Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
भारत-आसियान भागिदारी ही जरी फक्त २५ वर्षांची असली
तरी भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया देशांचे दोन हजार वर्षांपासूनचे संबंध असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आशियाई सदस्य राष्ट्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या आघाडीच्या
दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शांतता, मैत्री,
धर्म, संस्कृती, कला, व्यापार, भाषा आणि साहित्यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत
आणि दक्षिण-पूर्व आशियायी देशांचे संबंध असल्यामुळे दोन्ही बाजूंचे नागरिक एकमेकांशी
जोडले गेलेले असल्याचंही पंतप्रधानांनी यात नमूद केलं. आसियान सदस्य राष्ट्रांचे एकमेकांशी
आर्थिक, सामरिक आणि सुरक्षेविषयीचे संबंध अधिक वृद्धींगत होत असून एकमेकांच्या तटरक्षणासाठी
ते एकत्रितरित्या काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सुशासनाच्या माध्यमातून केंद्र सरकार विश्वासाचं
वातावरण निर्माण करत असून, त्या माध्यमातून भ्रष्टाचार निर्मूलनाचं काम करत असल्याचं
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचामध्ये
आयोजित भ्रष्टाचारविरोधी सत्रात बोलत होते. नरेंद्र मोदी सरकार गेल्या साडेतीन वर्षांमध्ये
सातत्यानं भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद
केलं.
****
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना किफायतशीर
पिकं आणि नवतंत्रज्ञानाच्या आधारे शेती करून शेतीमधील उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला
आहे. ते रायपूरमध्ये काल आयोजित राष्ट्रीय कृषी मेळाव्यात बोलत होते. भारत तांदूळ,
गहू आणि इतर अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असल्याचं सांगून, आता शेतकऱ्यांनी
डाळी, कडधान्य, तेलबिया आणि इतर पिकांकडं लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी
यावेळी नमूद केलं.
****
सरकारनं अल्प स्वरुपात व्यवहार असलेल्या आणि कर्ज
न देणाऱ्या एकूण २१ बँकांना अटल निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याची परवानगी दिली आहे.
यामध्ये उज्जिवन बँक, जनलक्ष्मी बँक, सूर्योदय बँक, इंडिया पोस्ट पेंमेंट बँक आणि पे
टी एम पेमेंट बँकेचा समावेश आहे. या बँकांची ग्राहकांपर्यंतची पोहच बघता या योजनेसाठी
त्या महत्वाची भूमिका बजावू शकतात असंही अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं
आहे.
****
सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे प्रामाणिक लोकांना सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांकडून सहजपणे कर्ज घेता येईल, असं
मत वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे. कर्ज घेऊ इच्छीणाऱ्यां प्रामाणिकपणाला
प्राधान्य देत त्यांना गरजेनुसार कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी करावी, हा सरकारच्या
या सुधारणा कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योजक, वित्तीय समावेशन आणि रोजगार निर्मितीकडे प्रामुख्यानं लक्ष केंद्रित
केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.
****
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीवरच्या शिवाजी पुलावरुन
मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. तर तीन महिला गंभीर जखमी
झाल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. आज सकाळी याठिकाणी बचावकार्य पूर्ण
झालं असून, सर्व मृतदेह हाती लागले आहेत. मृत सर्वजण पुणे जिल्ह्यातले असून, त्यात
१६ वर्षांखालील सात मुलामुलींचा समावेश आहे. आज सकाळी अपघातस्थळी सहा महिन्यांच्या
बाळाचा मृतदेह सापडला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबईत गोरेगाव इथल्या एका व्यवसायिक इमारतीला आज
सकाळच्या सुमारास आग लागल्याचं वृत्त आहे. या इमारतीतल्या कामा इस्टेटच्या कार्यालयात
अचानक स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण
कक्षाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नसून, या आगीत कोणतीही
जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हॅमिल्टन इथं सुरु असलेल्या चार निमंत्रित देशांच्या
हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या सामन्यात भारतानं जपानचा चार - दोन
असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय संघानं या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात प्रवेश
केला आहे. अंतिम सामना उद्या भारत बेल्जिअम संघादरम्यान होणार आहे.
****
जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत
माहिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा सामना थायलंडच्या
रॅचॅनोक इंटॅनॉन हिच्याशी होणार आहे. सायनानं काल उपांत्यपूर्व फेरीत, पी.व्ही
सिंधूचा २१ – १३, २१ – १९ असा पराभव केला. या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय
जोडी सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा उपांत्य फेरीतला सामना आज
इंडोनेशियाच्या जोडीसोबत होणार आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी डेन्मार्कच्या जोडीचा
पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment