेकडचं तत्वज्ञान आणि आध्यात्म तसंच पश्चिमेकडचं
विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोघांचा समन्वय राहणार असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर
अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केलं. ‘स्वातंत्र्यपूर्व भारतीय राष्ट्रवाद आणि अंतर्विरोध’
या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले
पाटील, कार्यवाहक दादा गोरे यांची यावेळी उपस्थिती होती. आज या व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्योत्तर
भारतीय राष्ट्रवाद आणि अंतर्विरोध’ या विषयावर चौसाळकर मार्गदर्शन करणार आहेत.
****
लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या
लोकप्रशासन विभागानं ग्रामसभा जागरुकता अभियान राबवलं, नांदगावच्या ग्रामस्थांनी या
अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत, ग्रामसभेला चांगली हजेरी लावली. याबाबत अधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर
२६ जानेवारीच्या
ग्रामसभेची उपस्थिती वाढविण्यासाठी उत्कृष्ठ प्रश्न स्पर्धा घेण्यात आली. २२
जानेवारीपासून ४ दिवस विद्यार्थी घ़रोघरी जाऊन ग्रामसभेच निमंत्रण देत होते. २५
जानेवारीला महिलांची ग्रामसभा घेण्यात आली, त्यावेळी ५६ महिला उपस्थित होत्या. २६
जानेवारीच्या सर्वसाधारण सभेला १७० ग्रामस्थ उपस्थित होते. मनरेगातून केली जाणारी
कामे, घरकुल योजना, पाणीपुरवठा, स्वच्छता या विषयांवर चर्चा झाली. अरुण समुद्रे, आकाशवाणी
बातम्यांसाठी, लातूर.
****
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवतांना समानता हे तत्व
पाळावं असं आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केलं
आहे. ते काल औरंगाबाद इथं आयोजित शिक्षक सुसंवाद कार्यशाळेत बोलत
होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तर
निश्चितीकरणानं शिक्षकांच्या अडचणी वाढल्या असून प्रत्येक मुलाचा शिक्षणस्तर उंचावण्याची
जबाबदारी शिक्षकांवर आली असल्याचं त्यांनी पुढं नमूद केलं. जालना इथंही नंदकुमार यांच्या
उपस्थितीत शिक्षक सुसंवाद कार्यशाळा पार पडली. यावेळी बोलतांना त्यांनी, शिक्षकांनी
विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं अध्यापन करावं, असं आवाहन केलं.
****
शासनाकडे कोणत्याही प्रकारच्या प्रणालीची कमी
नसतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमी भाव मिळत नसल्याची टीका, सर्वोच्च
न्यायालयाचे विधीज्ञ तथा जय किसान आंदोलन - स्वराज अभियानचे पी.एस.शारदा यांनी
केली आहे. ते काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या
प्रश्नावर आयोजित खुल्या चर्चेत बोलत होते. दिल्ली इथं पार पडलेल्या “किसान मुक्ती
संसदेत” पारित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेती मालाच्या
उत्पादन खर्चावर दीडपट भावाची हमी या दोन प्रस्तावासह अन्य प्रश्नांवर शेतकऱ्यांनी
यावेळी चर्चा केली.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड - श्री गंगा नगर एक्स्प्रेस
ही गाडी आज तिची नियमित वेळ अकरा वाजेऐवजी दुपारी पावणे दोन वाजता सुटणार आहे. दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
दरम्यान, तिरुपती-नगरसोल-तिरुपती या विशेष रेल्वेगाडीच्या
मार्च ते जून या कालावधीत एकूण ३६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तिरुपतीहून ही गाडी
दर शुक्रवारी निघेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी दर शनिवारी नगरसोल इथून निघेल.
नांदेड-तिरुपती-नांदेड ह्या विशेष रेल्वेगाडीच्या याच
कालावधीत एकूण ३४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी दर मंगळवारी नांदेड इथून तर
दर बुधवारी तिरुपती इथून सुटेल.
****
No comments:
Post a Comment