Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø देशभरातल्या ७९५ पोलिसांना पदकांची घोषणा; मराठवाड्यातले
विश्वेश्वर नांदेडकर, जनार्दन घाडगे, अविनाश
आघाव आणि अब्दुल गफुर गफ्फार खान यांच्यासह
राज्यातल्या ४९ जणांचा समावेश
Ø पद्मावत चित्रपटाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर
राज्यात पोलीस बंदोबस्तात वाढ
Ø ई रिक्षा आणि ई कार्ट वाहनांना, मोटर वाहन कायदा आणि नियम
लागू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
आणि
Ø
तिसऱ्या
क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात काल दिवसअखेर १ बाद ६ धावा;
भारताचा डाव १८७ धावांत संपुष्टात
****
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या
७९५ पोलिसांना विविध पदकांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये शौर्य, उल्लेखनिय, गुणवत्तापूर्ण
तसंच वैशिष्ट्यपूर्ण सेवांसाठीच्या पदकांचा समावेश आहे. यामध्ये राज्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक एम. राजकुमार
यांच्यासह ६ जणांना पोलीस शौर्य पदक घोषित झाले आहे. गुणवत्ता पुर्ण सेवेसाठी दक्षिण
मुंबईचे पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, नांदेडचे पोलिस उपअधिक्षक विश्वेश्वर नांदेडकर,
जालना इथल्या राज्य राखीव दलाचे सहाय्यक समादेशक जर्नादन घाडगे, औरंगाबादचे पोलिस निरिक्षक
अविनाश आघाव, तसंच राज्य राखीव दलाचे उपनिरिक्षक अब्दुल गफुर गफ्फार खान यांच्यासह
४९ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. याशिवाय तिघा जणांना वैशिष्टपूर्ण सेवेसाठीचं
राष्ट्रपतींचं पोलिस पदकं घोषित झालं आहे. यात अतिरिक्त महासंचालक एस. जगन्नाथ यांचा
समावेश आहे.
देशातल्या ४० तुरुंग अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांना
उल्लेखनीय कार्यासाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. त्यात जालना जिल्हा कारागृहाचे
हवालदार जगन्नाथ खपसे, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई, सुभाष तोताराम तायडे यांच्यासह राज्यातल्या ७ जणांचा समावेश आहे.
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी
बजावणाऱ्या ४४ व्यक्तिंना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. यात राज्यातल्या चौघांचा
समावेश आहे. राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना ‘उत्तम जीवनरक्षा पदक’ जाहीर
झालं आहे. तर ‘जीवनरक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला
आहे. तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ १३ जणांना
‘जीवन रक्षा पदक’ २४ जणांना जाहीर झाले आहेत.
****
देशभरातल्या १८ वीर बालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते काल बाल शौर्य पुरस्कारांनं गौरवण्यात आलं. या वीर बालकांमध्ये नांदेड
जिल्ह्यातल्या नदाफ एजाज अब्दुल रऊफ याचा समावेश आहे.
****
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशवासियांना संबोधित करतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून
त्यांचं हे संबोधन प्रसारीत केलं जाईल. त्यांच्या या भाषणाचा प्रादेशिक भाषेमधला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून
प्रसारीत केला जाईल.
****
आज प्रदर्शित होत असलेल्या पद्मावत या चित्रपटाला
देशासह राज्याच्या विविध भागात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पोलीस
बंदोबस्त वाढवण्यात आला असून, शीघ्र कृती दलही तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, या
चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करत, औरंगाबाद शहरात काल राजपूत समाज आणि विविध मराठा
संघटनांतर्फे काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
तीन तास धरणं आंदोलन करण्यात आलं. जालना इथंही नीलम आणि रत्नदीप चित्रपटगृहांवर
दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात
मलकापूर इथंही निदर्शनं करण्यात आली. धुळ्यात काल राजपूत समाजासह विविध संघटनांनी,
मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. नाशिकमध्ये या चित्रपटाविरुद्ध निदर्शनं
करताना जलसमाधीची धमकी देणाऱ्या, करणी सेनेच्या वीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल
ताब्यात घेतलं.
****
हिंदी-मराठी चित्रपटांचे
लोकप्रिय पार्श्वगायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना यंदाचा राम कदम पुरस्कार
जाहीर झाला आहे. शरद क्रीडा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी काल पुण्यात
या पुरस्कारांची घोषणा केली.
****
ई रिक्षा आणि ई कार्ट म्हणजेच मालवाहू वाहनाला, मोटर
वाहन कायदा आणि नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य शासनाला दिले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ
वाहतूक मंत्रालयानं ई रिक्षा आणि ई कार्टला परवान्याच्या बंधनातून वगळलं होतं. याबाबत
विदर्भ सायकल रिक्षा चालक संघाच्यावतीनं दाखल जनहीत याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे आदेश
देण्यात आले. या वाहनांची नोंदणी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यातलं
सरकार शेतकरी हिताचे नसून कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी केली आहे. ते काल जालना जिल्ह्यात जाफराबाद इथं हल्लाबोल मोर्चात बोलत
होते. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचं, ते
म्हणाले. मेक इन इंडिया, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी या मुद्यांवरून सरकारवर तसंच
शिवसेनेच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
****
जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी
सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेनं दिवसअखेर ६ षटकांत १ बाद ६ धावा केल्या. तत्पूर्वी,
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा पहिला डाव १८७ धावांवर संपुष्टात आला.
कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्र्वर पुजारानं अर्धशतकी खेळी करून भारताला सावरण्याचा
प्रयत्न केला मात्र हे दोघं बाद झाल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात भारतीय संघाला
अपयश आलं.
****
हैद्राबाद जयपूर या साप्ताहिक रेल्वे
गाडीच्या फेऱ्या जूनपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी दर शुक्रवारी हैदराबाद हून,
तर परतीच्या प्रवासात दर रविवारी जयपूर हून निघेल.
निझामाबाद पुणे पॅसेंजर गाडी आजपासून सव्वीस तारखेपर्यंत
फक्त मनमाडपर्यंतच धावणार आहे, या कालावधीत मनमाड ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली
आहे.
****
परभणी महापालिकेनं येत्या रविवारी, अट्ठावीस तारखेला,‘चला
उज्ज्वल भविष्याकडे‘ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या
करियर्ससंबंधी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावं, यासाठी हा उपक्रम सुरू केला असून, अशा
प्रकारचा हा राज्यातला पहिलाच उपक्रम असल्याची माहिती, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी
दिली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले बंद असलेले सहकारी साखर कारखाने
सुरू करावेत अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी सहकारमंत्री
सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना,
श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना आणि बाणगंगा सहकारी साखर कारखाना हे तिन्ही सहकारी
साखर कारखाने बंद असून ऊसाचं गाळप होत नसल्यानं उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं
त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत
जनजागृती आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत औरंगाबादचे
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्त केलं आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत
पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयेाजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल औरंगाबाद
इथं बोलत होते. माहिती, शिक्षण आणि संवादाच्या माध्यमातून ॲट्रॉसिटीबाबत जनतेत जागृती
निर्माण करून या कायद्याचा गैरवापर होणार नाही याबाबतची खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं
राम म्हणाले.
****
राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी कोणीही प्लास्टिकच्या
ध्वजाचा वापर करु नये, असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे.
कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा, असं
त्यांनी म्हंटलं आहे. प्लास्टिक,आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी जनजागृती करण्याकरता जिल्हा, आणि
तालुका पातळीवर समित्यांची स्थापना करण्यात
आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment