Tuesday, 23 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २३  जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø इंडियन मुजाहीदीनच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

Ø न्यायाधीश बी एच लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित मुंबई उच्च न्यायालयातल्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग

Ø लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्यास खर्चात बचत - विजया रहाटकर

Ø शरियत कायद्यातला सरकारचा हस्तक्षेप मुस्लिम तरुणांना कारागृहात डांबणारा - खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं मत

आणि

Ø सरकारकडून एकही योजना पूर्ण केली जात नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची टीका

****



 दिल्ली पोलिसांनी काल एका कारवाईत इंडियन मुजाहीदीन तसंच सिमीच्या दहशतवाद्याला अटक केली. अब्दुल सुबहान कुरैशी असं त्याचं नाव असून, तो २००८ साली गुजरातमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कुरैशीला काल न्यायालयात हजर केलं असता, त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे नेपाळमध्ये राहत असलेला कुरैशी भारतात येऊन इंडियन मुजाहिदीन संघटना पुन्हा सक्रीय करण्याच्या प्रयत्नात होता, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित दोन याचिका सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्वत:कडे वर्ग करुन घेतल्या आहेत. काल झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं, या याचिकांशी संबंधित पक्षांनी कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी पुढची सुनावणी दोन फेब्रुवारीला होणार आहे.

****

 सुशासनासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यात याव्या. त्यामुळे निवडणुकांवर होणाऱ्या खर्चात बचत होईल, असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहटकर यांनी व्यक्त केलं आहे. ७३ आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त लोकशाही निवडणूक आणि सुशासनया विषयावर काल औरंगाबाद इथं एक दिवसीय विभागीय परिषद घेण्यात आली. या परीषदेचं उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. हा निर्णय झाल्यास, शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असंही त्यांनी नमूद केलं, त्या म्हणाल्या...



 निवडणूकाच  निवडणूका हे आपल्याकडे अखंडपणे चालू असतात. त्यामुळे आम्हाला निवडणूक यंत्रणा ह्या कायम संज्य ठेवाव्या लागतात.एकंदरीत या वेगवेगळ्या निवडणूका झाल्या तर दहा हजार कोठी रुपये खर्च लागतो. पण निवडणूका जर एकत्र केल्या तर मात्र चार हजार पाचशे कोठी मध्ये आपल्या संपूर्णं  निवडणूका ह्या होउु शकतात. ह्याच्या मध्ये फक्त खर्चाचा विषय नाहिये, तर यंत्रणाने सदेव सज्य राहणं हा सुध्दा अत्यंद महत्वाचा विषय आहे.  सुरक्षा यत्रंणेवर  जो प्रचंड ताण येतो त्यावर सुध्दा विचार करणे फार गरचेचं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी ए चोपडे, िभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तीन सत्रात झालेल्या या एक दिवसीय परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थाचं कामकाज, निवडणूक सुधारणा या विषयावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

*****

 ‘आपलं सरकार’ या  सेवा केंद्राच्या मध्यमातून योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली या खासगी कंपनीच्या उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं यासंबधीचं परिपत्रक जारी केलं असून राज्य सरकार हे पतंजलीचं एजंट बनलं असल्याची टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी, विधान सभेचे विरोधी पक्षनेते, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

****

 शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुका आणि राजकीय स्थिती लक्षात घेऊन अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पक्षाध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची फेरनिवड करण्यात येईल तर नेते म्हणून आणखी काही जणांना मान्यता दिली जाईल.

****

 मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार करत शरियत कायद्यात होणारा सरकारचा हस्तक्षेप धोक्याचा असून मुस्लिम तरुणांना कारागृहात डांबणारा आहे असं  मत ए. आय. एम. आय. एम.  पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित शरियत ए तहाफुज परिषदेत ते काल बोलत होते. यावेळी पक्षाचे आमदार इम्तियाज जलील, अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना  मोहम्मद उमरैन महफुज रहेमानी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जातो, मात्र त्यापैकी एकही योजना पूर्ण केली जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त काल हिंगोली इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरकारच्या जाहिरातींवरही यावेळी टीका करण्यात आली. धनगर, मराठा, मुस्लिम, तसंच लिंगायत आरक्षणाचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. धनंजय मुंडे यांनी यावेळी इंधन दरवाढीवर भाष्य करत, सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचं नमूद केलं. परभणी जिल्ह्यातही काल हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभांमध्ये पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

****

 पेट्रोल डिझेल दर वाढीच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सायकल फेरी काढून भारतीय जनता पक्ष -शिवसेना सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. क्रांती चौकातून सुरू झालेल्या या आंदोलनात, सरकारविरोधी घोषणा देत, दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

****

 शिक्षण अधिकाधिक प्रयोगात्मक व्हावं, असं मत, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉक्टर अनील काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं, ‘इंडस्ट्री ॲकॅडमिक एंगेजमेंट समिट-२०१८’च्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. शिक्षकांचा ९० टक्के वेळ परीक्षेच्या कामात खर्च होतो आणि फक्त १० टक्के वेळ शिकवण्यासाठी मिळतो.हे चित्र बदलून शिक्षण अधिआधिक प्रयोगात्मक व्हावं यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.

****

औरंगाबाद इथं आयोजित शारंगदेव महोत्सवाचा काल सकाळी प्रसिद्ध गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या व्याख्यानानं समारोप झाला. त्यांनी ख्याल उत्क्रांती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महागामीच्या गुरू पार्वती दत्ता, ललित कला अकादमीचे माजी संचालक अशोक वाजपेयी यांचीही यावेळी व्याख्यानं झाली.

****

 उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या चार नवीन प्रस्तावित  राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे  या महामार्गांचं काम अत्यंत जलद गतीनं करण्याबाबतची अधिसूचना जारी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. चार राष्ट्रीय महामार्गांपैकी २०० किलोमीटर लांबीचा मार्ग हा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम, परंडा या तालुक्यांमधून जात आहे. 

****

रेल्वेच्या सोलापूर विभागात रुळ दुरुस्तीच्या कामामुळे नांदेड-दौंड ही पॅसेंजर गाडी येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत नांदेडहून कोपरगावपर्यंतच धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. हैदराबाद रेल्वे विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉक मुळे नांदेड ते मेद्चल पॅसेंजर गाडी आजपासून सहा फेब्रुवारीपर्यंत मेद्चल ते निझामाबाद दरम्यान रद्द करण्यात येत आहे. या कालावधीत ही गाडी नांदेड ते निझामाबाद अशी धावेल.

****



 हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. अंबाजोगाई इथं योगेश्वरी शिक्षण संस्थेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश काकडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वामीजींनी सामाजिक तसंच शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिल्याचं काकडे यांनी नमूद केलं. नवीन समाज बांधणीची जबाबदारी पार पाडताना, शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान ग्रहण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवावा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****

 परभणी शहरात सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांना घरासमोर येणाऱ्या घंटागाड्यांमध्ये ओला आणि  सुका तसंच घातक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगवेगळा करून टाकण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. याकडे  दुर्लक्ष करणाऱ्या   नागरीकांच्या परीसरात  येत्या २६ जानेवारी नंतर कचरा गोळा करण्यासाठीच्या घंटा गाड्या न पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याचं महापालिका आयुक्त राहुल रेखावर यांनी सांगितलं.

*****

***

No comments: