Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला
उपस्थित राहिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आशियान देशांच्या नेत्यांचे
आभार मानले आहेत. या समारंभाला या नेत्यांची उपस्थिती म्हणजे भारताबद्दलच्या सद्भावनेचं
आशियान देशांकडून झालेलं अभूतपूर्व दर्शन आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात शांतता
आणि उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर पोलिसांनी
एका आत्मघातकी दहशतवादी महिलेला अटक केली. सादिया अन्वर शेख असं या महिलेचं नाव असून,
ती मूळ पुण्याची रहिवासी आहे.
****
नीती आयोगानं जाहीर केलेल्या मागास
जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचं,
जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते, यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं प्रजासत्ताक
दिनाच्या मुख्य ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.
बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण
जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं, जिल्ह्यात मुलींच्या जन्माचं
दर हजारी आठशे अट्ठ्याण्णव, इतकं खाली गेलेलं प्रमाण, आता नऊशे सत्तावीस पर्यंत पोचल्याचं
त्यांनी सांगितलं. विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा
मुंडे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
****
जालना इथं ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात
जाणाऱ्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी, प्रशासनाला निवेदन
दिल होतं. मात्र याबाबत निर्णय न झाल्यानं, शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
पोलिसांनी या प्रकरणी ११ शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
****
प्रवाशांना अत्याधुनिक आणि अधिक
चांगल्या सुविधा देण्याबरोबरच रेल्वे स्थानकं स्वच्छ राखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस इथे आयोजित विविध सुविधांच्या ई-लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत
होते. प्रवाशांनी रेल्वेचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं.
****
विरोधी पक्षांच्या वतीनं आज मुंबई
‘संविधान बचाव’ फेरी काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी
यांच्या पुढाकारानं काढण्यात आलेल्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार, माजी खासदार शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पाटीदार नेता
हार्दिक पटेल, यांच्यासह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानंही
आज मुंबईत ‘तिरंगा यात्रा’ काढली. या यात्रेमध्ये भाजपचे मंत्री, आमदार आणि खासदार सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत कामगार मैदानावर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार आहे.
****
सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाची सुरुवात
हे औरंगाबाद महानगर पालिकेचं स्मार्ट सिटीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं, सार्वजनिक
आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
महापालिका इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या
हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे मनपाच्या वीजखर्चात
बचत होऊन, हा पैसा इतर विकास कामांसाठी उपयोगात आणणं शक्य होणार असल्याचं, डॉ सावंत
म्हणाले.
****
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी एका
कारला अपघात होऊन, पाच जण ठार तर तिघे जखमी झाले. पुण्याहून गणपती पुळ्याला जाणारी
ही कार आज सकाळी शाहुवाडी इथं झाडावर धडकून हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा
समावेश आहे.
****
इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या
महिला एकेरीमध्ये सायना नेहवालनं पी.वी.सिंधूचा २१-१३, २१-१९ असा सरळ सेट्स मध्ये पराभव
करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनाचा उपान्त्य फेरीचा सामना उद्या थायलंडच्या
रत्चानोक इंतनॉनशी होणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा
रोहन बोपन्ना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोचला आहे. बोपन्ना-बाबोस जोडीनं डिमोलिनर-सांचेझ
जोडीचा ७-५, ५-७, १०-६, असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात
सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या तिसऱ्या सामन्यात, आज तिसऱ्या दिवशी
भारताच्या, दुसऱ्या डावात सहा बाद १५२ धावा झाल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment