आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ जानेवारी २०१८ सकाळी
११.००
****
एकोणसत्तरावा प्रजासत्ताक
दिन आज देशभरात उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी जनतेला या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिनाचा मुख्य कार्यक्रम राजधानी
दिल्लीत राजपथावर झाला. यावेळी लष्कराच्या तिन्ही दलांनी दिमाखदार पथसंचलन केलं. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी लष्कराच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. या समारंभास सर्व, दहा
आशियान देशांचे नेते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय सैन्याच्या ताकदीची
तसंच भारतीय संस्कृतीची झलक या पथसंचलनातून जगासमोर आली. यावेळी अनेक राज्यांच्या,
विभागांच्या आणि सुरक्षा दलाच्या देखण्या चित्ररथांचं प्रदर्शन, तसंच विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं. आकाशवाणीतर्फे यावर्षी प्रथमच चित्ररथाचं सादरीकरण
करण्यात आलं. हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी यावेळी दिमाखदार हवाई प्रात्यक्षिकं सादर
केली.
प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी तसंच लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी
इंडिया गेटवर ‘अमर जवान ज्योती’ इथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
राज्यात विधानभवनात विधानपरिषदचे
सभापती रामराजे
नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण
करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती
माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित
होते. मराठवाड्यात औरंगाबाद इथं पालकमंत्री डॉक्टर दिपक सावंत यांच्या
तर जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी पोलिस दलासह विविध विभाग आणि विद्यार्थ्यांनी शानदार पथसंचलन केलं. नांदेड इथं
जिल्हा पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आलं. विविध विभागांच्या २४ पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परभणी इथं पालकमंत्री
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
केलेल्यांना प्रशस्तीपत्र आणि पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. हिंगोली इथं पालकमंत्री
दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, यावेळी जिल्हा पोलीस दल, राज्य
राखीव पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना- एन.सी.सी., राष्ट्रीय सेवा योजना- एन.एस.एस.,
तसंच स्काऊट-गाईडच्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
****
No comments:
Post a Comment