Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारतात
आजही कर्करोगावर उपचारांपेक्षाही प्रतिबंधात्मक उपाय
अधिक प्रभावी ठरु शकतात, असं मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं
आहे. मुंबईत टाटा मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालयाच्या
पदवी प्रदान समारंभात ते आज बोलत होते. आधुनिक जीवनशैलीत, व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढलं
असल्याचं ते म्हणाले. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. टाटा ट्रस्ट आणि टाटा समाज विज्ञान
संस्थेचा, कर्करोग रुग्णांना मार्गदर्शनपर पदविका अभ्यासक्रम यावेळी सुरू करण्यात आला.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित दोन याचिका
सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्वत:कडे वर्ग करुन घेतल्या आहेत. या
याचिकांशी संबंधित पक्षांनी कागदपत्र सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं
दिले आहेत. याप्रकरणी पुढची सुनावणी दोन फेब्रुवारीला होणार आहे.
****
सुशासनासाठी लोकसभा आणि विधानसभा
निवडणुका एकत्रित घेण्यात याव्या. त्यामुळे निवडणुकांवर होणाऱ्या खर्चात बचत होईल, असं मत
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी व्यक्त केलं आहे. ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला २५ वर्षे
पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेवर आधारित ‘लोकशाही निवडणूक आणि सुशासन’ या
विषयावर आयोजित
एक दिवसीय विभागीय
परिषदेचं उद्घाटन आज औरंगाबाद इथं त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिलांना संधी मिळाली असली तरी, त्यांच्या समोरची आव्हानं
संपली नसल्याचं त्या म्हणाल्या. दोन सत्रात झालेल्या या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थाचं कामकाजासंबंधीच्या विषयावर
मान्यवरांनी
उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जातो,
मात्र त्यापैकी एकही योजना पूर्ण केली जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नेते अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त आज हिंगोली इथं
आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सरकारच्या
जाहिरातींवरही यावेळी टीका करण्यात आली. धनगर, मराठा, मुस्लिम, तसंच लिंगायत आरक्षणाचा
मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. धनंजय मुंडे यांनी यावेळी इंधन दरवाढीवर भाष्य
करत, सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचं नमूद केलं.
****
पेट्रोल डिझेल दर वाढीच्या निषेधार्थ
आज औरंगाबाद इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सायकल फेरी काढून भाजपा-शिवसेना
सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. क्रांतीचौकातून सुरू झालेल्या या आंदोलनात,
सरकारविरोधी घोषणा देत, दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
****
उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेराव
याचं आज मुंबईत अपघाती निधन झालं. तो २२ वर्षांचा होता. कुंकू या दूरचित्रवाणी मालिकेतून
घराघरात पोहोचलेल्या प्रफुल्लनं तू माझा सांगाति, ज्योतिबा फुले, नकुशी, आदी मालिकांमधूनही
विविध भूमिका साकारल्या होत्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायण चित्रपटातही त्यानं
भूमिका केली होती. आज सकाळी मुंबईत मालाड रेल्वेस्थानकाजवळ त्याचा मृतदेह आढळल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धुळे अकोला मार्गावर मलकापूर नजिक
कार आणि ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर
जखमी झाले. काल रात्री ही दुर्घटना घडली. हे सर्वजण धुळ्याहून अकोला इथं धार्मिक कार्यक्रमासाठी
जात असताना, ही दुर्घटना घडली.
****
रेल्वेच्या सोलापूर विभागात रुळ
दुरुस्तीच्या कामामुळे नांदेड-दौंड ही पॅसेंजर गाडी आजपासून येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत
नांदेडहून कोपरगावपर्यंतच धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
ही माहिती दिली.
****
औरंगाबाद इथं आयोजित शार्ङंग्देव
महोत्सवाचा आज सकाळी पंडित सत्यशील देशपांडे यांच्या व्याख्यानानं समारोप झाला. त्यांनी
ख्याल उत्क्रांती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महागामी गुरू पार्वती दत्ता,
ललित कला अकादमीचे माजी संचालक अशोक वाजपेयी यांचीही यावेळी व्याख्यानं झाली.
****
धुळे जिल्हा रुग्णालयातला वरिष्ठ
लिपीक सुरेश सैंदाणे याला पाच हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचत प्रतिबंधक विभागानं
आज रंगेहात अटक केली. परिचारकेचं थकीत वेतन आणि फरकाची रक्कम काढून देण्यासाठी त्यानं
ही लाच मागितली होती.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत
आज झालेल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारतीय खेळाडू रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण यांना
आपापल्या जोडीदारांसह पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे, या दोघांचंही या स्पर्धेतलं आव्हान
संपुष्टात आलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment