Friday, 26 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.01.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****

६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राज्यभरात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते, शिवाजी पार्क इथं मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात राज्यपालांनी महाराष्ट्रानं नऊ टक्के आर्थिक वृद्धीदर गाठला असल्याचं नमूद केलं. यावेळी पोलिस दल, तटरक्षक दल, केंद्रीय तसंच राज्य राखीव पोलिस दल पथकांनी राज्यपालांना मानवंदना दिली.

राज्यात सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरे झाले. धुळे इथं पालकमंत्री दादा भुसे, अहमदनगर इथं पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, सातारा इथं पालकमंत्री विजय शिवतारे, कोल्हापूर इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील, बुलडाणा इथं पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, रायगड इथं पालकमंत्री प्रकाश मेहता, गडचिरोली इथं पालकमंत्री अंबरीश आत्राम, नाशिक इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासात दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेची महत्वाची भूमिका असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जवाहर नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना राष्ट्रपती पदक देऊन, तर उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना विशेष सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं. चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात औरंगाबाद जिल्ह्यास प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल, पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. जिल्ह्यातल्या आयएसओ मानांकन मिळालेल्या तेवीस पशुवैद्यकीय दवाखान्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं.

लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, भारतीय जनता पक्षाच्या तिरंगा फेरीला पालकमंत्री निलंगेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. तरुणांची दुचाकी फेरी नागरिकांचं लक्ष वेधून घेत होती.

बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत पालकमंत्रीही सहभागी झाल्या.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातून प्राचार्य दीपा क्षीरसागर आणि नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर यांची पाच वर्षासाठी बिनवविरोध निवड झाली आहे.

****

न्युझीलंड इथं सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं बांगलादेशचा १३१ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २६५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ४२ षटकं आणि एक चेंडुत १३४ धावांत बाद झाला. भारताच्या कमलेश नागरकोटीने ३ बळी घेतले. उपांत्य फेरीत भारताचा सामना येत्या मंगळवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

****

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून, पंच्याऐंशी मान्यवर व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये अनिवासी भारतीय, मूळ भारतवंशीय आणि परदेशस्थ भारतीय नागरिक या श्रेणींमध्ये सोळा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. रशियाचे भारतातले माजी राजदूत अलेक्झांडर काडाकिन, नेपाळचे नेत्रशल्यविशारद संदुक रुईत, व्हिएअतनामचे बॅडमिंटन खेळाडू ग्नुएन तिन थिएन आणि अमेरिकेतले वेद प्रकाश नंदा यांचा या सोळा मान्यवरांमध्ये समावेश आहे. आशियान देशातल्या दहा व्यक्तींनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आणि शासकीय योजनांचा आढावा पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल आढावा घेतला. जलयुक्त शिवार योजनेची उर्वरित कामं मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करणार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियानांतर्गत, जिल्ह्यात शौचालयांच्या बांधकामांचं सत्त्याण्णव टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड, यांनी दिली. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरात अडीच हजार सीसीटीव्ही बसवल्याचं सांगितलं.

****

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक गावात एक कोटी रुपयांची विकास कामं करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. गाव तिथे विकास दौरा, या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्याचा दौरा करताना त्या बोलत होत्या.

****

No comments: