Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
आम आदमी पक्षाचे २० आमदार अपात्र
ठरवण्याची निवडणूक आयोगाची शिफारशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केली आहे.
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या २० आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचं, सरकारनं
अधिसूचनेद्वारे सांगितलं आहे. लाभाचं पद प्रकरणात निवडणूक आयोगानं या आमदारांना अपात्र
घोषित केलं होतं.
दरम्यान, हा निर्णय घटनाबाह्य असून,
लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीका आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी केली आहे.
या निर्णयाचा दिल्ली विधानसभेत अरविंद
केजरीवाल सरकारवर परिणाम होणार नाही. विधानसभेच्या ७० जागांपैकी २० आमदार अपात्र ठरल्यानंतरही
आम आदमी पक्षाकडे ४६ जागांसह बहुमत कायम आहे.
****
क्षयरोग समस्येचा गांभीर्यानं निपटारा
करण्याचे आणि सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचं तीन महिन्यात पुनरावलोकन
करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना
दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी क्षयरोगाशी संबंधित मुख्य मुद्यांवर लक्ष ठेवावं, असंही
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. देशात दरवर्षी क्षयरोगाचे
२९ लाख रुग्ण आढळतात.
****
बिहारमध्ये बोधगया इथं महाबोधी मंदिराजवळ
झालेला बॉम्बस्फोट तसंच जिवंत बॉम्ब सापडल्या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक
केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या तिघांची कसून चौकशी करत असून, इथं सापडलेले जिवंत
बॉम्ब आज निष्क्रिय करण्यात येत आहेत. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा सध्या गया दौऱ्यावर
असून, या भागातली सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, बोधगया इथल्या दहशतवादी
कृत्याचा अखिल भारतीय बौद्ध स्मारक संवर्धन समितीनं निषेध केला आहे. याबाबतचं निवेदन
समितीनं औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना सादर केलं असून, या मागच्या सूत्रधारांवर
कठोर कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या
नियुक्त्या या गुणवत्तेच्या आधारेच झाल्या पाहिजे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं
आहे. मुंबई महानगरपलिकेतल्या चतुर्थ श्रेणीच्या १५ कामगारांनी महापालिकेत रिक्त असलेल्या
लिपीक पदाच्या जागांवर सामावून घेण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कामात पारदर्शकता आणि उच्चतम दर्जा राखणं आवश्यक
असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या अपूर्ण धरण प्रकल्पांच्या
पूर्ततेसाठी नाबार्डकडून राज्य शासनाला २६ हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. सार्वजनिक
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. यातून अपूर्ण
प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण केले जातील, असं ते म्हणाले. राज्यात सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या वतीनं तीन हजार कोटी रुपयांचा रस्ते विकासाचा उपक्रम हाती घेतला असल्याचं
ते म्हणाले.
****
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर कृषी
उत्पन्न बाजार समितीसह बार्शी तसंच करमाळा या तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणुकीसाठीचं आरक्षण जाहीर झालं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना
मतदानाचा थेट अधिकार प्रथमच मिळालेला असून, सर्वसाधारण मतदारातून निवडून देण्याच्या
१५ जागांपैकी पाच जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यापैकी महिलांसाठी दोन
जागा, तर भटके विमुक्त, अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी
एक जागा राखीव झाली आहे.
****
सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरात
आज पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवले. भूकंप मापकावर याची तीव्रता तीन पूर्णांक सहा रिश्टर
स्केल इतकी नोंदवली गेली असून, कोयना धरणापासून जवळच भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या भूकंपात जीवीत अथवा वित्त हानीचं वृत्त नाही.
****
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं शासन
विविध योजना यशस्वीरित्या राबवल्या जात असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम
भापकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं स्वयंसेवी संस्थांच्या विकास मेळाव्याचं उद्घाटन
करताना, ते बोलत होते. धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी यावेळी उपस्थितांना
संबोधित करताना, मराठवाड्यात एक लाख स्वयंसेवी संस्थांपैकी, कायद्याचं पालन न करणाऱ्या
१० हजार संस्थांची नोंदणी रद्द केल्याची माहिती दिली. पुण्याच्या सेवावर्धिनी संस्थेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी यांनी यावेळी, ‘मी सामाजिक काम का करावं’
या विषयावर मार्गदर्शन केलं. १२२ स्वयंसेवी संस्था या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत.
****
जिल्हा परिषदेने व्यापारी गाळे बांधण्यासाठी
दिलेलं कर्ज थकवल्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातल्या चार सरपंचांना अपात्र का ठरवू नये,
अशा प्रकारच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जेऊर, बोरगाव, खवासपूर आणि औराद या चार
ग्रामपंचायतींनी कर्ज वेळेत न फेडल्यानं ही नोटीस जिल्हा परिषदेनं बजावली आहे.
****
No comments:
Post a Comment